अकरा पाच ची ट्रेन

0
822

– तेजस सतिश वेदक । लघुकथा ।

आज दिनांक २० एप्रिल १९९४, टॅक्सीमधून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला उतरलो, थोडी धावपळच झाली माझी. अकरा वाजून पाच मिनिटांची गाडी आणि मी अजून टॅक्सीतून उतरतोय ह्यात आमच्या सहचारिणीचा हात मोठा होता कारण त्या आधीच कुडाळात थाट मांडून बसल्याने माझे मला आवरून निघायला उशीर झाला. मी फलाटावर पोचलो, गाडी लागून दहा मिनिटे झाली होती, बऱ्याच जणांची धावाधाव होती, काही मुलांचे वडील त्यांच्या बायका मुलांना सोडायला आले होते आणि काही ट्रेनमधून जाताना खायला चटर पटर घेण्यासाठी उतरले होते, डब्बा सापडला आणि मी माझी सीट शोधण्यात गुंग झालो, सीट काही मिळत नव्हती, कदाचित मला दिसत नसावी, म्हणून मी टी.सी ला पकडले, त्यांनी तर मला थेट जागेवर जाऊन बसवले आणि ताबडतोब तिकीट पण चेक केले, आता मला निवांत बसायला काहीच हरकत नव्हती, माझ्या जवळपास कुणीच आले नव्हते त्यामुळे त्या संपूर्ण सहा सीटचा मी मालक होतो, मी माझी बॅग साखळीला लावली आणि मिळालेल्या आपात्कालीन खिडकीतल्या सीटवर बसून बाहेर बघत बसलो. ट्रेनचा भोंगा वाजला आणि ट्रेन सुटली.

अचानक माझी नजर समोर बसलेल्या माणसावर गेली, तो माणूस कधी येऊन समोर बसला देवजाणे, काही हालचाल नाही गडबड नाही, अगदी बघवत पण नव्हते त्याच्याकडे, अगदी विचित्र, दाढी मिशी वाढलेली, मळकट कपडे, फणी न फिरवले केस, काखेतून फाटलेला शर्ट, पायात शिवलेली चप्पल, एकूण त्याला बघता पूर्ण आठवडा त्याची अंघोळ झाली नसावी ह्या निर्णयावर मी पोचलो. कसेतरी पाय आकसून मी सीटवर मांडी घालून पुन्हा खिडकीबाहेर बघत राहिलो. त्या माणसाची काही नजर वेगळीच होती, लाल बुंद डोळे, कानावर आलेले केस त्यामुळे लहान काय मोठं माणूस पण घाबरेल. त्याच्या कपाळावर कसले तरी व्रण होते, कसल्यातरी जोराच्या आघाताचे, जखम तेवढी जुनी नव्हती पण भीती वाटेल अशी होती, मी त्याकडे लक्ष न देता, माझा बिछाना घातला आणि आडवा झालो, किती लक्ष नाही दिले तरी पण सारखे लक्ष जात होते, त्याचे ही लोअर बर्थ असल्याने तो बाजूलाच होता, रात्रीच्या थंड हवेत सुद्धा मला घाम सुटायला सुरवात होणार इतक्यात तो इसम निघून गेला, तो गेलेला पाहून मी डोळे मिटून घेतले, छान डोळा लागला होता, आणि मी उद्या पोहचून काय काय करायचे, कोणाला भेटायचे या विचारात रमलो.

तसा माझा कुडाळला जायचा योग हा शक्यतो कमीच असायचा पण आमच्या गृहिणीच्या सांगण्यावरून हा बेत मी आखला, नाहीतर कुडाळला मी शक्यतो राहत नाही आणि जात ही नाही, फक्त गणपती एके गणपती बस. पण यंदा माझा मुक्काम तब्बल दोन आठवड्यांचा होता. कानात हेड फोन लावून मस्त जुनी गाणी ऐकत मी ट्रेन बरोबर झुलत होतो, बराच वेळ झाला तरी घड्याळ मात्र पुढे जात नव्हते.
प्रवासात ट्रेनमध्ये झोप नेहमीच छान लागते, त्यात वरचा बर्थ असेल तर प्रश्नच नाही, गाडी अगदी सुसाट धावत होती, पनवेल जाऊन छोटी छोटी गावे सरसर जात होती. त्या इसमाला जाऊन बराच वेळ झाला होता तो अजून आला कसा नाही, म्हणून मी जरा उठून त्याला शोधण्यास गेलो, का गेलो? कशासाठी गेलो? माझा काय संबंध ? नाही माहीत पण जर चोर असेल तर पकडून देऊ म्हणजे मला पण झोप लागेल. म्हणून मी दाराजवळ गेलो, ट्रेनमध्ये काळोख होता वर मिणमिणते पिवळे दिवे होते दरवाज्यातून जोराचा वारा वाहत होता आणि त्या दरवाजाचा आवाज त्या काळोखाला अजून चेव देत होता. मी थोडा अजून पुढे जाऊन बघितलं आणि पाहतो तर तो इसम दाराच्या कडेला उभा होता, मागून तर तो अजून भयावह दिसत होता, ते पिकलेले व गुंत न काढलेले केस, हाता पायाची नखं वाढलेली, डोक्यावरील जखम झाल्यासारखे हातावर ताजे व्रण, पायाजवळ थोडे रक्त ही होते. मी बाथरूम मध्ये शिरलो, आणि थोड्या वेळाने बाहेर येतो तर तो माझ्याकडेच पाहून हसत होता. जसा काय मी त्याला आणि तो मला ओळखतो. लाल डोळे आणि पिवळसर झालेले दात अक्षरशः भयावह वाटत होते. मी तिथून पळ काढला आणि माझ्या जागेवर येऊन बसलो. पाहतो तर तो व्यक्ती आधीच समोर येऊन बसला होता, मी तर आता पुरता घाबरलो होतो, काय ओ! बराच वेळ झालो तुमका बाथरूमास, अखेर माझा प्रश्न त्याने मलाच विचारला तो इसम माझ्याशी बोलला, त्याचे बोलणे ऐकून मलाच काहीतरी भास होत आहे असे वाटले, नाही अहो तिथे गर्दी होती म्हणून उशीर झाला, एवढे उडवा उडवीचे उत्तर बोलून मी झोपलो पण तो विचित्र प्रकार आठवून झोप काही येत नव्हती, तो माझ्या आधी कसा इथे आला हाच विचार करत होतो म्हणून मीच विषय काढून त्या इसमाशी बोलणे चालू केले, कदाचित बोलण्याने भीती कमी होईल ह्या कारणाने मीच त्याला विचारले.

काय हो कुठचे तुम्ही? मी कुडळातला पावशी गावचा आसंय , मुंबईक असतंय, आता घराक जातंय, छेडवाचं लगीन जमलाय, जरा आधीच जातंय असा म्हणतंय, तुम्ही खयचे? त्याने मला त्याच्या घोगऱ्या आवाजात विचारले, मी ही कुडाळ मधील पण दूरचा मुंबईला असतो, गावाला सुट्टीसाठी जात आहे, बायको आणि पोर तिथे आहेत येताना घेऊन येईन, मी उत्तरलो. तुम्ही कुठे कामाला मुंबईत? मी पुन्हा प्रश्न केला. मी गिरणीत कामाला होतो गेले तीस वर्षे झाले. आणि तुम्ही ? त्याने ही मला प्रश्न केला, मी सरकारी अधिकारी आहे. दोघांची प्रश्नांची सरबत्ती चालूच होती, त्यामुळे माझी थोडी भीती नाहीशी झाली आणि मी झोपलो. अंदाजे दोन अडीच वाजले असावेत, छान हवेच्या गारव्यात झोप लागली होती, गाडी थांबल्याचे जाणवले पण गाडीही स्थानकावर न थांबता एका काळोखी परिसरात थांबली होती. त्यामुळे गरम होत होते.. आणि तो समोरील इसम ही गायब होता. माझी पुन्हा तारांबळ उडाली, म्हणून मी ट्रेनमध्ये त्याला शोधायला निघालो. तो इसम कुठेच दिसला नाही रुळावर प्रवासी लोकांची गर्दी जमली होती. सर्व जण गेला! गेला कोणीतरी पुरता गेला! हात पाय गेले असं काहीसं कानावर ऐकू आलं आणि ट्रेनचा भोंगा वाजला, आणि ट्रेन निघाली, कुडाळ आले नाही आणि हा इसम गेला कुठे, थोडे चमत्कारिक होते. म्हणून मी संपूर्ण ट्रेन पालथी घालावी का? ह्या विचारात होतो, तरी मी माझ्या इथल्या डब्ब्यातील बाथरूम चे चारही दरवाजे तपासून पाहिले पण कुठे थांगपत्ता लागला नाही. म्हणून मी पुन्हा जागेवर येऊन बसलो. मनात विचारांचे काहूर माजले होते एवढ्या रात्री एकाएकी तो माणूस कसा काय गायब झाला, तेवढ्यात कोणीतरी बोलत जाताना मी ऐकले एक इसमाने गाडी खाली जीव दिला आणि जागीच ठार झाला प्रेतही सापडले नाही, तो तोच इसम नसणार ना? त्या विचित्र दिसणाऱ्या माणसाचा चेहरा डोळ्यासमोरून जाता जात नव्हता, जीव द्यायचे काय बरे कारण असावे त्याचे, माझ्या मनाचा ताबा उडाला त्या व्यक्तीविषयी प्रचंड वाईट वाटू लागले होते. मुलीचं लग्नही पाहूं नाही शकला तो बिचारा, माझे एक मन दुसऱ्या मनाशी भांडू लागले, तेवढ्यात समोरून घोगरा आवाज आला, सरकारी बाबू कसलो इचार करतास? बघतो तर समोर तोच इसम पुन्हा मझ्याकडे दात काढून हसत होता. मनात थोडेसे धस्स झाले आणि मन शांत झाले. तो इसम पुन्हा समोर येऊन बसला, काय हो कुठे होतात? मी विचारले. मिया…मिया तर हयच होतय. मी घाबरलो दिसला नाहीत तुम्ही? कोणीतरी जीव दिलो म्हणे त्याने सांगितले. मी हो म्हणून शांत बसलो. पण शांत बसवत ही नव्हते म्हणून मी पुन्हा प्रश्न केला काय हो तुमचे नाव नाही सांगितले, मी त्या इसमाला विचारले. मी गजानन महाडिक नेहमीक या रेल्वेक असतंय. ही रेल्वे गेल्या तीन दिवसांपासून हय थांबताच. कोणीतरी रेल्वेतसून जीव दिला म्हणून. कोणाचा मढा सापडला नाही, मढ जात खय काय माहिती. त्याचे बोलणे ऐकून आता तर माझी साफ जिरली होती आता ब्रम्हदेव जरी आला तरी जागेवरून हलणे सक्तीचे केले होते मी. ह्यामुळे आता झोप लागणार नाही हे माहीत होते.

सारख्या त्या इसमाच्या गोष्टी कानात पडत होत्या, त्याचे डोळे सारखे समोर दिसत होते. मी पुन्हा खिडकीतुन बाहेर बघू लागलो. बाहेर निरव शांतता होती, काळोख गडद झाला होता, चंद्राचा प्रकाश झाडातून डोकावत होता रातकिडे आवाज काढून वातावरणाला अजून भयावह करत होते. आणि त्यात समोरील इसम त्याच्या लाल बुंद डोळ्यांनी बाहेर पाहत होता तो त्यांच्यावर पडलेला चंद्राचा प्रकाश त्याच्या चेहऱ्याला अजून भीतीदायक करत होता, भीती वाटू नये म्हणून मी त्यांना अजून प्रश्न विचारले, काय हो गजाननराव मुलीच्या लग्नासाठी जात आहात आणि खरेदी किंवा कपड्यांची बॅग नाही तुमच्याजवळ, त्यांनी माझ्याकडे पटकन नजर फिरवली, मी घाबरलो. “नाय..!! घराकडे सगळे आधीच पोचले असा. मी तेवढे पोचायचो बाकी असाय, कितके दिवस झाले प्रवास चालू असा ह्या रेल्वेतून, छेडवाच लगीन झालं म्हणजे मी सुटलो समजा.” किती दिवस म्हणजे? गणपत रावांचे बोलणे ऐकून मी जरा घाबरलो घामाच्या धारा गरमीमुळे कमी त्याच्या बोलण्याने जास्त येत होत्या, थोडा उदास झालो, अहो असे काय बोलत आहात होईल सर्व ठीक काही काळजी करू नका, मी त्यांना धीर देत बोललो.

तुम्ही दिलेलो धीर माका आता काहीच उपयोगाचो नाय, कर्जाने डुबलो असाय, लग्नासाठी गिरणी मालकाकडसून उसने पैसे घेतलो होतय, तेच कसे फेडतलंय समजला नाय, शेत गहाण असा, गिरणी बंद पडाक ईली असा, घर तेवढा मात्र शिल्लक रवला असा. त्यामुळं सगळा अडकून पडला असा. त्यात माझ्या बरेपणाचा गैरफायदा काही गिरणी कामगार घेत असात काही तर माझ्या जीवावर उठल्याती, आणि त्यानी त्यांचो हेतू पण साध्य केलो. मला त्या इसमा बद्दल खूप वाईट वाटले पण तेवढीच भीती देखील वाटत होती. त्याच्याकडे बघता बघता माझी नजर त्या इसमाच्या पायाजवळ गेली. अहो तुमच्या पायातून तर रक्त येत आहे. आणि आणि डोक्याच्या जखमेतूनही. काही होत आहे का? मी घाबरून विचारले, त्या इसमाने डोक्यावरील जखमेला हात लावला आणि नंतर तो काढला तेव्हा रक्ताचा थेंब ही नव्हता, मी चकित झालो, घाबरलो माझे डोळे बाहेर पडतील एवढे मोठे झाले होते आणि मी पुन्हा पाय दुमडून खिडकी बाहेर पहात राहिलो. वाईट तर वाटत होते त्याच्या गोष्टी ऐकून, पण एक गिरणी कामगार आणि दाढी केस वाढवलेले, त्यात मुलीचं लग्न आणि हातात एकही सामानाची बॅग नाही हे मला रुचत नव्हते, कदाचित हा माणूस खोटे बोलत असावा असा मी समज केला, आणि पुन्हा लक्ष देणार नाही त्याच्याकडे असे ठरवले.

वेळ पुढे जात नव्हता, कधी कुडळात पोहचतो अस झालं होतं, साडे पाच चे सहा, सहाचे सात झाले पण ट्रेन ला उशीर झाला होता अर्धा तास ट्रेन उशीरा होती सूर्य जसा वर येत होता तशा घामाच्या धारांनी बांध सोडला होता, समोरील इसम पुन्हा गायब होता, पण आता आपण लक्ष द्यायचे नाही ठरवले आहे तर विचार न करता मी तोंड धुण्यासाठी बेसिनजवळ गेलो, तिथे तो इसम दरवाज्याजवळ पाय सोडून बसला होता. त्याचे लक्ष ही नव्हते पण मी मागे आहे हे त्याला कसे समजले हे नाही माहीत, काय? सरकारी बाबू झाला काय तोंड धुवून? माका शोधता की काय? त्याने विचारले. मी हो बोलून पळ काढला, त्याला कसे समजले असावे हा विचार करत येत होतो आणि जागेवर येऊन बसलो, ट्रेनमधला बेचव चहाचा आस्वाद घेत घेत रात्री घडत असणारे प्रकार डोळ्यासमोरून जात होते, तितक्यात तो समोरील इसम आला, आणि म्हणाला तुम्ही माझ्या छेडवाच्या लग्नाक या. उद्याच असा, मी विसरून गेलोय तुमका बोलवूक.. चला आपण पुन्हा भेटाचा, तेव्हा लक्षात आले की ट्रेन कुडाळ स्थानकावर लागत होती. मी ही त्या इसमाच्या मागे मागे माझ्या बॅगा घेऊन उतरलो.

कडक ऊन डोक्यावर आले होते, त्या इसमाचा पाठलाग करत स्थानकातून बाहेर पडलो, तर तो इसम अचानक गायब झाला. चंद्रकांत तिथे आल्याने मी त्याच्या मोटर बाईकने घरी जायला निघालो. वाटेत पावशीकडे जाणार रस्ता दाखवला होता, मी चंद्रकांतला बाईक वळवायला सांगून पावशीकडे नेण्यास सांगितली, आम्ही गावात पोचलो पण गाव पूर्ण शांत होतं. अगदी खूप वर्षांपासून बंद आहे असं, मी चंद्रकांत ला विचारले काय रे हे असंच असते का गाव एकदम शांत? तो नाही बोलला मग आज काय कारण असावे? आम्ही अजून पुढे गेलो. पुढे मला तो इसम एकटा चालताना दिसला, चंद्रकांतला मी गाडी त्या इसमाजवळ न्यायला सांगितली. कोण इसम? कोणता? कुठे आहे? चंद्रकांतने मला विचारले, पण चंद्रकांतला कोणीच दिसत नव्हते, त्याचे हे बोलणे ऐकून माझी बुद्धी काम करेनाशी झाली, अरे तू काय बडबडतो आहेस, त्याने गाडी थांबवून मला भानावर आणले, मी अजून पुढे गेलो आणि पुढे एक लग्न मंडप असलेले घर दिसले, घराबाहेर बरीच गर्दी जमली होती कदाचित आज हळदीचा कार्यक्रम असावा, मी आणि चंद्रकांत अजून पुढे गेलो. तिथे तो इसम खुर्ची वर बसलेला मी पाहिला. मी अजून पुढे गेलो आणि जे पाहिलं ते विश्वास न बसणार होतं, अंग तापाने फणफणत होतं, चक्कर जागीच येऊन मी पडलो आणि मी थेट दुसऱ्या दिवशी उठलो.

मी शुद्धीवर आलो. बायको पोर, आई वडील आणि भाऊ माझ्या भोवती गोळा होते, काल तू तिथे प्रेत बघायला का गेला होतास? त्या घरी कोणी ओळखीचे होते का? ते बघून तुला चक्कर का आली? चंद्रकांतच्या प्रश्नांनी माझे डोके भांडावून सोडले होते, म्हणजे परवा संपूर्ण ट्रेनची रात्र इच्छा अपूर्ण राहिलेल्या आणि मुलीच्या लग्नामुळे मुक्ती मिळणारा तो इसम हा फक्त एक अतृप्त आत्मा होती.
हे सर्व आठवून मी धजावलो आणि पडवीवर येऊन मी वर्तमानपत्र वाचायला घेतले, त्यावरील त्या इसमाचा फोटो आणि खालील मजकूर वाचून मी थक्क झालो होतो. मजकूर असा होता की,

कै. गजानन महाडिक. राहणार पावशी यांचा मृत्यू दिनांक १८ एप्रिल १९९४ झाला असून त्यांनी ट्रेनमधून आत्महत्या केल्याचे उघडकीस आले आहे त्यांच्या आत्महत्येचे कारण अजून समजले नाही, पोलीस तपास करीत आहेत.

म्हणजे ती ट्रेन अशीच रोज थांबते. ह्याला तो इसम कारणीभूत होता म्हणून तर प्रेत मिळत नव्हते, हे आता माझ्या लक्षात आले. त्याने सांगितलेल्या गोष्टींचा मी संदर्भ लावत होतो. आणि पुन्हा तो ट्रेनचा प्रवास नाही करायचे ठरवले. कारण तो इसम आणि ती अकरा वाजून पाच मिनिटांची ट्रेन हे दोन्ही माझ्या मेंदूला चिकटले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here