मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक रामचंद्र भिकाजी गुंजीकर

मराठी भाषेतील मार्मिक ग्रंथकार कै. रामचंद्र भिकाजी गुंजीकर. रामचंद्र भिकाजी गुंजीकर ‘विविधज्ञानविस्तार’ मासिकाचे आद्य संपादक, मराठीतील ‘मोचनगड’ या पहिल्या ऐतिहासिक कादंबरीचे जनक, मराठी लघुलिपीचे आद्य उत्पादक होते. महाविद्यालयात असताना ‘मित्रोदय’ या वृत्तपत्रातून (१८६६) ते लेख लिहू लागले. इंग्लंडमधील ‘एडिंबरो रिव्ह्यू’ व ‘क्वार्टर्ली रिव्ह्यू’ या नियतकालिकांच्या धर्तीवर मासिक निघावे या विचाराने १८६७ मध्ये ‘विविधज्ञानविस्तारा’ची स्थापना झाली. त्याचे गुंजीकर हे पहिले संपादक. पण सरकारी नोकरीमुळे त्यांचे नाव अंकावर छापण्यात आले नव्हते. पहिल्या अंकात संपादकांनी या मासिकाचे स्वरूप पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे.: “याच्या परिमाणानुसार त्यात नानाविध विषयांचा संग्रह केला जाईल. शास्त्रीय विषय, देशज्ञान, विख्यात पुरुषांची चरित्रे, नवीन पुस्तकांचे गुणावगुणविवेचन, नीतिवादाचे निबंध इत्यादी अनेक विषयांचा संग्रह करणार आहोत.” गुंजीकरांना मराठी, संस्कृत, इंग्रजीबरोबरच गुजराती, कानडी व बंगाली याही भाषा अवगत होत्या. त्यामुळे या वाचनाच्या बळावर ते अनेक नावीन्यपूर्ण व विविध माहिती सांगणारी सदरे सजवू शकले. पहिली सात वर्षे (१८६७-१८७४) त्यांनी सातत्याने व परिश्रमपूर्वक संपादन केले. अनेक व्यासंगी विद्वानांचे सहकार्य मिळवून उच्च दर्जाचे ज्ञानप्रसारक नियतकालिक असा लौकिक त्यांनी ‘वि.ज्ञा.वि’ला मिळवून दिला. त्यांनी त्यात लिहिलेल्या लेखातील काही निवडक लेख, संकलित लेख, प्रथम खंड (१९४२) यात आले आहेत. ‘मराठी भाषा’, ‘मराठी भाषेचे कोश’, ‘देशभाषांची दुर्दशा’, ‘आपल्या भाषेची स्थिती’, ‘आपल्या भाषेचे पुढे काय होणार?’, ‘मराठी कविता’, ‘काव्यविचार’, ‘व्याकरणविचार’ आदि त्यातले लेख पाहिले म्हणजे त्यांचे सखोल विचार व तळमळ लक्षात येते. रामभाऊंना संस्कृत, प्राकृत, इंग्लिश, बंगाली, कानडी, गुजराथी आणि उर्दू या भाषा चांगल्याच अवगत होत्या. १८७७ साली त्यांनी रा.रा. काशीनाथ पांडुरंग परब यांस मदतीस घेऊन ”कौमुदी महोत्सव” नांवाचे भट्टोजी दिक्षीत यांच्या सिद्धांत कौमुदीचें भाषांतररूप त्रैमासिक सुरू केलें. परंतु दोन वर्षे चालवून आश्रयाच्या अभावामुळें तें त्यास बंद करावें लागलें. ‘रामचंद्रिका’ म्हणून संस्कृत शब्दरूपावली त्यांनी प्रसिध्द केली. भगवद्गीतेंचे सुबोध भाषांतर त्यांनी प्रसिध्द केले. शेक्सपियरकृत ‘रोमिओ ऍन्ड ज्युलियेट’ या नाटकाचें त्यानी ‘रोमकेतु विजया नाटक’ हे नावं देऊन भाषांतर करून वि.ज्ञा. विस्तारांतून प्रसिध्द केलें आहे. कानडी भाषा शिक्षकाच्या मदतीशिवाय शिकता यावी म्हणून त्यानी ‘कन्नडपरिज्ञान’ म्हणून एक पुस्तक लिहिलें आहे. तसेंच पिट्मनच्या लघुलेखन पध्दतीवरून त्यांनी मराठींत लाघवी लिपी अथवा अतित्वेरेंने लिहिण्याची युक्ति काढली. मराठीतील त्यांची दुसरी प्रसिध्द झालेली पुस्तकें ‘महाराष्ट्र भाषेची लेखन शुध्दि’ (आवृत्ति दुसरी) आणि ‘मराठी सुबोध व्याकरण’ ही होत. ब्राह्मण ज्ञातीचा आणि त्यातंहि स्वशाखेचा त्यांस मोठा अभिमान असे. आणि याचेंच फळ ‘सरस्वतीमंडल अथवा महाराष्ट्र देशांतील ब्राह्मण जातीचें वर्णन’ हे होय.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here