मराठी भाषेतील एकांतप्रिय, अलिप्त, प्रसिद्धी परांङ्मुख वृत्तीचे लेखक, कथाकार कै. जी. ए. कुलकर्णी. गुरुनाथ आबाजी कुलकर्णी अर्थात जीए यांचा जन्म १० जुलै १९२३ रोजी बेळगावमधील कोनवाळ गल्लीत झाला. मायेच्या माणसांच्या ताटातुटीमुळे जीएंना बालपणीच शोकात्मतेचे दर्शन घडले. ते गंभीर आणि अंतर्मुख बनले. सख्खे भावंड नव्हते. आईवडिलांच्या प्रेमाला मुकले. अखेरपर्यंत ते अविवाहित राहिले.
घरच्या गरिबीच्या परिस्थितीमुळे जीएंचे बालपण बेळगावात मामांच्या घरी गेले. लहान वयात जवळच्यांचा झालेल्या मृत्यूच्या अनुभवाबरोबरच, समाज नातेवाइक यांच्याकडून कटू अनुभव आलेल्या जीएंमधील व्यक्ती दु:खाने, प्रतिकूल परिस्थितीने पोळलेली दिसते. जीएंमधील माणसाने स्वत:च आपल्या आयुष्याला आकार दिला. १९३९ साली ते मॅट्रिक झाले. बीए, एमए इंग्रजी विषयातून पूर्ण करून १९५० ते १९७९मध्ये निवृत्त होईपर्यंत त्यांनी धारवाडच्या जनता कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्य केले. शिस्त आणि वक्तशीरपणाबद्दल त्यांची ख्याती होती. सकाळी ६.४५ वाजता ते महाविद्यालयात हजर असत. सकाळी ७ वाजताच्या तासासाठी तशा थंडीतही विद्यार्थ्यांची भरगच्च उपस्थिती असत. स्वत: जीएंनाही आपल्या शिक्षकी पेशाचा अभिमान होता. महाविद्यालयात त्यांचा दरारा असा होता, की त्यांच्या वर्गात कोणी उशिरा प्रवेश करीत नसे. करड्या व्यासंगी आणि प्रेमळ अशा जुन्या शिक्षकांच्या अस्तंगत होणाऱ्या पिढीपैकी जीए एक होते.
जीएंचे वाचन अफाट होते. एमएला असताना पाचशे ते सहाशे पाने ते रोज वाचत. आपण प्रोफेशनल रीडर आहोत, असे ते म्हणायचे. त्यांच्या अभ्यासिकेत कोणाला प्रवेश नसे. त्याप्रमाणे त्यांच्या खासगी आयुष्यात डोकावून पाहण्याची कुणाला संधी नसे. ते एकांतप्रिय, अलिप्त, प्रसिद्धी परांङ्मुख वृत्तीचे होते. भाषणे, सत्कारसमारंभ, मुलाखती, साहित्य संमेलने इत्यादी गोष्टी त्यांनी कटाक्षाने टाळल्या. आयुष्यातले चढउतार पाहिलेल्या या लेखकानं मानवी स्वभावांचे वेगवेगळे नमुने त्यांच्या कथांतून आपल्यासमोर उभे केलेच, पण त्याचबरोबर या अवकाशाशी, त्यातल्या निसर्गाशी माणसाचं असलेलं आंतरिक नातं आपल्या कथांतून उभं केलं. लेखकाशी संवाद साधायचा तो त्याच्या लेखनाद्वारे. कारण लेखक त्याच्या लेखनातच भेटतो, प्रत्यक्षात नव्हे. मात्र, जीएंची ही भूमिका अनेकांना कळलीच नाही. या एकांतवासाला जीए अनामिकता म्हणायचे.
– वरील लेख आबासाहेब गरवारे महाविद्यालयात मराठी विभागात कार्यरत असलेल्या लेखिकेने लिहिला आहे.