महाराष्ट्रकवी – कवी यशवंत

‘महाराष्ट्रकवी’ या नावाने गारविलेले प्रसिद्ध – कवी यशवंत दिनकर पेंढरकर. आधुनिक मराठी कवी परंपरेत राजकवी यशवंत यांना महत्त्वाचे स्थान आहे. “रविकिरण मंडळातील’ सप्तर्षींमध्ये माधव जूलियन सोबत यशवंत यांच्या नावांचा अग्रक्रमाने उल्लेख केला जात असे. यशवंतांच्या प्रेमकवितेत प्रीतिसाफल्य, तिची विफलता, मृत्यूवर मात करणारे तिचे चिरंजीवीत्व इत्यादी छटांचे चित्रण आढळते. त्यांच्या प्रेमकवितेवर रविकिरणमंडळातील कवींचा ठसा उमटलेला दिसतो. केवळ प्रियकराच्या नवथर भावनांचे प्रकटीकरण करण्यात त्यांची प्रतिभा रमत नाही. कल्पनासृष्टीतील प्रेयसीच्या सौंदर्याचे मानसिक चिंतन करण्याची प्रवृत्ति त्यांच्यात आढळते. स्त्रीच्या शारीरिक सौंदर्यामुळे पुरुषाच्या मनात प्रीतीभाव निर्माण होत असला तरी, त्याची परिणती आत्मिक मिलनात होणे ही खरी कसोटी. प्रेयसीच्या अंतःकरणातील उदात्ततेला कवी प्राधान्य देतो. यशवंतांनी राष्ट्रीय वृत्तीचा परिपोष करणारी आणि सामाजिक आशयाची कविता लिहिली. महाराष्ट्र प्रेमाकडून राष्ट्रप्रेमाकडे त्यांच्या कविमनाचा विकास होत गेला. इतिहासातील स्फूर्तिप्रद क्षणांचे शब्दांकन करणारी, महापुरुषांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी भावनात्मक आवाहन करणारी कविता त्यांनी लिहिली.
त्यांच्या प्रतिभेने निरंतर स्वांतत्र्यांचा ध्यास घेतला. “आकाशातील तारकांच्या राशी लाथेच्या प्रहाराने मी झुगारीन. पण स्वातंत्र्यलक्ष्मी, तुझ्या चरणांशी लीन होईन. (स्वातंत्र्यलक्ष्मीस मुजरा/यशोधन) “स्वातंत्र्यभानूने भारतात लवकर दर्शन द्यावे. तेव्हाच आपण पावन होऊ. असे ते उद्‌गारतात. (तुरुंगाच्या दारात/यशोधन) “तुटलेल्या तारा’ या विलापिकेत राष्ट्रीय भावनांचे दर्शन घडते. “सिंहाची मुलाखत’ या कवितेत राष्ट्रीयता आणि मानवता या दोन्ही मूल्यांचा पुरस्कार ते करतात. “गुलामाचे गाऱ्हाणे’ आणि “इशारा’ या प्रतिकात्मक आशय करणाऱ्या कविता आहेत. राष्ट्रजीवनातील पुरूषार्थाला जाग आलेली आहे, तिचे प्रतिबिंब या कवितांत आढळते. जीवनाचे विविध पैलू यशंवतांनी आपल्या कवितेतून आकळले. त्यांची कविता विविधरुपिणी आणि विपुल आहे. १९१५ ते १९८५ या सत्तर वर्षांच्या प्रदीर्घ कालखंडात त्यांनी काव्यनिर्मिती केली. त्यांच्या स्फुट कवितेत सुनीतांचा समावेश आहे. “बंदीशाळा’ हे बालगुन्हेगांरांच्या करुण स्थितीचे चित्रण करणारे खंडकाव्य आहे. “काव्यकिरीट’ हे बडोद्याच्या राजपुत्राच्या राज्यारोहणविषयावरील खंडकाव्य आहे. “जयमंगला’ मधील २२ भावगीतांमधून यशवंतांनी हृदयसंगम प्रेमकथा साकार केली आहे. यात प्रयोगशीलता आहे. म्हटले तर यातील प्रत्येक भावगीते ही स्वतंत्र कविता आहे. दुसरीकडे एकत्र गुंफलेली ही मालिका-कविता आहे. शिवाजी महाराजांच्या जीवन त्यांनी “छत्रपती शिवराय’ हे महाकाव्य रचले. “मुठे, लोकमाते’ हे दीर्घकाव्य पानशेत धरण फुटले त्या दुर्घटनेवर आधारलेले आहे. “मोतीबाग’ हा त्यांचा एकमेव बलगीतांचा संग्रह आहे. यशवंतांचा काव्यप्रवास हा एका प्रयत्नवादी आणि अनुभवसंपन्न व्यक्तिमत्त्वाच्या जीवनविकासाचा आलेख आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here