मराठी भाषेतील अग्रगण्य लेखक, कथाकार, कादंबरीकार, नाटककार आणि कवी स्व. चिंतामणी त्र्यंबक खानोलकर – आरती प्रभू. ‘ब्लार्क’ मध्ये त्यांची कथा व कविता प्रसिद्ध झाली होती, त्यानंतर सत्यकथेच्या अंकात जाणीव ही कथा प्रसिद्ध झाली; पण सत्यकथांमध्ये “शुन्य श्रुंगारते” या कवितेला प्रसिद्धी मिळाली आणि पुढे तर त्यांच्या अनेक कविता लोकप्रिय झाल्या. या सर्व कविता खानोलकरांनी “आरती प्रभू” या टोपण नावाने लिहिल्या.
फेब्रुवारी १९५४मध्ये ‘सत्यकथा’ नियतकालिकात त्यांची ‘शून्य शृंगारते’ ही कविता प्रसिद्ध झाली. आरती प्रभू या टोपणनावाने प्रसिद्ध झालेली ही पहिली कविता होती. ‘मौज’ च्या अंकात आपल्या कविता प्रकाशित झाल्याचे बघून खानोलकर बावरून गेले. त्या अवस्थेतच त्यांनी खालील कविता लिहिली.
ये रे घना
ये रे घना
न्हाउं घाल
माझ्या मना…
खानोलकरांनी सर्व प्रकारच्या वाड्मयात मुशाफीरी केली यामध्ये अनुवाद, स्फुटलेखन, बालवाड्मय, एकांकिकांचा समावेश होतो. “एक शुन्य बाजीराव”, “सगेसोयरे”, “अवध्य”, “अजब न्याय वर्तुळाचा”, “कालाय तस्मै नम:” सारख्या दर्जेदार, रहस्यमय नाटकांनी रंगभूमी तर गाजवली, पण खानोलकरांच नाव सर्वतोमुखी झाले. खानोलकरांना भीती होती की अचानक मिळालेल्या या प्रसिद्धीमुळे आपली प्रतिभा, आपल्याला मिळालेली शब्दांची ही देणगी आपल्या हातून निसटून तर जाणार नाही ना. पण तसे काही झाले नाही. त्यांच्या प्रतिभेचा सूर्य त्यांच्या अकाली निधनापर्यंत मराठी साहित्यसॄष्टीत तळपतच राहिला.