‘गायनाचार्य’ भास्कर रघुनाथ बखले

Gayanacharya Bhaskar Bakhale

मराठी हिंदुस्तानी संगीत परंपरेतले गायक भास्कर रघुनाथ बखले. बडोद्यातील कीर्तनकार पिंगळेबुवा यांच्याकडे त्यांनी गायनकलेचा श्रीगणेशा केला. पुढे ख्यातनाम बीनकार बंदे अलीखॉं यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीत बखलेबुवांचे नाटकातील गाणे ऐकून आनंदाने बुवांची स्वतः शिकवणी घेतली. फैजमहंमदखॉं, नथ्थनखॉं आग्रेवाले यांच्याकडे भास्करबुवांचे पुढचे शिक्षण झाले. या सगळ्या अथक मेहनतीनंतर भास्करबुवा बखले यांनी ग्वाल्हेर, आग्रा, जयपूर या घराण्यांच्या गायकींवर प्रभुत्व मिळवले. नाट्यगीत, ठुमरी, भजन, टप्पा, पंजाबी लोकसंगीत, लावणी, गझल, ध्रुपद धमार, आणि ख्यालगायन या सगळ्यांवर भास्करबुवांची विलक्षण हुकमत होती. संगीतकलेवरील त्यांचे प्रभुत्व पाहून लोक त्यांना देवगंधर्व म्हणू लागले.

शास्त्रीय संगीतावर आधारित चिजांच्या चाली वापरून भास्करबुवांनी मराठी नाट्यगीते संगीतबद्ध केली. किर्लोस्कर व गंधर्व नाटक कंपन्यांत त्यांनी संगीत विषयाचे प्रमुख गुरू म्हणून काम केले. बालगंधर्व, मास्टर कृष्णराव, ताराबाई शिरोडकर, गोविंदराव टेंबे आदींना भास्करबुवा बखले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाला. नटवर्य नानासाहेब जोगळेकरांच्या प्रेरणेने ‘किर्लोस्कर भारत गायन समाजा’ची स्थापना १९११ साली पुण्यात झाली. नानासाहेबांच्या मृत्यूनंतर नुसते ‘भारत गायन समाज’ हे नाव झाले. या ‘समाजा’साठी त्यांनी खूप कष्ट सोसले. गाणे शिकणाऱ्याला आपल्यासारखे कष्ट पडू नयेत म्हणून ते दक्ष राहिले.

१९११ साली भास्करबुवांनी ‘भारत गायन समाज ही संस्था’ हिंदुस्तानी संगीत पद्धतीच्या प्रसारार्थ स्थापली. त्यांनी किर्लोस्कर नाटक मंडळीतर्फे ‘रामराज्यवियोग’ या नाटकात मंथरेची, संगीत सौभद्र या नाटकात नारदाची आणि संगीत शाकुंतलात शकुंतलेची भूमिकाही साकारल्या होत्या. त्यांनी व गोविंदराव टेंबे यांनी संगीत मानापमान व संगीत स्वयंवर नाटकांच्या पदांच्या चाली बांधल्या होत्या. याशिवाय भास्करबुवा बखले यांनी संगीत द्रौपदी व संगीत विद्याहरण या नाटकांचे संगीत दिग्दर्शनही केले होते.

त्यांच्या गायकीत तीन गुरूंची शैली एकजीव झाली होती. रागवाचक स्वरवाक्ये मींडेने परस्परांना जोडून युक्तीने व मोहकपणे संपवत समेवर येणे, चिजा म्हणताना वेगवेगळ्या स्वररचनांच्या योजना करून ती चीज नटवणे, त्याच वेळी रागाचे शुद्ध स्वरूप व वातावरण कायम राखणे हे उ. फैज महंमद खाँच्या गायकीचे ढंग भास्करबुवांच्या गाण्यात होते. लयकारी, बोलबनाव, तानेची विविधता, अनपेक्षित असा तानेचा उठाव आणि तिची सुंदर गुंफण हा उ. नत्थन खाँच्या गाण्यातला विशेष भाग बुवांच्या गाण्यात होता. सौंदर्ययुक्त डौलदार गायकी व अप्रसिद्ध रागांचे सिद्धकंठाने प्रस्तुतीकरण हा उ. अल्लादिया खाँच्या गायकीतून घेतलेला वैशिष्ट्यपूर्ण गायकीचा ‘अंदाज’ त्यांच्या गाण्यात होता. ख्यालाबरोबर ठुमरी-दादरा, टप्पा, अष्टपदी, होरी, गझल, गरबा, लावणी असे अनेकविध गीतप्रकारही ते तन्मयतेने गात. ग्वाल्हेर, आग्रा व जयपूर या तीन घराण्यांच्या एकत्रीकरणाने त्यांची अनोखी गायकी घडली व या गायकीचा प्रभाव महाराष्ट्रावर पुढची शंभर वर्षे टिकला.

  • – डॉ. सुधा पटवर्धन
Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here