विपुल साहित्यनिर्मितीचे स्वतंत्र स्थान निर्माण करणारे लेखक मधु मंगेश कर्णिक

मराठी भाषेतील कथाकार, कादंबरीकार, कवी, संवाद लेखक मधु मंगेश कर्णिक. पद्मश्री पुरस्काराने सन्मानित झालेल्या कर्णिकांनी गेल्या सहा-सात दशकात सातत्यपूर्ण लेखन करून साठोत्तरी कालखंडात स्वतःचे आगळे वेगळे स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या समृद्ध आणि वाड्मयीन व्यक्तिमत्वाला अनेक पैलू आहेत. त्यांनी कथा, कादंबरी व ललितगद्य या वाड्मयप्रकारात विपुल निर्मिती केली. याबरोबरच कविता, नाटक ,चरित्र व आत्मचरित्र हे वाड्म़यप्रकारही हाताळले. त्यांचे कथा आणि कादंबरी वाड्मयप्रकारातील योगदान लक्षणीय आहे.

मानवी व्यवहाराचे सूक्ष्म निरीक्षण, मनुष्यस्वभावाचे अचूक ज्ञान, कमालीचा आत्मविश्वास, प्रचंड कष्ट घेण्याची तयारी, सदैव हसतमुख, जन्मजात प्रतिभा आणि समृद्ध अनुभवविश्व या कारणामुळे कर्णिकांच्या कथात्मक लेखनात मानवी जीवन आणि निसर्ग निर्मितीबद्दलच कुतूहल प्रकटले आहे. अनेक जातीची, धर्माची, पंथाची माणसे त्यांच्या कादंबरीत पहावयास मिळतात. नातेसंबंधातील गुंतागुंत, नियतीशरणता, मन आणि देहबोलीतील उत्कटता, दरिद्री भुकेकंगाल माणसाबद्दलची करुणा, परंपरा आणि आधुनिकता यातील संघर्ष त्यांच्या कथात्मक साहित्यात पहावयास मिळतो. महानगर आणि ग्रामीण जीवन म्हणजेच मुंबई आणि कोकण हे कर्णिकांच्या लेखनाचे केंद्र राहिले आहे तसेच जीवन अनुभवातील विविधता हे त्यांच्या वाड्मयाचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

आपल्या आगळ्यावेगळ्या व विपुल साहित्यनिर्मितीचे स्वतंत्र स्थान निर्माण करणाऱ्या लेखकांत मधू मंगेश कर्णिक यांचे नाव महत्त्वपूर्ण आहे. मधु मंगेश कर्णिक यांची पहिली कथा – कृष्णाची राधा – ही रत्नाळकर मासिकातून प्रसिद्ध झाली.’कोकणी गं वस्ती’ हा त्यांचा पहिला कथासंग्रह. कथा, कविता, नाटक, कादंबरी, ललित गद्य, बालवाङ्‌मय, अशा सर्वच साहित्यप्रकारांमध्ये लेखन करून कर्णिकांनी आपल्या प्रतिभेचा प्रत्यय वाचकांना वेळोवेळी दिला. मधु मंगेश कर्णिक यांनी आशयाच्या अंगाने मराठी कादंबरीत वैविध्य आणले.

ज्या भूमीशी आपली नाळ बांधली गेली आहे, त्या भूमीशी आत्मियतेने बंध राखून आणि आपल्या अनुभव विश्वाशी निगडित राहून त्यांनी प्रदीर्घकाळ कथालेखन केले. कोकणी गं वस्ती, पारघ, तोरण, मंत्र, भुईचाफा, मांडव, गुजा, संकेत, तहान, डोलकाठी, झुंबर, केवढा, गवळण, अनिकेत, उत्तरायण इत्यादी ४१ कथासंग्रह प्रकाशित झाले आहेत. मधु मंगेश कर्णिक कथाकार, कादंबरीकार म्हणून सुप्रसिद्ध आहेत. कोकणातील मालगुंड येथे केशवसुतांचे सुंदर स्मारक उभारण्यासाठी मधु मंगेश कर्णिक यांनी अपार कष्ट घेतले आणि स्वतःचे अवघे ‘गुडविल’ त्याकामी लावले. महाराष्ट्रातल्या पंचाहत्तर नामवंत कवींची माहिती, फोटो आणि एक उत्कृष्ट कविता असे या स्मारकाचे स्वरूप आहे.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here