मराठी साहित्यातील श्रेष्ठ कवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे ‘बालकवी’. इ.स. १९०७मध्ये जळगावात पहिले महाराष्ट्र कविसंमेलन झाले. या संमेलनाचे अध्यक्ष डॉ. कान्होबा रणछोडदास कीर्तिकर यांनी त्या संमेलनात ठोंबऱ्यांना बालकवी ही उपाधी दिली. बालकवींच्या बहुतेक कवितांत निसर्ग मध्यवर्ती असला तरी रूढ अर्थाने निसर्गवर्णन हा त्यांच्या कवितांचा हेतू नव्हता. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या कविमनाचे ते सहजोद्गार होते. निसर्गातील विविध दृश्यांत त्यांना मानवी भावना दिसत. हे निसर्गाचे मानवीकरण नाही किंवा अचेतन वस्तूवर चेतनारोप नाही. ‘फुलराणी’तील एक कलिका आणि सूर्यकिरण यांची नाजूक प्रीतिकथा ह्या दृष्टीने लक्षणीय आहे. ती जेवढी अतिमानवी तेवढीच मानवी आहे. ‘अरुण’मध्ये पहाट फुलते या घटनेभोवती कल्पनाशक्तीच्या विभ्रमांचे भान हरविणारे जाळे विणले आहे; पण त्या केवळ उत्प्रेक्षा नव्हेत. त्या घटनेत भाग घेणाऱ्या निसर्गातील विविध गोष्टी तिथे सजीव होतात. इतकेच नव्हे तर कवितेच्या किमयेने रसिकही त्यांच्याशी एकरूप होतात. त्यांमागील दिव्य आणि मंगल यांच्या कवितेत अलौकिकाचा स्पर्श होतो. साध्या वर्णनात प्रतिकाची गहिरी सूचना लपलेली असते.
निसर्गसौंदर्याशी एकरूप झालेले कवी ‘बालकवी’
Advertisement