असा असावा एक दिवस प्रत्येकाच्या आयुष्यात कि कितीतरी काळाची गाढ झोप घेऊन उठावं, आणि उशिरा उठण्याचा काही खेद नाही. मुळात, उशीर ही संकल्पनाच समजत नसावी. शांतपणे चालत राहावं, क्षितीजाच्या दिशेने आणि कितीही चाललो तरी पाय दुखू नयेत कि पोटात भूकेची जाणीव होऊ नये. झाडांसारखं असावं… आपलं चालता चालता पोट भरलं जावं आणि कळूही नये किती भरतंय. मनसोक्त चालत रहावं, अगदी शांतपणे कोणतीही घाई न करता. थांबावसं वाटलं तर थांबता यावं. श्रमाने थकायला झालं तर कुणाच्याही खांद्यावर डोक ठेवता यावं, इतकं विश्वासार्ह असावं हे जग, फक्त एक दिवस!
प्रत्येकासाठी ज्याला त्याला हवी तेव्हा, हवी तशी, हव्या त्या ठिकाणी वेळ थांबवता यायला हवी. वेळ कधीही थांबत नाही म्हणून आपण तिच्या सोबत पळत राहायचं हे गणितंच मुळात बंद पडायला हवं. स्वतःच्या इच्छेने वेळेसोबत पळताना मजा येत असेल तोपर्यंत पळावं, पण पळण्याची फरफट होवू लागली कि थांबता यावं. वेगाशी जुळवून घेत पुढे जाणाऱ्याबद्दल असूया, राग न बाळगता. आपण आहोत त्या जागेवर, संपूर्ण समाधानी राहता यावं फक्त एक दिवस!
वाटलं तर मुक्त होता यावं सगळ्या बंधनांमधून, एक उंच झेप घेता यावी, तिच्या सफलतेची-असफलतेची चिंता न करता. आणि, खाली पडल्यावर कुणी पडण्याचे तत्वज्ञान सांगू नये कि झेप घेताना उंच उडण्याचे! एखाद्या डोंगराच्या टोकावर उभं राहून, डोळे बंद असताना चेहऱ्याला स्पर्श करून जाणाऱ्या वाऱ्याइतकं निर्मळ असावं, डोळे उघडल्यानंतरच या जगाचं चित्र. सभ्यतेचे-असभ्यतेचे सगळे बांध गळून पडावेत, रहावी फक्त पारदर्शी माणसं, ज्यांच्या डोळ्यातून मनात थेट उतरता यावं, फक्त एक दिवस!
नितळ असावं सगळं पाण्यासारखं, खोल खोल शिरता यावं स्वतः च्या मनात आणि इतरांच्याही आणि त्या खोल गर्तेत जाण्यात बुडण्याची कमी आणि समाधानाची जाणीव जास्त असावी. सगळी नाती, बंधनं, जबाबदाऱ्या, लगाम आपल्या अडवू पाहणारी हर एक गोष्ट सहज लांब निघून जावी. कुठल्याही बेड्यांमध्ये न अडकता आपण चालू शकतो का? कुठल्याही आधाराशिवाय आपण उभे राहू शकतो का? हे पाहता यायला हवं फक्त एक दिवस!
हे सगळं कुठेतरी स्वार्थाकडे जातं आहे ना? वेगळा वेगळा विचार म्हणताना तीचं मेख समोर येते आहे. म्हणजे, या वेगळ्या दिवसातही स्वार्थीच बनू पाहतोय का आपण?
नाही, निश्चितच नाही! बाकीच्या प्रलोभनात इतके अडकलो आहोत आपण कि खरा स्वार्थ म्हणजे तरी नक्की काय? हे विसरलो आहोत बहूदा.
ही एवढी खटपट, तो एक दिवस ‘स्वार्थ’ शोधण्यासाठी आहे. ‘ कोहम’ चा शोध घेण्यासाठी, स्वतःमध्ये विरघळण्यासाठी आहे, आपण आहोत तसे स्वत:च्या समोर येण्यासाठी, स्वतः वर प्रेम करण्यासाठी, जीव आसमंतात उधळून टाकण्यासाठी, स्वतःला कुरवाळण्यासाठी, स्वतःमध्ये खोल शिरण्यासाठी आहे!
माझ्यासाठी, माझ्यापूरता, माझ्यात रमलेला तो एक दिवस!