ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व्यंकटेश दिगंबर माडगूळकर

0
1030
photo courtesy : goodreads

मराठी भाषेतील ज्येष्ठ ग्रामीण कथाकार व कादंबरीकार कै. व्यंकटेश दिगंबर माडगूळकर. व्यंकटेश माडगूळकर यांचा जन्म सांगली जिल्ह्यातील माडगूळचा. औपचारिक शिक्षण मॅट्रिकपर्यंतही झाले नाही. तथापि त्यांनी स्वप्रयत्नाने वाङ्मयाचा व्यासंग केला. इंग्रजी शिकून पाश्चात्य साहित्याचेही वाचन केले. मराठी कवी, गीतकार ग.दि. माडगूळकर यांचे हे धाकटे बंधू होत. अद्भुतता, स्वप्नरंजन, कल्पनारम्यता ह्यांच्या ह्या पकडीतून सुटलेल्या वास्तववादी ग्रामीण साहित्यकृतींचा आरंभ त्यांच्या ह्या कथासंग्रहापासून झाला.

‘माणदेशी माणसे’ (१९४९) हा त्यांचा कथासंग्रह प्रसिद्ध झाला होता. त्यातील व्यक्तिरेखांतून त्यांनी ग्रामीण माणसाचे जे अस्सल आणि जिवंत दर्शन घडविले त्यानंतर गावाकडच्या गोष्टी, हस्ताचा पाऊस, सीताराम एकनाथ, काळी आई, जांभळीचे दिवस ह्यांसारखे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले. त्यांच्या कथांचे अनुवाद डॅनिश, जर्मन, जपानी आणि रशियन अशा विविध जागतिक भाषांत झालेले आहेत. ग्रामीण कथेप्रमाणेच ग्रामीण कादंबरीच्या संदर्भातही त्यांनी मोलाची कामगिरी बजावली. बनगरवाडी, वावटळ, पुढचं पाऊल, कोवळे दिवस, करुणाष्टक, आणि सत्तांतर, ह्या त्यांच्या कादंबर्यां उल्लेखनीय आहेत. व्यंकटेश माडगूळकर हे १९४२ च्या स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झाले होते. ‘कोवळे दिवस’ ह्या कादंबरीत अशाच एका कोवळया स्वातंत्र्यसैनिकाचे अनुभव आहेत.

‘पुढच पाऊल’ ही त्यांच्याच एका कथेवरून त्यांनी लिहिलेली कादंबरी. एका दलित कलावंताच्या जीवनावरील ह्या कादंबरीत त्याच्यावरील अन्याय त्याबद्दची त्याची चीड आणि पुढचे पाऊल टाकून प्रगतीचा मार्ग शोधण्याची दलित मनाची धडपड दाखाविली आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी नाटकेही लिहिली, ‘तू वेडा कुंभार’, ‘सती’, ‘पति गेले गं काठेवाडी’ ही त्यातील काही विशेष उल्लेखनीय होत. ‘कुनाचा कुनाला मेळ न्हाई’ आणि ‘बिनबियांचे झाड’ ही त्यांनी लिहिलेली लोकनाट्येही गाजली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here