रारंगढांग कांदबरीचे विश्लेषण

स्नेहा मनिष रानडे / कादंबरी विश्लेषण /

रारंगढांग हे प्रभाकर पेंढारकर यांचे अतिशय गाजलेले पुस्तक. मौज प्रकाशन तर्फे १९८१ मध्ये या कांदबरीची पहिली आवृत्ती प्रकाशित झाली. ही कादंबरी हिमालयातील पर्वतरांगांमधील आहे. हिमालयातील डोंगरांच्या उंच सुळक्यांना, कड्यांना त्या भागातील बोलीभाषेत ‘ढांग’ म्हणतात.

हिमालयातील भारत-तिबेट सीमेजवळ असलेला रारंगढांग हा एक असाच उत्तुंग सरळसोट कडा. भारतीय लष्कराला ‘General Reserve Engineering Force’ (GREF) च्या तंत्रज्ञांना ह्या रारंगढांगात रस्ता तयार करायचा असतो. विज्ञानाचा अविष्कार आणि निसर्ग यातील चढाओढ, निसर्गाचे रौद्ररूप आणि वैज्ञानिक प्रगतीच्या आधारे त्यावर मात करण्याची माणसाची धडपड, दुर्दम्य ईच्छाशक्ती, चिकाटी आणि त्या धडपडीमधे येणारे अडथळे यांचे सुंदर वर्णन असलेली कांदबरी म्हणजे रारंगढांग…

ह्या रारंगढांगात रस्ता तयार करण्यासाठी ‘ग्रेफ’ च्या इंजिनिअरर्स बरोबर लष्करातील जवान तसेच स्थानिक मजूर मोठ्या संख्येने काम करतात. या कथेतील मुख्य पात्र लेफ्टनंट विश्वनाथ मेंहदळे हा महत्वांकाक्षी इंजिनिअर तरूण मुंबईला असणारी आरामशीर नोकरी सोडून हिमालयात रस्ते बांधणी विभागात रुजू होतो. हिमालयात रस्ते बांधणे अतिशय कठीण जिकरीचे काम. त्यात विश्वनाथला भावणारे रारंगढांगाचे आकर्षण, निसर्गाचे एकीकडे सौंदर्य आणि एकीकडे रौद्ररूप याची रोचक कथा म्हणजे रारंगढांग. विश्वनाथच्या मनातील हिमालय आणि अनुभवलेला हिमालय याचे सुंदर वर्णन म्हणजे रारंगढांग कांदबरी…

विश्वनाथ हा अत्यंत हुशार, बेधडक काम करण्याची वृत्ती, निडर तितकाच हळवा, दुसऱ्याचे दु:ख समजुन मदत करणारा, प्रसंगी सिनिअर्सशी वाद घालणारा, चुका निर्दशनास आणून देणारा, नोकरीची तमा न बाळगता न पटणाऱ्या गोष्टी सिनिअर्स तसेच त्यांच्यापेक्षा मोठ्या अधिकाऱ्यांकडे मांडणारा विश्वनाथ बरोबर कांदबरीचे एक एक अंग उलगडत जाते .

विश्वनाथचा संघर्ष होतो तो हिमालयाशी, सिव्हिलियन्स विषयी पुर्वग्रह ठेवणारे मेजर बंबांबरोबर… मेजर बंबांच्या हाताखाली विश्वनाथ काम करीत असतो. मेजर बंबा हे अतिशय तडफदार, आर्मीचे कडक नियम पाळणारे, संकटांना न घाबरता तडफदारपणे तोंड देणारे व्यक्तिमत्व.. त्यांचा तडफदारपणा वेळोवेळी कादंबरीमध्ये आला आहे.

कथेसोबत पुढे सरकताना आपल्याला वेगवेगळ्या लोकांशी ओळख होते. कॅप्टन नायर, लेफ्टनंट अमर, कॅप्टन मिनू खंबाटा, कर्नल राईट, सर्जेराव गायकवाड आणि विश्वनाथची मैत्रीण उमा.. त्यातील उमदे व्यक्तिमत्व म्हणजे कॅप्टन मिनू खंबाटा. त्याचे स्वच्छंदी, रसिक मन, बिनधास्त बोलणं आपल्यावर एक प्रकारचा ठसा उमटवते. हिमालयात राहून संपूर्ण भारत मनाने फिरवूून आणण्याची मिनूची वृत्ती सर्वांना आपलीशी करते. “जीवन जगण्यासाठी आहे. खऱ्या अर्थाने जग लुटता येईल तेवढा आनंद लुट, देता येईल तेवढे दोन्ही हातांना दे” हे कांदबरीतील वाक्य त्याच्या आनंदी मनाचा,नि:स्वार्थ दृष्टीकोनाचा आढावा घेते.

उमा ही विश्वनाथची मुंबईची मैत्रीण, पेशाने चित्रकार आहे. विश्वनाथ आणि उमाचे पत्रद्वारे फुलत जाते. विश्वनाथच्या नजरेने रारंगढांगांचे अवाढव्य रूप ती मनात साठवत असते. विश्वनाथने केलेल्या वर्णनातून रारंगढांगांचे चित्र चितारण्याचा प्रयत्न करते. हळुवारपणे फुलत जाणारी प्रेमकथा ह्या कांदबरीला जिवंत ठेवते. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व वर्णनातून खऱ्या अर्थाने ओळख होते ती रारंगढांग ची. रांरंगढांग हा सतलज नदीच्या दोन्ही बाजूंना आकाशाला भिडलेला पर्वत. त्याचे वर्णन भितीदायक, रोमहर्षक असेच आहे. या रारंगढांगात रस्ता बांधणीच्या कामावर रुजू होताना विश्वनाथला ग्यानचंद नावाचा ड्रायव्हर सुभेदार मेजरसाहेब यांचा चबुतरा दाखवतो आणि विश्वनाथला प्रश्न विचारतो, “जब आदमी मर जाता है, तो उसका क्या रह जाता है?” राहते ती फक्त ‘यादगारी’, ‘आठवण’.. रारंगढांगाचे भव्यदिव्य रूप पाहताना, ग्यानचंदचे वाक्य आठवत विश्वनाथ मनाशी एक निश्चय करतो की इथे काम करताना कोणाचाही चबुतरा बांधणार नाही.

रारंगढांगात खऱ्या अर्थाने रस्ता बांधणीचे काम सुरू होते आणि सुरवात होते एका संर्घषाला, अडथळ्यांना. सर्वात पहिला अडथळा येतो तो landslide चा. ते वर्णन अतिशय चित्तथरारक आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी निसर्गापुढे त्याला वाकावेच लागते. कांदबरीतील “इथे आठ दिवसांची रजा मिळणं मुश्किल, पण कायमची रजा केव्हाच मंजुर झालेली असते.” अशा उदाहरणांनी त्याची गंभीरता लक्षात येते.

काम चालू असताना विश्वनाथला एका जागेविषयी शंका असते. तेथील मातीचे सॅम्पल तो मागवतो. तेथील जमीन भुसभूशीत असल्याने त्या जागी सिमेंट काँक्रिटचे भक्कम खांब बांधावे लागतील असा रिपोर्ट ही देतो. यावरूनच त्याचे मेजर बंबा बरोबर खटके उडतात. आपले मत मांडण्यासाठी तो थेट कर्नल राईट यांच्यापर्यत पोहचतो. आपली मते स्पष्टपणे, परखडपणे मांडतो पण आर्मीचा एकच नियम सिनिअर्सची order follow करणे. हे या ब्लडी सिव्हिलियनला जमत नाही आणि काय करावे या द्विधा मनस्थितीत विश्वनाथ अडकतो.

काम चालू असताना त्याची सर्जेराव गायकवाड बरोबर झालेली मैत्री, बहादूरसारख्या लोकल लेबर बरोबर काम करण्याची, करवून घेण्याच्या वृत्तीने विश्वनाथ तिथे रूळतो. दिलेल्या तारखेपर्यत काम पूर्ण करण्याची वृत्ती त्याच्यातही उतरते पण मनातील भिती तशीच राहते.

विज्ञानाच्या प्रगतीचे निसर्गापुढे चालत नाही या उक्तीप्रमाणे आयत्यावेळी त्या जागेचा भाग कोसळून पडतो व त्यात सर्जेराव ,बहादूर आणि त्याचे ७ लोकल लेबर गाडून मृत्यू पावतात. विश्वनाथच्या मनातील भिती खरी होते. रणांगणात सुतक पाळायचे नसते या वचनाप्रमाणे तेथील काम चालूच राहते पण या प्रसंगाचा विश्वनाथच्या मनावर गंभीर परिणाम होतो आणि तो एक धाडसी निर्णय घेतो. कोसळलेल्या जागेवर सिमेंटचे ८ खांब उभे करण्याचे ठरवितो. स्थानिक मजुरांचे कष्ट वाया न जाऊन देण्याचे ठरवितो. ८ वा खांब विचार करा कोणासाठी असेल. पण आर्मीचे नियम मोडल्यामुळे कोर्ट मार्शल ची वेळ विश्वनाथ वरच येते. प्रत्यक्षदर्शी काम बघितल्यावर लोकल लेबरच्या मनात विश्वनाथ ने जागविलेली अस्मिता, त्याची झोकून काम करण्याची पद्धत पाहून विचार करण्याची वेळ आता कोर्टावरच येते. पुढे विश्वनाथचे कोर्ट मार्शल होते का, स्थानिक मजुरांच्या प्रयत्नांना यश मिळते का? हे समजण्यासाठी कांदबरी वाचावीच लागेल.

शेवट जाता जाता “आदमी मर जाता है, तो क्या रह जाता है ?” या प्रश्नाला रूंजी घालून मानवी मनाचे पैलू, कंगोरे या कादंबरीत मांडले आहेत.. म्हणून कांदबरी नक्की वाचावी…

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here