महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे

महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व कै. पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. पु. ल. या आद्याक्षरांवरुन ओळखले जाणारे एक प्रतिभावान लोकप्रिय मराठी लेखक, नाटककार, नट, कथाकार, पटकथाकार, दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक, कवी, नकलाकार आणि शिक्षक अशा विविध कलाक्षेत्रात ते पारंगत होते. लोकांच्या वागण्यातील विसंगती आणि हास्यास्पद गोष्टी हेरून पु.ल. त्या लोकांच्या नकला करायचे. मराठी साहित्य व संगीतातील योगदानाव्यतिरिक्त पु.लं.चे आकाशवाणी, दूरदर्शन, नाट्य व चित्रपट क्षेत्रातील कार्य लक्षणीय आहे. ते उत्तम संवादिनी वादक होते, तसेच त्यांनी काही चित्रपटांचे संगीत दिग्दर्शनही केले.

पु. ल नी मराठीवर खूप प्रेम केले आणि त्या भाषेतील सर्व बोलीभाषा त्यानी आपल्या मानल्या. संगीत नाटके भरात होती, तो मराठी रंगभूमीचा सुवर्ण काळ जो होता त्याचे सर्व नजाकतीसह दर्शन घडविताना त्यानी मराठी रंगभूमीचे सांस्कृतिक संचित जोपासले. दूरदर्शनच्या पहिल्यावाहिल्या प्रसारणासाठी पंडित नेहरूंची दूरदर्शनसाठी मुलाखत घेणारे पुलं हे भारतीय दूरदर्शनचे पहिले मुलाखतकार होते. पु. ल. यांना एक खेळिया मानले जाते, कारण ते एक श्रेष्ठ सादरकर्ते होते. त्यांच्या लेखनात शिल्प, चित्र, संगीत, अभिजात साहित्य, तत्वज्ञान, नाटक, अशा साऱ्या क्षेत्रांविषयी सृजनशील चिंतन खेळकरपणे मांडले आहे.

मार्मिक, सूक्ष्म, चोखंदळ आणि प्रसन्न विनोद हे सामान्यतः त्यांच्या साऱ्याच लेखनाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य होते. त्यांच्या वक्तृत्वातही हे गुण आढळून येतात. मराठीत श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांपासून प्रल्हाद केशव अत्र्यांपर्यंत चालत आलेली विनोदाची परंपरा देशपांड्यांनी पुढे नेली व ती अधिक तरल, अभिरुचिसंपन्न, कलात्मक व आधुनिक बनवली. उपहास-उपरोध, विसंगती, वक्रोक्ती श्लेष आदींचा उपयोग ते सारख्याच कौशल्याने करीत असले, तरी त्यांच्या विनोदात मर्मघातक डंख नसतो कारण मानवी जीवनातील त्रुटींप्रमाणेच त्यातील कारुण्याची ह्या विनोदाला जाण आहे हास्याच्या कल्लोळात तो अश्रूंनाही हळुवार स्पर्श करतो. हासू-आसूंच्या ह्या हृदयंगम रसायनाने त्यांच्या विनोदाला श्रेष्ठ दर्जा प्राप्त करून दिला आहे. त्यात संस्कृतिटीकेइतकीच संस्कृतीच्या जपणुकीची ओढ आहे. देशपांड्यांची विनोदी लेखनाची शैलीही चतुरस्र, बहुढंगी आहे. प्राचीन महानुभाव गद्यापासून मर्ढेकरी शब्दकळेपर्यंतचे सारे ढंग तिने सहजपणे आणि सुभगपणे आत्मसात केलेले आहेत.

अभिरुची ह्या मासिकातून १९४३ च्या सुमारास त्यांनी लेखन करावयास आरंभ केला. त्यानंतर महत्त्वाच्या अन्य मराठी नियतकालिकांतूनही त्यांचे लेखन प्रसिद्ध होऊ लागले. लेखनाच्या जोडीने त्यांची नाट्योपासनाही चालू होतीच. नाट्यक्षेत्रातील यशामुळे चित्रपटसृष्टीतही त्यांचा प्रवेश झाला. ह्या क्षेत्रात त्यांच्या बहुगुणी व्यक्तिमत्त्वाला अधिक अवसर मिळाला. पुढचे पाऊल ह्या महाराष्ट्रात गाजलेल्या तमाशा-चित्रपटात त्यांनी नायकाची यशस्वी भूमिका केली. गुळाचा गणपती ह्या त्यांच्या प्रसिद्ध चित्रपटाचे कथा-संवादलेखन, दिग्दर्शन, संगीत दिग्दर्शन आणि प्रमुख भूमिका एवढ्या जबाबदाऱ्या त्यांनी पेलल्या होत्या.

वयम् मोठम् खोटम् आणि नवे गोकुळ ही त्यांनी लहान मुलांसाठी लिहिलेली नाटके. पुढारी पाहिजे हे त्यांनी लिहिलेले लोकनाट्य प्रभावी ठरले. त्यात जनतेचे पुढारीपण करू इच्छिणारे विविध राजकीय पक्षांचे लोक आणि प्रत्यक्ष जनता ह्यांच्यातील दरी त्यांनी खेळकर, विनोदी पद्धतीने दाखवून दिली आहे. अभिरुचीत त्यांनी १९४४ साली ‘भय्या नागपूरकर’ नावाचे एक लहानसे व्यक्तिचित्र लिहिले. त्यानंतर त्यांनी लिहिलेली अनेक व्यक्तिचित्रे १९६२ साली व्यक्ति आणि वल्ली ह्या नावाने प्रसिद्ध झाली. मराठी समाजात–मुख्यतः मध्यम वर्गीय–पाहावयास मिळणाऱ्या नमुनेदार माणसांची ती जीवंत, प्रतिनिधिक चित्रे आहेत.

मंगेश पाडगांवकरांनी पु.ल. देशपांड्यांवर वर केलेली कविता –
पु. ल. स्पर्श होताच दुःखे पळाली.
नवा सूर आनंदयात्रा मिळाली.
निराशेतूनी माणसे मुक्त झाली.
जगू लागली हास्य गंगेत न्हाली..

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here