अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी बाळ सीताराम मर्ढेकर

अर्वाचीन मराठी साहित्यातील युगप्रवर्तक कवी व लेखक कै. बाळ सीताराम मर्ढेकर. ते नवकविता व नवटीका ह्यांचा प्रारंभ करणारे श्रेष्ठ साहित्यिक होते. भंग आणि ओवी ह्या प्राचीन मराठी रचनाप्रकारांचे मर्ढेकरांनी पुनरूज्जीवन केले. मर्ढेकरांची कविता ही नवकविता किंवा नवकाव्य म्हणून ओळखली जात असली, तरी पूर्वपरंपरेशी तिचे निश्चित नाते आहे. उपर्युक्त दोन रचनाप्रकारांचा मर्ढेकरांनी जो स्वीकार केला, त्यामागील कारणे केवळ तांत्रिक नव्हती. ओवी-अभंग लिहिणाऱ्‍या संतांच्या मनोभूमिकेशी मर्ढेकरांची स्वतःची भूमिकाही अनेक ठिकाणी जुळत असल्याने दिसून येते.

संतकवितेतून प्रत्ययास येणारी ईश्वरनिष्ठा, संसारातील वैयर्थ्याबद्दलची खात्री, पारलौकिक स्पर्शाची ओढ आणि गूढ उदात्तता ही सर्व वैशिष्ट्ये यंत्रयुगातील आणि युद्धोत्तर जगातील भेदक वास्तवाचे दर्शन घडवून मानवी जीवनाच्या अर्थशून्यतेची प्रचीती देणाऱ्‍या मर्ढेकरांच्या कवितेतही आढळतात, मर्ढेकरी कवितेच्या ह्या व्यापक संदर्भात केवळ अनुषंगाने आलेली तथाकथित दुर्बोधता आणि अश्लीलता हा यःकश्चित होती. परंतु मर्ढेकर कवी म्हणून वादग्रस्त ठरले, ते ह्या दोन गुणांमुळेच.

मर्ढेकरांच्या कवितेतून निराशा व वैफल्य प्रगट होते याचे कारण असे सांगितले जाते की, दुसऱ्या महायुद्धानंतर जी परिस्थिती निर्माण झाली, जीवनात जी नीरसता व कृत्रिमता आली अणि युद्धात जो मानवसंहार झाला तो पाहून त्यांचे मन विषण्ण झाले. त्यावर काही उपाय नसल्यामुळे त्यांच्या मनातील विफलता काव्यातून उमटली. बा.सी. मर्ढेकर हे भाषाप्रभू होते. त्यांच्या काव्यात आशय आणि अभिव्यक्ती यांचा सुसंवाद आढळतो. परंपरागत सांकेतिक उपमान व प्रतिमा न वापरता त्यांनी नव्या प्रतिमांचा उपयोग केला त्याचबरोबर ते आपल्या अनुभूतींशी प्रामाणिक राहिले.

मर्ढेकरांचे काव्य वेदनेचे काव्य आहे. मर्ढेकरांचे लेखन हे युद्धोत्तर काळातील नव्या जाणिवा व्यक्त करणारे होते. नेहमीच्या निराश, उद्विग्न अवस्थेतील कवितांबरोबरच प्रसन्न, नितांत सुंदर कविताही त्यांनी केल्या. संगीत, चित्रकला, शिल्पकला, नृत्य ह्यांसारख्या ललित कलांसारखीच साहित्य ही एक ललितकला असल्यामुळे साहित्यनिर्मितीत साहित्यसमीक्षा ही सौंदर्याशास्त्राच्या आधारे व्हावयास पाहिजे. इंद्रियसंवेदनांची लयबद्ध रचना म्हणजे कलाकृती म्हणूनच कलात्मक साहित्यात घाटाला महत्व अशी त्यांची भूमिका होती. संवाद, विरोध व समतोल ही सुंदर घाट उत्पन्न करणारी तत्वे मर्ढेकरांनी मांडली. सौंदर्याभावनेचे स्वरूप आणि सौंदर्यात्मक विधानांचे स्वरूपही त्यांनी स्पष्ट करण्याचा प्रयत्ना केला.

सौंदर्यास्वादातही आनंदापेक्षा अनुभवाच्या समृद्धतेवर भर देणे, प्रस्तुत काळात तरी अधिक जरूरीचे आणि उचित, अशी मर्ढेकरांची सौंदर्य आणि साहित्य ह्यांविषयी सर्वसाधारण भूमिका होती. ‘खेड्यातील रात्र’ ह्या बालकवींच्या कवितेचे स्वतःच्या भूमिकेशी सुसंगत असे विश्लेषण त्यांनी करून दाखविले होते. आज मर्ढेकरांच्या विचारांतील अनेक उणिवा वा चुका दाखविल्या जातात परंतु त्यांचे मोल मात्र जरूर मानले जाते. सौंदर्यशास्त्रीय विचारांत कलेतील माध्यमाच्या विचारापासून कलेतील साधनाचे स्वतंत्र स्थान स्पष्ट करण्याचे श्रेयही त्यांना दिले जाते.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here