पर्यायी जीवन जगताना…

Woman_Sunset

१२ राशी आणि २७ नक्षत्रांमध्ये अडकून गेलेले गुण, छत्तीसच्या छत्तीस जुळले तरी लग्नानंतर मनं जुळून आली की मिळवलं. घटस्फोटित व्यक्तींचं एकाकीपण हे त्यांनी कधी स्वतःहून ओढून घेतलेलं असतं किंवा त्यांच्या नशीबी आलेलं असतं. पुनर्विवाहामध्ये येणाऱ्या अडचणी, सर्व दुःखांचा पडलेला विसर, कितीही नकोसा वाटला तरी तो वर काढावाच लागतो. त्याशिवाय पुढचं पान हलणार कसं?
संसार नावाची सुखद कल्पना ही लग्नानंतर बदलते. दोन व्यक्तींमधील स्वभाव हे परस्परपूरक कधीच असू शकत नाहीत. हाताची पाचही बोटे एक नसतात, तर त्यात मानवी मन, त्या मनाच्या आवडी निवडी किती वेगळ्या? आणि म्हणूनच १२ राशी आणि २७ नक्षत्रांमध्ये अडकून गेलेले गुण, छत्तीसच्या छत्तीस जुळले तरी लग्नानंतर मनं जुळून आली की मिळवलं. इथे सर्व जुळवून घ्यावं लागतं. स्त्री असो वा पुरुष, दोघांच्या वाटेला आलेली ही व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला आहे. मुद्दाम स्त्रीचे मन या कवितेत मांडले आहे. त्यावर आधारित पुढची कविता…

~ कविता / कल्पेश वेदक

मावळतीच्या क्षितिजासंगे भ्रांत उद्याची असताना
कोमेजलेल्या कुसुमांवर प्रीती कुणाची नसताना
जमलेल्या या गर्दीमध्ये वाट स्वतःची बघत बघत
एकटीच मी सावरते मज पर्यायी जीवन जगताना

पुन्हा पुन्हा त्या आवडी निवडी गुजगोष्टी सांगताना
नको नको त्या विषयांचे उगाच फाटे फुटताना
कधी केव्हा कोण होईल तयार मला पसंती देत देत
एकटीच मी सावरते मज पर्यायी जीवन जगताना

उद्रेक होऊ बघतो मनाचा भूतकाळ आठवताना
कितीदा हृदयास छळायचे कटु स्मृती त्या स्मरताना
उफाळलेल्या लाटांमध्ये शांत स्वतःला करत करत
एकटीच मी सावरते मज पर्यायी जीवन जगताना

~ कल्पेश वेदक

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here