मराठी भाषेतील कवी, नाटककार, आणि विनोदी लेखक कै. राम गणेश गडकरी. ‘गोविंदाग्रज’ या नावाने काव्यलेखन, ‘बाळकराम’ म्हणून विनोदी लेखक. ‘किर्लोस्कर नाटक कंपनीतून’ नाटकी जीवनाचा प्रारंभ, गर्व निर्वाण हे त्यांचे पहिले नाटक. राम गणेश गडकरी हे नाव नुसते उच्चारले तरी मराठी वाचकाला ‘गडकरी’ नावाचे जग समोर दिसू लागते.
मराठी साहित्यात नाटककार, विनोदी लेखक व कवी अशा तिन्ही आघाडयांवर आपल्या प्रतिभेची छाप पाडणारे साहित्यिक म्हणून राम गणेश गडकरी अजरामर ठरले. आपल्या अल्पशा कारकीर्दीत त्यांनी गाजवलेलं कर्तृत्व मराठी रसिकांच्या मनात कायमचं कोरलं गेलं. सुरुवातीच्या काळात पुण्यातील ‘ज्ञानप्रकाश’ मध्ये उपसंपादक, ‘न्यू इंग्लिश स्कुल’ मध्ये शिक्षक अशा नोकऱ्या केल्यानंतर राम गणेश गडकरी यांना किर्लोस्कर नाटक कंपनीत नाटयपदं लिहिण्याची संधी मिळाली व इथून त्यांची कारकीर्द सुरु झाली.
बालपणापासून साहित्यात विलक्षण रुची असल्याने वयाच्या सतराव्या वर्षीच ‘मित्रप्रिती’ नावाचं नाटक लिहून त्यांनी आपलं लेखन सुरु केलं होतं. इ.स. १९१३ मध्ये रंगभूमीवर आलेलं ‘प्रेमसंन्यास’ हे त्यांचं पहिलं नाटक. त्यांनंतर ‘पुण्यप्रभाव’ (१९१७), एकच प्याला (१९१९), भावबंधन (१९२०) ही नाटकं आली. नाटकांबरोबरच राम गणेश गडकरी काव्य आणि विनोदी लेखनांतही तितकेच लोकप्रिय ठरले. त्यांनी आपल्या कविता ‘गोविंदाग्रज’ या टोपणनावाने लिहिल्या. वाग्वैजयंती हा गडकऱ्यांचा एकमेव काव्यसंग्रह. त्या वाग्वैजयंती (१९२१) या संग्रहातून प्रसिद्ध झाल्या. मुक्तछंदापासून ते छंदबद्ध कवितेपर्यंत, आणि चार ओळींच्या कवितेपासून ते दहा पाने भरतील एवढ्या दीर्घकवितांपर्यंत अनेक प्रकार त्यांनी त्यात हाताळले आहेत. कवितांची पार्श्वभूमी एखाद दुसर्या परिच्छेदात सांगून नंतर कविता पेश करण्याची त्यांची पद्धत कवितेला वाचकाच्या मनात अधिक खोलवर नेते. गडकरी केशवसुतांना आपले गुरु मानत असले तरी त्यांच्या कवितांना स्वतःची प्रकृती होती. क्षण एक पुरे प्रेमाचा – वर्षाव पडो मरणांचा – मग पुढे यासारख्या शब्दांतून त्यांची विलक्षण प्रतिभा प्रभाव पडून जाते.
श्रीपाद कृष्ण कोल्हटकर ह्यांच्या नाटकांचा आणि विनोदी लेखनाचा प्रभाव त्यांच्यांवर संस्कारक्षम वयातच पडला. नाट्यविनोदाच्या संदर्भात ते श्रीपाद कृष्णांना आपले गुरू मानीत असत. त्यांचे पहिले पुस्तक कोल्हटकरांच्या नाटकांतील उताऱ्यांचे आहे (१९०७). वेड्यांचा बाजार (लेखनकाळ १९०६–०७) हे त्यांचे अपूर्ण नाटक महाराष्ट्रातील एक विख्यात नट आणि गडकऱ्यांचे एक निकटचे मित्र चिंतामणराव कोल्हटकर ह्यांनी पूर्ण केले व ते १९२३ मध्ये प्रकाशित झाले. काव्यलेखानाच्या बाबतीत ते स्वतःस केशवसुतांचे ‘कट्टे चेले’ म्हणवीत. त्यांच्या काव्याची प्रकृती मात्र केशवसुतांच्या काव्याहून भिन्न आहे. ‘अल्लड प्रेमास’ (१९०९) ही गडकऱ्यांची प्रसिद्ध झालेली पहिली कविता. मासिक मनोरंजनात ती प्रसिद्ध झाली. ह्याच मासिकातून १९१३–१५ मध्ये त्यांचे विनोदी लेख प्रसिद्ध झाले. हे लेख पुढे रिकामपणाची कामगिरी (१९२१) ह्या नावाने प्रसिद्ध झाले. रंगभूमि ह्या मासिकात ‘सवाई नाटकी’ ह्या टोपण नावाने आणि कधीकधी निनावी लेखन गडकरी करीत असत.
गडकऱ्यांच्या अनेक नाटकांची नावे ही पाच अक्षरीच आहेत. त्यांची नाटके हा आजही अनेकांच्या अभ्यासाचा विषय आहेत. भावबंधन, एकच प्याला यांसारख्या नाटकांची तर आजही एव्हरग्रीन म्हणून जाहिरात केली जाते. वेड्याचा बाजार आणि राजसंन्यास ही त्यांची नाटके मात्र अपूर्ण राहिली. गडकरी दीर्घायुषी झाले असते तर ती नाटके तर पूर्ण झालीच असती पण आणखी काही नव्या नाटकांचीही त्यात भर पडली असती. मराठीचे शेक्सपियर असा त्यांचा सार्थ उल्लेख होतो तो मुख्यत्वे नाटकांसाठीच. नुसती नाटकेच नाहीत तर त्यांची सुधाकर, सिंधू, तळीराम, घनश्याम, लतिका वगैरे पात्रेही अजरामर झाली आहेत. काळ बदलला, खरे तर गडकऱ्यांनी हाताळलेले दारूबंदीसारखे विषयही कालबाह्य झाले, पण गडकऱ्यांची नाटके सदाहरित राहिली याचे श्रेय त्या देवदुर्लभ अशा लेखणीलाच द्यायला हवे.
आपलं विनोदी लेखन त्यांनी ‘बाळकराम’ या नावाने केलं. त्यांच्या कथांतून निखळ विनोदाबरोबरच उपहासात्मक व्यंगही ठळकपणे आढळतं. ‘रिकामपणाची कामगिरी’ हा त्यांचा विनोदी लेखन संग्रह १९२१ मध्ये प्रसिध्द झाला. त्यांचे समग्र विनोदी लेख ‘संपूर्ण बाळकराम’ (१९२५) या नावाने प्रसिध्द झाले. याशिवाय गडकऱ्यांचं बरंचसं अप्रकाशित लेखन आचार्य अत्र्यांनी १९६२ मध्ये ‘प्रकाशित गडकरी’ या नावाने संपादित केलं. एकच प्याला या नाटकाद्वारे महाराष्ट्रात सामाजिक नाटकांना चालना देणाऱ्या गडकरींनी काव्य व विनोद या साहित्य प्रकारातही आपला ठसा उमटवला. त्यांच्या कवितेत भावोत्कटता व कल्पनाचमत्कृती ह्यांचा एकाच वेळी प्रत्यय येतो. त्यांच्या नाट्यकृतींतून नाट्यात्मतेबरोबर ठिकठिकाणी काव्यात्मतेचा साक्षात्कार होतो आणि त्यांचे विनोदी लेखन उपहासापेक्षा कोटित्वाचाच विशेषत्वाने आश्रय घेताना आढळते. असाधारण कल्पनाशक्ती आणि तितकीच असाधारण शब्दशक्ती हे गडकरी वाङ्मयाचे विशेष आहेत. करूण आणि हास्य ह्या दोन्ही रसांची निर्मिती त्यांनी आपल्या लेखनातून सारख्याच परिणामकारकपणे साधली आहे. त्यांची कल्पनाशक्ती उच्छृंखल आहे कलादृष्ट्या प्रस्तुताप्रस्तुताचा विवेक करण्याचे सामर्थ्य तिच्या ठायी तितकेसे नाही तिचा स्वाभाविक कल अतिशयोक्तीकडे आहे परंतु असे असूनही त्यांच्या सर्वच लेखनात वाचक-प्रेक्षकांच्या मनांची पकड घेण्याचे विलक्षण सामर्थ्य अवतरलेले आहे. उत्कटता हा त्यांच्या वृत्तीचा सहजधर्म आहे. कल्पनेची झेप अशी, की तिच्या हाती अनेकदा लागतात ती मती गुंग करणारी विचारमौक्तिके. गडकऱ्यांचे यश ह्या असाधारण गुणविशेषांमध्ये आहे. एकच प्याल्यातील सिंधू, गीता, तळीराम भावबंधनातील धुंडिराज, घनःश्याम, कामण्णा प्रेमसंन्यासमधील गोकुळ पुण्यप्रभावातील कालिंदी आणि राजसंन्यासमधील तुळशी ह्या गडकऱ्यांच्या नाट्यकृतींतील काही अविस्मरणीय व्यक्तिरेखा होत. साहित्यक्षेत्रात चौफेर कामगिरी करणारे राम गणेश गडकरी अल्पायुषी ठरले.