प्रसिद्ध मराठी भावगीतगायक आणि संगीतदिग्दर्शक सुधीर फडके. त्यांचे पूर्ण नाव रामचंद्र ऊर्फ सुधीर विनायकराव फडके. पण बाबूजी या नावाने ते अधिक परिचित होते. त्यांचा जन्म कोल्हापूर येथे झाला. आई सरस्वतीबाई त्यांच्या बालपणीच निवर्तल्या (१९२८). वडील विनायकराव वकील होते. बाबूजींचे शालेय शिक्षण कोल्हापुरात झाले. गायनाचार्य पं. वामनराव पाध्ये आणि बाबूराव गोखले यांच्याकडे बाबूजींनी काही वर्षे शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले. प्रतिकूल परिस्थितीमुळे त्यांना वयाच्या चौदाव्या वर्षापासूनच शिकवण्यांचे व संगीत शिक्षकाचे काम करावे लागले.
शास्त्रीय संगीतापासून कोठीसंगीतापर्यंतचे सर्व संगीतप्रकार बाबूजींनी अत्यंत कौशल्याने हाताळले. गायकांनी सुस्वर व सुस्पष्ट उच्चारात गायले पाहिजे असा त्यांचा नेहमी आग्रह असे. त्यांनी कारकीर्दीतील सर्वाधिक सौंदर्यपूर्ण, कालसुसंगत आणि माध्यमानुरूप प्रासादिक संगीतनिर्मिती केली; त्यांच्या गायकीची सुस्पष्ट व अर्थगर्भ शब्दोच्चार, आशयघन भावपूर्णता, प्रसंगी जोशपूर्ण गायकी, आवश्यक तेथे मखमली स्वरलगाव ही बलस्थाने होती. तसेच गाताना त्यांनी वापरलेली श्वासाची तंत्रे, स्वरचिन्हांची आंदोलने, मींडयुक्त स्वरोच्चारण पद्धती अशा अनेक वैशिष्ट्यांमुळे त्यांची गायकी परिणामकारक ठरली. बालगंधर्व, हिराबाई बडोदेकर, कुंदनलाल सैगल यांना ते गुरुस्थानी मानत. या सर्वांच्या संगीताचे श्रवण करून त्यांनी आपली विशिष्ट संगीतशैली निर्माण केली. जी आज ‘फडके स्कूल’ म्हणून ओळखली जाते. मराठी सुगम संगीताचा चेहरा ‘फडके स्कूल’मुळे आमूलाग्र बदलला. त्यांच्या चाळीस वर्षांच्या प्रदीर्घ कारकीर्दीला मराठी चित्रपट संगीताचे ‘सुवर्णयुग’ असे संबोधले जाते. बाबूजींच्या जीवनाचा अनोखा पैलू म्हणजे त्यांची प्रखर राष्ट्रभक्ती, ध्येयनिष्ठा, सर्जनशीलता आणि समाजसेवा. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे निष्ठावान कार्यकर्ते होते आणि काही काळ प्रचारक होते. गोवा मुक्तिसंग्रामात त्यांचा सहभाग होता. दाद्रा व नगरहवेली मुक्तिकरिता बाबूजी आणि त्यांच्या पत्नी ललिताबाई या दोहोंचा सहभाग होता.
१९५५ साली पुणे आकाशवाणीवर प्रसिद्ध झालेल्या आणि साहित्यिक ग. दि. माडगूळकर यांनी रचलेल्या गीतरामायणातील गीतांना बाबूजींनी उत्स्फूर्त चाली दिल्याआणि स्वत: ती गीते गायिली. या स्वरशिल्पाने इतिहास रचला. १९५८ पासून गीतरामायणाचे शेकडो कार्यक्रम महाराष्ट्रासह भारतात आणि परदेशात झाले. आजही गीतरामायण म्हटले की मराठी-अमराठी माणूस भावोत्कट होतो. शब्द व स्वर यांचा रससिद्ध आणि विलक्षण परिणामकारक असा संगम गीतरामायण ऐकताना जाणवतो. गीतरामायणाचे हिंदी, गुजराती, कन्नड, बंगाली व तेलुगू भाषेत रूपांतर झाले. ही सर्व गीते गीतरामायणाच्या बाबूजींनी दिलेल्या चालीवरच गायली गेली.
कमी वेळात अधिक बंदिस्त व विविधतापूर्ण संगीत हवेसे वाटणे, ही प्रक्रिया बोलपटापासून सुरू झाली. ध्वनिमुद्रणाच्या माध्यमातून हीच प्रक्रिया पुढे नेली व त्यामुळे भावगीत रूढ होऊ लागले होते. याला अधिक समृद्ध करण्याच्या कामगिरीत बाबूजींचा हातभार मोठा आहे. शास्त्रोक्त व लोकसंगीताचा माफक वापर आणि फार हळवे न करता हळुवार गायन करणे ही बाबूजींच्या संगीतरचनांची आणि त्यांच्या गायनाची वैशिष्ट्ये होत. ग. दि. माडगूळकरांसारख्या जातिवंत मराठी कविश्रेष्ठांच्या अस्सल मराठमोळ्या गीतांना तेवढाच अस्सल मराठी स्वर बाबूजींनी दिला. मराठमोळ्या शब्दांचा व स्वरांचा हा मेळ (मेलडी) महाराष्ट्राचा चिरंतन ठेवा होय.
संदर्भ : नेरूरकर, विश्वास; चटर्जी, बिश्वनाथ, संपा., स्वरगंधर्व सुधीर फडके, गायत्री पब्लिकेशन्स.