मूल्य शिक्षण गेलं चुलीत!

7
696

– कल्पेश सतिश वेदक

राघव अग्निहोत्री आणि नारायण रघुवंशी दोघेही जिवलग, एकाच शाळेत, एकाच इयत्तेत आणि एकाच कॉलेजमध्ये शिकलेले मित्र. आता दोघेही नुकतेच नोकरीला लागले होते. एका संध्याकाळी ते राघवच्या घरी सहज गप्पा मारत बसले असताना दोघांमध्ये चर्चा झाली अणि त्या चर्चेचं रूपांतर वादामध्ये झालं. दोघे जरी जिवलग मित्र असले तरी दोघांचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. हो तुम्ही आगरकर-टिळक म्हणालात तरी चालेल.

“तू उगाच जास्त विचार करतोयस, राघवा! टू मच ऑफ थिंकिंग इज गुड फॉर नथिंग.”, असं बोलून नारायण त्याच्या खोलीतून निघून गेला. तरी राघव आपला विचारांच्या जगात आकंठ बुडालेला होता. त्याला इतरांच्या काही गोष्टी पटतच नव्हत्या. त्याचं तरी कुठे चुकत होतं म्हणा. प्रत्येक माणूस आपल्या परीने हे आयुष्य जगत असतो त्यात काहींना चुकीचा मार्ग निवडावा लागतो काही बरोबर मार्गावर जातात, काही आडवाटे घेऊन सुखकर जीवन जगतात तर काही खडतर प्रवास. यामध्ये आपण कुणाला काय बोलणार? दुसऱ्यांच्या आयुष्यात ढवळाढवळ करणारे आपण कोण? बरं लोकांना समजवायला जा आणि त्यांचं हेही ऐका, “हो, आम्हाला हे माहित आहे.”
अहो! मग तुम्हाला माहित आहे तर मग कसं वागायचं याचं भानसुद्धा नाही का? असं राघवचं म्हणणं.

त्यादिवशी राघव स्वतःलाच, स्वतःच्या विचारांनाच कंटाळला होता. चाळीचा लाकडी जिना धाड् धाड् उतरत तो बागेत एका बाकावर जाऊन निरभ्र आकाशाकडे एकटक लावून बघत बसला. जशी काय संपूर्ण विश्वाची मक्तेदारी त्याने एकट्यानेच घेतली आहे आणि जग काही केल्या सुधारत नाही याचं त्याला वाईट वाटतंय असल्या आवेशात तो होता. त्याच्या मनात विचारांचं काहूर माजलं होतं की तो जसा वागतोय ते बरोबर की त्याच्या सभोवताली जे जग वागतंय ते बरोबर.

लहानपणापासून त्याला थोर व्यक्तिमत्त्व असलेल्या, कर्तृत्व गाजवलेल्या पुरुषांची असो किंवा महिलांची वचने म्हणा की सुभाषितं, प्रसिद्ध लेखकांची कादंबरीमधील वाक्य वाचून त्याला हुरूप यायचा, त्याने ती सर्व वचने / सुभाषिते वहीमध्ये लिहून ठेवली होती, मनातल्या मनात पक्कं करून टाकलं होतं की ही सर्व मंडळी आपापल्या देशासाठी कार्यरत होती / आहेत, विलक्षण प्रतिभा असलेल्या या मंडळींनी काय विचार केले असतील आणि स्वतःला या पातळीवर आणलं असेल की जगाने यांचं कौतुक करावं, प्रेरणादायी, आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्यासारखं बनावं आणि अगदीच थोर वगैरे होता नाही आलं तरी त्यांनी मांडलेल्या विचारांप्रमाणे आयुष्य तरी जगावं जी जगमान्य आहेत.

त्याउलट नारायण, ज्याला ज्याला जसं वाटतं तसं रहावं, फिरावं, बोलावं मग तिथे कसलीच मर्यादा नाही; कारण मर्यादा आली की बंधने येतात मग त्या बंधनातून मुक्त होण्यासाठी धडपड होते. त्यामुळे कशाला ही बंधनं आणि कसल्या मर्यादा. माणसानं बेफाम, स्वछंदी मनाने आयुष्य जगावं. आला तो दिवस आपला. पुढचा विचार कोण करत बसतंय. त्यामुळे नारायणचा शाळेतला, राघव हा मित्र सोडून बाकीचे त्याचे दुसऱ्या क्षेत्रातले मित्र जास्त होते. बरं त्यामध्ये दोघेही निर्व्यसनी. पण आपण कुणाला मज्जा करायला अडवायचं नाही या मताचा नारायण होता.

घरी परत येताना त्याला नारायण एका दुकानात सामान खरेदी करत असताना दिसला. त्याच्याजवळ जाऊन राघव, सर्व माहित असूनसुद्धा आपलीच चूक आहे या भावनेनं नारायणाला म्हणाला, “नारायणा, माफ कर मित्रा. तू मगाशी मला समजावत होतास खरं. मीच काय तो बावळट, खूपच विचार करतो ‘आदर्श जीवन जगण्याचा’. जग हे जरी राहण्यासाठी आदर्श ठिकाण असलं तरी तिथे आदर्शवाद राहणार नाही. मला मध्येच थांबवत नारायण म्हणाला, “राघवा, तू परत सुरु केलंस तुझं?” मग राघवनं तोंड मिटून घेतलं. नारायण बोलत राहिला. “हे जग कसं मुक्त आहे, स्वातंत्र्य आहे. सर्वानी कसं मजेत राहायचं, आनंदात राहायचं.” तरी राघव मध्ये बोललाच, “सर्वांनी?”, “मजेत?”, “मुक्त?” “स्वतःच्या स्वार्थासाठी दुसऱ्यावर लादलेल्या हक्कांना, अधिकारांना आपण स्वतंत्र कसं म्हणायचं?”

नारायण हे ऐकताच थोडा विचारात पडला. हे बघताच राघवने त्याला विचारलं, “काय रे, तुझ्या शेजारी राहणारे ते प्रभाकर काका कसे आहेत रे? एकटेच राहतात ना? कोण येतं का रे त्यांच्या नात्यातलं भेटायला? एवढे वयोवृद्ध असून कसे रे एकटे राहतात? मला तर त्यांचं कौतुक वाटतं आणि काळजीसुद्धा. त्यादिवशी तुला भेटायला घरी आलो होतो मी. पण तूच नव्हतास म्हणून म्हंटलं काकांशी गप्पा माराव्यात तर त्यांना बाहेरून हाक मारणार तेवढ्यात त्यांनीच आतून आवाज दिला. “कोण? अरे राघव! ये, ये. अरे इथे कुठे वाट चुकल्यास? नारायणाकडे आला होतास वाटतं!” राघव म्हणाला, “हो काका, आलो होतो त्याला भेटायला पण नाही तो घरी आणि तुम्ही दिसलात म्हणून तुम्हाला भेटायला आलो.”

“बरं केलंस रे बाबा, आलास!, नाहीतर कोण येतंय माझ्याकडे. मी हा असा एकटा.”, काका म्हणाले.

“काय हो काका, असं बोलता तुम्ही? अहो नारायण आहे ना आणि परत चाळीतले शेजारी आहेतच की गप्पा गोष्टी करायला.”, मी म्हणालो.

“अरे कसलं कोण येतंय आता माझ्याकडे! मी असा एकटा खुर्चीत बसून पुस्तकं, वर्तमानपत्र, मासिकं वाचत बसलेला असतो दिवसभर, कुणी हाक मारली तरी पुष्कळ. नारायणाची आई तेवढी काळजीने विचारपूस करते. दोन्ही वेळचं जेवायला देते. अगदी साक्षात अन्नपूर्णा रे ती.” काका निराधार भावनेने म्हणाले.

का कुणास ठाऊक हा प्रश्न राघवने त्यावेळी काकांना का विचारला.
“काय हो काका, तुम्हाला कधी लग्न करावं असं नाही वाटलं?”,

त्यानंतर काका खिडकीतून बाहेर एकटक बघत म्हणाले, कसल्यातरी वेगळ्याच जगात ते गेले होते, असे त्यांच्या चेहऱ्यावर भाव दिसून येत होते.
“अरे राघव, तरुणपाणी खूप धावपळ केली, याची कामं कर, त्याची कामं कर. त्याकाळी कुणी गरजू वृद्ध, दांपत्य दिसलं कि त्यांच्यासाठी घर सामान आणून दे. ऑफिसमधली कामं नाही म्हणायला कमी नव्हती पण समाजसेवा करायला मला फार आवडायचं. ऑफिस सुटल्यावर मी आपला समाजसेवा करण्यात व्यस्त होऊन जायचो. त्यामुळे मी कधी संसाराचा विचार केलाच नाही रे! नातेवाईक होते, ते आपल्या संसारात नातवंडांत मजेत राहतात हे पाहून आनंद वाटायचा. आणि नंतर मलाही सवय झाली रे एकटं राहण्याची त्यातून मला समाजसेवा करण्यात जास्त वेळ मिळू लागला.
ऑफिसमध्ये चांगल्या हुद्द्यावर होतो की रे! रेल्वेचा प्रवास करताना एक तरुणी दिसायची. तिचं स्मितहास्य बघितलं की सर्व क्षीण निघून जायचा. वाटायचं की घालू का आता हिला मागणी. नाहीतरी ती सुद्धा माझ्याकडे पाहत असतेच. काय बोलेल ती. जास्तीत जास्त नकार मिळेल, पण हिंमत नाही झाली रे आणि संसारात अडकून समाजसेवेमध्ये खंड पडला असता म्हणून मीच लग्नाचा विचार डोक्यातून हळू हळू काढून टाकला.
लहानपणापासून मला वाचनाचा छंद होता, खूप पुस्तकं विकत आणायचो आणि वाचायचो. एक एक पुस्तक किमान २-३ वेळा तरी वाचून काढलं आहे. हे बघ माझं छोटेखानी ग्रंथसंग्रहालय आपलं घरच्या घरीच बांधलंय. पुस्तकांमध्ये खर्च केला तर तो कधी वाया जात नाही रे राघवा! जगात जेवढी पुस्तकं आहेत ती सर्व वाचावी हे माझं ध्येय होतं पण संपूर्ण आयुष्य जगलो तरी ती संपूर्ण वाचून होणार नाहीत एवढी ज्ञानसंपदा या जगावर वावरत आहे. म्हणून कधी दुःखाचे क्षण आठवले की एक दोन लघुकथा वाचतो, कधी आनंद झाला तर कविता वाचतो, अशीच कितीतरी वर्ष मी हा माझा दैनंदिन उपक्रम राबवला आहे त्यात आजारपण आलं, औषधपाणी, वैद्यकीय उपचार झाले त्यातून बराही झालो पण एकटाच राहतोय.
एक तुला गुपित सांगतो राघवा, मी एक मोठी चूक केली, लग्न नाही केलं. अरे माणसाला जोडीदार हा असायला पाहिजे. तुमचं एकमेकांवरचं प्रेम, राग, रुसवे-फुगवे, तुमचं निष्फळ बोलणं असू दे किंवा मूर्खपणाचं वागणं असू दे शेवटी तो जोडीदारच ऐकत असतो, भोगत असतो, सहन करत असतो. आपलं मन आपण आपल्या जोडीदाराकडेच मोकळं करतो रे. मला काही अपेक्षा नव्हत्या समाजसेवा करताना, कधीच नव्हत्या पण आता या उतारवयात कोण आहे बघ माझ्याजवळ? कोणाजवळ मी बोलणार आणि कोणाला ही व्यथा सांगणार?”

काकांचं बोलणं संपताच मी आपले पाणावलेले डोळे टिपले आणि त्यांना नमस्कार करून “निघतो” असं म्हणालो आणि पुन्हा येईन भेटायला आणि तुमच्याकडून खूप खूप गोष्टी ऐकायच्या आहेत, तुमचे अनुभव ऐकायला मला ऐकायला आवडेल. मी पुन्हा येईन, राघव म्हणाला.

राघवने नारायणला प्रभाकर काकांचं मनोगत सर्व सांगितलं. त्यावर नारायण म्हणाला, “हो अरे, मी त्यांच्याकडून कितीतरी गोष्टी ऐकल्या आहेत. किती किती पुस्तकं आहेत त्यांच्याकडे. आम्ही चाळीतले त्यांना ‘पुस्तकवाले काका’ म्हणून हाक मारायचो त्यावेळी त्यांना या नावाने हाक मारली की खूप बरं वाटायचं. आम्हाला उन्हाळाच्या सुट्टीत ते त्यांच्या घरी बोलावून कथा वाचायला सांगत, पण आता कुणी फिरकतही नाही त्यांच्याकडे. सर्व आपापल्या कामात व्यस्त झाले आहेत.”

त्यानंतर दोन आठवडे गेले त्यादरम्यान राघव आणि नारायण भेटले नाहीत. नारायणला अचानक एकदा बागेकडे जाणाऱ्या रस्त्यावर राघव दिसला आणि त्याला ओढत जवळच्या बाकावर बसवत तो म्हणाला, “अरे राघव, तू या दोन आठवड्यात प्रभाकर काकांना भेटायला गेलेलास का रे? आम्ही घरचे सर्व बाहेरगावी फिरायला गेलो होतो त्यामुळे त्यांच्यावर लक्ष ठेवायला कुणी नव्हतं.”

“काय रे? काय झालं?”, राघवने काळजीपूर्व स्वरात विचारलं.

नारायण सांगू लागला, “अरे आम्ही बाहेरगावाहून परत आल्यावर आम्हाला हकीकत काकांकडून कळाली. मागच्या आठवड्यात काकांचा पुतण्या आला होता. सहकुटुंब सहपरिवार. संपूर्ण घरात कल्लोळ माजला होता. दोन लहान मुलं बघून काकांनी त्यांचे लाड केले. मोठा मुलगा तसाच खुर्चीवर बसून होता. तुला माहित आहेच काका किती प्रेमळ आहेत मुलांविषयी; त्यांनी लगेच पुस्तके काढून वाचायला सुरुवात केली. तेवढ्यात त्यांचा पुतण्या आणि सून विचारू लागले, “जेवणाचं काय?” आता काका घरात एकटे राहतात त्यांच्याने काय जेवण होतंय, तरीसुद्धा ती दोघे उध्दटासारखे विचारू लागले. घरात ‘पाहुणे’ आले आहेत, चहा पाण्याचं सोडून मुलांसोबत खेळत बसलात. काकांना ना स्वतःचं मूल तर त्यांना नाही का लागणार त्या मुलांचा लळा? पण नाही. पुतण्या त्यांच्याकडे नंतर पैशाची मागणी करु लागला. खूप मानसिक छळ केला म्हणे त्यांचा. त्या मुलांनी म्हणे काकांनी दिलेली पुस्तकं पण फाडली. मोठा मुलगा बाहेर जाऊन उभा राहिला.” काका पुढे सांगत होते, “पुतण्या नशेच्या आहारी गेलाय, कामधंदा काही करत नाही, सून संपूर्ण दिवस घराबाहेर काम करत असते. एकटीने घर खर्च झेपवत नाही. मुलांना त्यामुळे वळण नाही लागलं आहे. सारखी दंगा मस्ती करत राहतात. बाप शिव्या देतो ही पण शिव्या देतात मित्रांमध्ये. त्यांचा मोठा मुलगा म्हणे दिवसेंदिवस घराबाहेर असतो, नशा करतो, काय ते हल्ली ‘लिव्ह-इन’, त्यामुळे आजूबाजूचे म्हणतात बऱ्याच मित्र-मैत्रिणींबरोबर बघितलं आहे. कसली पिढी आणि कसलं काय? अरे जग बदलत जातं हे मान्य रे पण चहु दिशांना उधळलेल्या घोड्याला लगाम लावणार कोण? अरे शाळा सुटली.. पाटी फुटली.. फुटली ती कायमचीच…

नारायणला मध्येच थांबवत डोळे मिटून राघव म्हणाला, “बस्स! पुढचं नको सांगू. यापलीकडे अजून काय ऐकायचं आहे?” कधी ना कधी माणसांना या हालअपेष्टांमधून जावंच लागतं. पण काकांवर अशी पाळी यावी! स्वतःचं असं कुणी नाही त्यामुळे त्यांच्यावर अशी पाळी येते? काका कसे आहेत रे आता?” त्यानंतर दोघेही काही बोलले नाहीत. समोर खेळत असलेल्या लहान मुलाकडे बघत शांत बसले होते.

पण राघव मनामध्ये अस्वस्थच होता, न राहवून त्याने बोलायला सुरुवात केली, “हे काका आपल्या ओळखीचे आहेत म्हणून त्यांच्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या आपल्याला कळाल्या. या जगात असे आणि याहूनही वाईट अनुभव माणसं अनुभवत असतात. मग त्यामध्ये राहणीमान, स्त्री-पुरुष असा कुठलाच भेदभाव नाही. आपण जी मूल्य लहानपणी शिकलो ती मोठे होऊन विसरतो का रे? तू म्हणतोस ना माणसाने कसं स्वछंदी असावं, कसलंच बंधन नसावं, या जगात चांगलं-वाईट असं काहीच नाही हे सर्व आपल्या मनाने ठरवलेलं आहे. बरं मग मला सांग, विद्यार्थ्याने कुणाचं अनुकरण करावं? कुणाचा आदर्श ठेवावा? कारण शाळेत, पुस्तकात वाचलं जातं, शिकवलं जातं ते वेगळं आणि या जगात अनुभवायला मिळतं ते वेगळं. माणूस जेव्हा परिस्थितीशी निगडित असलेल्या अनुभवांसोबत जगत असतो तेव्हा तो त्याच्यापरीने त्या परिस्थतीशी लढत असतो. पण याचा अर्थ असा नाही की सर्व मर्यादा तोडून, नैतिक मूल्य विसरता काम नये. जर आपलीच पिढी अशी वागली तर लक्षात घे आपल्या पुढच्या पिढीला आणि त्याच्या पुढच्या पिढीला काय संदेश जाईल. विचार आणि आचार यांचा सुयोग्य मेळ व्हावा ही इच्छा. वाचन मनन आणि आचरण ही सांगड अत्यावश्यक आहे. तेव्हा कुठे चांगल्या सवयी आधीपासूनच अंगीकारल्या जातील. प्रभाकर काकांसारखी प्रेरणादायी माणसं देवाने घडवावीत, जी दुसऱ्यांच्या मदतीला धावून जातात, मुलांना ज्ञानाचा मार्ग मोकळा करून देतात”

हे सर्व ऐकून नारायण म्हणाला, “ओह कमॉन राघव! तू उगाच जास्त विचार करतोयस! टू मच ऑफ थिंकिंग इज गुड फॉर नथिंग, हे मी तुला आधीपण सांगितलं आहे.”

राघवने त्याचवेळी नारायणला रस्त्यावर शाळेतल्या मुलांचा समूह दाखवला जो बेफिकीरपणे रस्त्यातून मुलींची छेड काढत, म्हाताऱ्या माणसांना त्रास देत आणि नको ते शब्द वापरून, दंगामस्ती करत जात होता.

7 COMMENTS

  1. खूप छान कल्पेश.
    शाळेतले दिवस आठवले. खरंच काय खरे समजायचे. शाळेत शिकवले ते की अताचे जग शिकवते ते..??

  2. मूल्य शिक्षणाची अवस्था काही अंशी वाईटच आहे…जेव्हढं शिकवलं , बोललं जातं , त्या मानाने आचरणात येताना दिसत नाही. छान लिहीले आहे कथा ?

    • धन्यवाद माधवी ताई..
      खरंय तुमचं.. वाचन-मनन-आचरण सांगड आवश्यक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here