पालवी

लेखिका – मेघना अभ्यंकर

प्रिय …
हाय, कसा आहेस? हे वरचं फक्त प्रिय बघून तुला नवल वाटलं असेल? आज हे कसलं नवीन खूळ डोक्यात शिरलं आहे असं वाटलं असेल. तसं तुला पत्र लिहिण्याची हि पहिली वेळ नाही, या आधी अनेकदा तुला पत्र लिहिली आहेत ‘प्रिय’ च्या पुढे तुझ्या नावाचा उल्लेख करून. आणि आज फक्त प्रिय बघून थोडं विचित्र वाटेल तुला, पण त्यावर ” हे काय नवीन आता?” असं मनात म्हणत मानेला एक झटका देऊन तू पत्र पुढे वाचायला लागशील याची खात्री आहे मला. आपण वेगळे झालो या घटनेला आता ४ वर्ष तरी झाली असतील. आधी आवर्जून प्रिय आणि पुढे तुझं नाव लिहिलं जायचं. ते नाव लिहिताना १०० वेळा तोंडाने म्हंटलं जायचं तितक्याच वेळेस तुझ्या नावाभोवती गुरफटलेल्या आठवणी जाग्या व्हायच्या. आता मध्ये बराच काळ गेला, म्हणजे माझं पत्र पाठवणं तुझं त्यावर ”पत्र मिळालं. वाचलं.” असं उत्तर येणं, कधीतरी पत्र वाचून,”अजूनही इतकी गुंतली आहेस आम्हा सगळ्यांमध्ये तर मग का सोडून गेलीस” असं विचारण्यापुरता फोन येणं. आणि मी नाही ऐकत आहे म्हणल्यावर,”तू नेहमी तुझचं खरं करतेस” असं म्हणत फोन ठेऊन देणं. खूप सरावाचं झालंय. आता तुला पाठवलेल्या पत्रात तुझी काळजी कमी आणि माझ्या सवयीचा भाग जास्त असतो. तुझ्या नावाचा त्याला जोडलेल्या भावनांचा माझ्याशी असलेला संबंध आता कमी कमी होत चाललाय. आता तू माझा अनुराग आहेस असं वाटण्याऐवजी तू फक्त प्रिय असं वाटतं. म्हणजे हितचिंतक, नातेवाईक या पेक्षा थोडा जवळ थोडा खास माझ्या स्वतःच्या रिंगणापसून थोडा लांब असलेला, कधीकाळी माझ्या रिंगणाला स्पर्शून गेलेला, माझा प्रिय!
खरं सांगू , आज खूप दिवसांनी तुझी आठवण येतेय म्हणजे काही आठवणी, काही प्रसंग, तुझ्या सवयी यामुळे तू आठवतोसच पण तेव्हा तुझ्यापेक्षा सुद्धा त्या घटना माझ्या मनात अधिक कोरल्या गेल्या आहेत, आणि तू त्याचा भाग आहेस म्हणून पर्यायानं तुझी आठवण येते. पण आता काही तासांपूर्वी मला फक्त तुझी आठवण आली. आणि आली म्हणजे काय तू म्हणतोस तसं, ”आठवण आली डोळ्यासरशी वाहून गेली”. खूप दिवसांनी खूप रडले असेन मी, आपला तो निळा टर्किशचा टॉवेल आहे ना, आपण सिमल्याला गेलो होतो तेव्हा मी विमानातून ढापलेला तो पूर्ण भिजला. म्हणजे बघ मी केवढी रडली असेन. तू इथे असतासच तर मी का रडते आहे हे विचारायचं सोडून, ”मने, आत जाऊन साधा पंचा घे, नाकं पुसायला हा टॉवेल नको. तो साधा पंचा घ्या आणि मग रडा काय खुशाल रडायचं तेवढं” तुझा तो अती स्वच्छतेचा आग्रह आणि मी तुझं ऐकल्यानंतर खुश होणारा तुझा भोळाभाबडा चेहरा बघूनचं रडणं बंद व्हायचं माझं. त्या वेळेस टॉवेलची फिकीर न करता माझी केली असतीस तर आता असतो का आपण एकत्र?
अरे अरे तू टेन्शन नको घेऊस हा सगळा अट्टाहास आपण एकत्र यायला हवा म्हणून नाहीये हं.
तर मी तुला सांगत होते कि मला तुझी आठवण का आली ते. आमच्या ऑफिस मधला ‘अनुराग’ माहिती आहे ना तुला? त्याचं आणि तुझं नाव एकच आहे, आणि शिवाय तो बंगाली आहे म्हणल्यावर किती त्रागा केला होतास तू! शेवटी आपण त्याला ‘एबी’ ( अनुराग बंदोपाध्याय) म्हणायचं असं म्हणायचं ठरल्यावर शांत झाला होता तुझा राग. कॉलेज मध्ये असल्यापासूनचं माझं बंगाली लोकांबद्दलच वेड तुला माहितीच होतं. तेव्हा एकदा मी करेन एखाद्या बंगल्याशी लग्नं असं मी म्हंटलं होतं तेव्हा न जाणो कुणाकडून बंगाली भाषेत १० ओळी लिहून आणल्या होत्यास. दादरच्या बंगाली दुर्गेच्या स्टॉलवरचा रसगुल्ला घेऊन, मंडपाच्या बाहेर मला म्हणाला होतास,”हि १० बंगाली वाक्य, हा रसगुल्ला, आणि टागोरांनी लिहिलेलं राष्ट्रगीत या व्यतिरिक्त मला दुसरं काही बंगालबद्दल माहिती नाहीये. पण इतकं नक्की कि, आम्ही तुमाके भालो भाषी” त्या वेळेस असं वाटत होतं कि आख्ख बंगाल फिकं पडतं आहे आणि माझ्या स्वप्नातला माझ्या हातचा आलता तुझ्या चेहऱ्यावर लालिमा बनून पसरतो आहे, पदराला बांधलेला किल्ल्यांचा जुडगा, छन-छन करत एक पार्श्वसंगीत देतो आहे, रोषोगुल्ले, मिष्टी दोही सगळेच तुझ्या गोड हसण्याची मिठास वाढवत आहेत. माझं बंगाली होण्याचं स्वप्न तुझ्या डोळ्यात आकार घेतंय, फक्त तू आणि मी नव्हे तर आजूबाजूचे सगळा आसमंतच ”आम्ही तुमाके भालो भाषी” असं म्हणतो आहे. सॉरी हं, आजचं हे पत्र बहुदा तुझा खूप वेळ घेणार आहे.
तर आज मी परवाच प्रियाच्या लग्नासाठी घेतलेली निळी गर्द रेशमाची साडी नेसून ऑफिसला गेले होते कारण होतं कि एबी चं प्रमोशन झालं आहे. त्याने सगळ्यांना पार्टी दिली होती शिवाय आमच्या बॉसचा सेंड ऑफ पण होता. आता अनुराग त्यांच्या जागेवर असणार आहे आणि मला प्रोमोशन मिळालं तर मी अनुरागच्या जागेवर! तर त्या दिवशी खूप जण कौतुक करत होते माझं, म्हणजे दिसण्याचं, काम करण्याचं, या चार वर्षात मी बदलेली आहे, दुसरा विचार करते आहेस का कोणाचा? तुझ्यासोबत होते तेव्हा जास्त छान होते आता बरीच एकलकोंडी वाटते, एक जण मला म्हणाला कि मी स्लीपिंग ब्युटी झाले आहे, स्वतःला जीवनदान देणाऱ्या राजकुमाराची वाट बघणारी अँड ऑल ! ( स्लीपिंग ब्युटी म्हणजे तीच कारे १६ वर्षांनी जागी होणारी ) तीच असावी बहुदा! तिथला सगळा समारोप मी उरकून आले.
आरश्यासमोर उभं राहून पदराची पिन काढत होते. हात मागे जात नव्हता, पिन अर्धवट निघाल्यामुळे साडीत फसली होती, मग नंतर टोचायला लागली आता अशा अवस्थेत कोणाला तरी हाक मारायची म्हणजे परत पंचाईत, मी पिन लावली असली कि येते मला काढता पण आज त्या कोंकणे बाईंनी साडी नीट करून देण्याच्या नावावर अशी घट्ट पिन लावली कि पदर जराही हलला नाही पण आता ती पिन साडीतून निघतच नव्हती मुळी. सगळाच त्रागा व्हायला लागला. आरश्यात उलटं-पालट बघताना पाठीवरचा काळा तीळ दिसला आणि भसकन तुझी आठवण आली, कि रडूच आवरेना. आधी तू इथे नाही आहेस म्हणून राग आला. या आधी कितीतरी वेळा अशी पिन फसली आहे माझी, मी आईंकडे जायला लागले पिन काढून घेण्यासाठी कि तू बिनदिक्कत म्हणायचास,” मी आहे कि! बायकोने नवऱ्याला द्यावी संधी मदत करण्याची” त्यावर सासूबाई अनेकदा डोळे वटरायच्या” काय हा पोरकटपणा म्हणून” पण तू मात्र स्वतः पुढाकार घेऊन पिन काढून दयायचास साडी न उसवता, अंगाला कुठेही न टोचता, खूप अलगद, अतीव प्रेमाने” आणि मग हलकेच खांद्यावरच्या तिळावर ओठ टेकवून म्हणायचास, ”पिन काढणं फक्त बहाणा आहे, मी तर हे बघत होतो कि इतक्या लोकांची नजर लागून लागून तीळ गायब तर नाही ना झाला”
हे सगळं वाचत असताना तू मनात म्हणशील,” इतकंच होत तर आलीस का नाही परत? अजूनही ये” ”सुखासुखी घर सोडते आहेस तू, आहे काही ठाम कारण तुझ्याकडे?” मी गप्प होते. ”माझ्या गप्प बसण्याला माझं निरुत्तर होणं समजलास तू.” माझं मौन बाळगणं हेच आपल्या नात्याच्या फोलपणाचं कारण आहे हे समजून घ्यायला कमी पडलास तू” त्या क्षणापर्यंत माझा निर्णय चुकत तर नाही ना याविषयी साशंक होते मी. माझे शब्द तुला समाजतं नाहीत, त्याचा अर्थविपर्यास होतो म्हणाल्यावर मी मौन झाले. त्या मौनाचा अर्थ समजायचा सोडून, माझ्या गप्प राहण्याला तुझा निर्वीवाद विजय समजून तू निघून गेलास. ” सुखासुखी” तुझं सुख आणि माझं सुख वेगळं असू शकतं त्याच्या व्याख्या, संदर्भ, मायने वेगळे असू शकतात हेच मुळी अमान्य केलंस तू. अनेकदा आपण बाहेरून उशिरा यायचो आरव लहान आहे त्यामुळे त्याला पाच वर्ष पूर्ण होईपर्यंत तो त्याला बाहेरचं खायला द्यायचं नाही पर्यायानं आपणही खायचं नाही. हा नियम आपण दोघांनी ठरवला होता. पण त्याची अंमलबजावणी फक्त मी एकटीच करत होते, त्यात तू कुठे होतास? बाहेरून आलं कि पहिल्यांदा मला साडी, ड्रेस बदलायला लागतो तुला माहिती आहे. पण आरवला भूक लागली असेल म्हणून त्याच चिकचिकलेल्या कपडयांत राहून मी जेवण बनवायचं, आरवला तुला वाढायचं, मग वॉश घेऊन मी जेवायचं एकटीने. मी जेवण बनवत असताना तुम्ही दोघं फ्रेश होऊन टीव्ही बघणार, मी जेवताना, मागचं आवरताना तुम्ही दोघ झोपणार. अनेकदा मी विचार करायचे कि हे चित्र उलटं असू शकत का? म्हणजे ‘मी आणि आरव’ टीव्ही बघतो आहोत आणि तू जेवण बनवतो आहेस. आणि ट्रस्ट मी, ”इतकी मॉडर्न असून सुद्धा हा विचार आला कि माझं मलाच हसू यायचं” तसा तू समजूतदार आहेस, ”मला तुझ्यापासून वेगळं व्हायचं आहे आणि मला त्याच कारण सुद्धा देता येत नाहीये किंवा मी दिलेली कारणं कोर्टाला चालणार नाहीत हे समजून तू स्वतः माझ्यापासून वेगळा झालास. आपण कदाचित एकमेव असू जे लग्नात आहेत पण बंधनात नाहीत. पण माझी कारणं तू समजून घेतली नाहीस किंवा तुला ती समजता आली नाहीत. माझ्या निर्णयाचा तू मान ठेवलास पण त्याचा स्वीकार केला नाहीस.
काल रात्री पत्र इथेच थांबवलं होतं. रात्री वाटलं होतं कि हे असंच अर्धवट पत्र तुला पाठवावं आणि सांगावं की कर पुर्ण.
आपल्या कथेचा शेवट तुझ्या लेखी कसा आहे हे जाणून घेता आलं असतं. कारण, जेव्हा जेव्हा मी तुझ्या मनातला शेवट जाणून घ्यायचा हट्ट केला तेव्हा तेव्हा ‘तू वागते आहेस ना तुझ्या मनासारखं मग झाला कि शेवट’ असचं म्हणत आलास तू! पण, आज सकाळी उठले तेव्हा टेबलावर पडलेलं अर्धवट पत्र दिसलं आणि त्याकडे दुर्लक्ष करून पुढे जायला निघाले तर मी घर सोडून जातानाचे तुझे शब्द आठवले.
तुला आठवतयं ना, घर सोडून जायच्या दिवशी मी खोलीतचं कितीतरी वेळ सुन्न होऊन बसले होते. तू आलास आणि विचारलसं, “आरवला सांगितलं आहेस ना? कि उद्या पासून तू नाही आहेस?” मला त्याक्षणी वाटलं इतका भावनाशून्य कसा झाला आहेस तू? कि भावना लपवण्याची इतकी सवय झाली आहे तूला, कि कधी त्या चेहऱ्यावर दिसल्या तर संपूर्ण चेहरा कंदिलाची काजळी ल्यायल्यासारखा दिसतो. किंवा भावनांना लपविण्यासाठी व्यावहारिक असण्याचं ढोंग करतोस तू. कि तसाच होतास आणि मला समजलं नाही?
तुझा तो कोरडेपणा बघून मी मात्र रडायला लागले. “आरवला काय सांगणार होते मी? तुझ्या आईला आई बनण्याचा कंटाळा आलाय? आणि म्हणून ती घर, बाबा सगळ्यांना सोडून चाललीये? कसं समजू शकणार होता आरव कि त्याची आई, आई असण्याआधी सुद्धा एक स्वतंत्र व्यक्ती आहे. आणि त्या व्यक्तिची इथे घुसमट होते आहे, माझ्या मातृत्वाची नाही. कसं समजू शकणार होता तो हे सगळं. मी त्याला न सांगता निघून जाणार होते. त्याची आई आणि माझ्यातील ‘मी’ यातं मी स्वतः ला निवडत होते. त्याला बघून माझ्यातली आई जिंकेल आणि मी अडकून पडेन म्हणून घाबरतं होते.
मी तूझ्याकडे एकदाचं असाहय पणे बघितलं आणि तू माझ्या जवळ येऊन बसलास. डोळ्यातील अश्रूंनी ओले झालेले गाल आपल्या ओंजळीत पकडत म्हणालास, “मने, आपण गोष्टींना निरोप देताना चूकायला नको कधी. कितीही अवघड वाटला तरी निरोप द्यायला हवा. आपण निर्माण करत असलेल्या नव्या आयुष्यात या अर्धवट निरोपांची लक्तरं नको घेऊस सोबत. कितीही अवघड वाटलं तरी इथले सारे पाश, इथेच सोडून जा. अगदी मोकळी हो, कोरी हो आणि बाहेर पड.
जेव्हा जेव्हा हा प्रसंग डोळ्यासमोर येतो तेव्हा तेव्हा तुला मिठी मारावीशी वाटते. निरोप घेण्याची, मोहातून बाहेर पडण्याची ताकद तू मला दिलीस. कधीतरी मी चूकले कि काय असं वाटतं आणि चर्रकन तुझे शब्द कानी येतात, ”सुखासुखी घर सोडते आहेस तू.” डोळ्यासमोर येतो ‘तूझं आणि माझं सूख यातला फरक न समजलेला तू”
तरीही तूझं कौतूक वाटतं आरवला तू वाढवतोस, महिन्यातून एकदा आपण तिघं बाहेर जातो. मला त्याच्या आठवडाभरातील घडामोडींचा तपशील देतोस. मी काय प्रश्न विचारायला हवेत हे सांगतोस. तू एकटा संसार करतोस, पालक बनतोस, स्वतःला, आरवला सांभाळतोस.
डोंबाऱ्यांच्या दोरीवरून चालणाऱ्या मुलीसारखा तोल न जाता तू अथक चालतो आहेस. तू कधीमध्ये कसरती करतोस आईविना पोर सांभाळण्याची, सोडून गेलेल्या बायकोला आधार देण्याची, इतका त्रास देऊनही तिची काळजी घेण्याची, घरचा डोलारा नीट सांभाळण्याची कसरत! आजुबाजुचे लोक टाळ्या वाजवतात. तुला अजून हुरूप येतो, चांगुलपणाची एक एक बिरूदावली घेत तू कसरत राहतोस. मला कधीही हि कसरत जमलीच नाही. मुळात, तोल सावरण्यापेक्षा तोल ढळण्याची मजा, त्यातून उभे राहण्याची मजा आणि हा सगळा व्याप स्वतःसाठी करत राहणं मला नेहमी आवडतं. पुढे माझं काय होईल, माहिती नाही, कसं होईल माहिती नाही. माझा सगळा अट्टाहास आजच्यासाठी आहे. हे पत्र खरं तर तुझा निरोप घेण्यासाठी नव्हतं लिहिलं. पण, निरोपासाठी आणखी दुसरं समर्पक काय असणार? माझ्या निर्णयांना मान देण्याऐवजी त्यांचा स्वीकार केला असतास तर? तुझ्या डोंबाऱ्यांच्या खेळात मी सामील झाले असते तर? या जर-तर ला आता काही अर्थ उरत नाही. आपल्या नात्याने आता निरोप घ्यायला हवा. आणि आपल्या वठलेल्या नात्याला या निरोपाचं खत-पाणी घालून त्यावर नवीन नात्याची पालवी फुटु द्यायला हवी. असं नातं ज्यात माझी स्वतंत्रता तुला त्रयस्थपणे बघता येईल. आणि, तुझा टाळ्यांच्या गजरात अविरत चालणारा डोंबाऱ्याचा खेळ मला मनाची कवाडं सताड उघडून बघता येईल.
पहिलं नातं असफल असतानाही, त्या नात्याच्या मातीवर नवीन नातं फुलवु पाहणारी…
तुझी पालवी.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here