– कल्पेश सतिश वेदक
चैत्र नुकताच चालू झाला होता आणि हा सूर्य आग ओकतोय.. वैशाखाचा तर विचार करवत नाही.. अशावेळी बकुळ फुलाच्या वृक्षाखाली शांत बसून, त्यात वाऱ्याच्या हलक्याशा झुळुकेसोबत बकुळ फुलांचा मनमोहक सुगंध. सर्वत्र दरवळ पसरलाय. अहाहा! अशावेळी मन सूर्याचे उपकार मानते कारण त्याच्यामुळेच हा डेरेदार वृक्ष मला सावली आणि हा अविस्मरणीय क्षण देत आहे… मंगल प्रधान हा विचार करत खुर्चीवर बसते तेवढ्यात तिच्या समोर पांढरा शर्ट, खाकी पँट घातलेला, गहुवर्णी रंगाचा, सरळ नाक असलेला, एका हातात मोठी ट्रंक घेऊन असलेला तरुण उभा राहिला.
विश्वनाथ शास्त्री. तोच लहानपणीचा मित्र. शहराकडे शिकायला गेला आणि नंतर तिथेच बँकेत भरती झाला होता. आई-वडील आणि छोटा भाऊ असं त्याचं कुटुंब, गावातलं घर बंद करून शहराकडे गेले होते. वर्षातून २-३ वेळा फेरी मारायचे. पण गेली पाच वर्ष ते त्या गावी जाऊ शकले नव्हते. त्याच्या आईला या गावातल्या घरात भीती वाटायची. कसलीतरी पांढरी आकृती आतल्या खोलीतून जाताना दररोज रात्री दिसते असं म्हणायची. या चौघांपैकी फक्त त्याच्या आईला आणि विश्वनाथला हा अनुभव कितीतरी वेळा आला होता म्हणून त्यांनी हे घर बंद ठेऊन शहरात जायचा निर्णय घेतला होता.
गेल्याच महिन्यात विश्वनाथने मंगलला पत्र लिहिलं होतं की, त्याची बदली गावाला झाली आहे. त्यामुळे तो त्यांच्याच घरी परत राहायला येईल. मंगलने गावातल्या काम करणाऱ्या माणसांना बोलावून शास्त्र्यांचं घर साफ करवून घेतलं होतं.
आज तो तिच्या घरी त्यांच्या घराची चावी घ्यायला आला होता. त्याने तिला जवळजवळ १५ वर्षानंतर पाहिलं होतं. बालपणीची मंगल आता सुंदर, आकर्षक दिसत होती. ऐन तारुण्यात त्यांनी एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं होतं आणि एकमेकांवर त्यांच्या नजरा खिळल्या होत्या.
काय, कसं काय म्हणतंय चिखली? खूप वर्षांनी आलो आहे गावात. दादा आणि माई कसे आहेत?, विश्वनाथने विचारपूस केली.
मंगल आपल्या डोळ्यातले अश्रू टिपत म्हणाली, “दादा पाच वर्षांपूर्वी एस.टी अपघातात वारले आणि त्यानंतर दोन वर्षांनी आई कॅन्सरने वारली. गावातल्या इस्पितळात योग्य उपचार करता नाही आले आणि शहराकडे येण्यासाठी पैसे नव्हते पुरेसे त्यात तुम्हाला उगाच त्रास झाला असता म्हणून नाही सांगितलं. आता सध्या मोठे काका आणि काकू घरात राहतात माझ्याबरोबर.”
“शहरातल्या इस्पितळात उपचारासाठी मला नाही का पत्र लिहायचं? मी गाडीची व्यवस्था केली असती तुमच्या राहण्याची सोय केली असती. योग्य वेळीच उपचार झाले असते. माई बऱ्या झाल्या असत्या.”, विश्वनाथ रागावून तिला म्हणाला. बरं तुम्ही सर्व ठीक आहात ना? विश्वनाथने सर्वांची चौकशी केली आणि आपल्या घराकडे निघाला.
मंगलने घर साफ करून घेतलं असल्यामुळे राहण्यासाठी ते योग्य झालं होतं, नाहीतर तिथे एरव्ही रात्री घुबडं आणि वटवाघुळं फिरत असायची. रात्रभर विचित्र, भयानक आवाज यायचे. अमावस्येला तर ते घर तिथे दिसायचं सुद्धा नाही एवढं काळं पडलं होतं. संध्याकाळी विश्वनाथ मंगलकडे जाऊन निवांत झोपाळ्यावर बसला होता. बालपणीचे दिवस आठवत होता. तलावाकाठी बसून पाण्यात दगड मारण्याचा खेळ, लपाछुपी, क्रिकेट, लगोरी हे सर्व खेळ त्याला आठवू लागले. तेवढ्यात मंगलने त्याला जेवणासाठी हाक मारली आणि तसा तो आतल्या खोलीत गेला. दोघांनी जेवणं उरकली. त्यानंतर मंगल त्याला त्याच्या घरापाशी सोडायला गेली. रस्त्यात त्या दोघांनी बालपणीच्या गप्पा मारल्या. विश्वनाथ म्हणाला, “तुला आठवतं मंगला, त्या आंब्याच्या, चिंचेच्या झाडांवर आपण कसे दगड फेकून मारायचो आणि चिंचा-आंबे गोळा करून घरी आणायचो आणि त्याचा फडशा पाडायचो.” मंगलचं लक्ष भलतीकडेच होतं आणि मध्येच तिनं त्याचा हात पकडून विचारलं, तुला रात्री झोप लागते का रे?
विश्वनाथला पहिल्यांदा काही कळलं नाही की ती असा का प्रश्न विचारत आहे? मग त्याने हो म्हणून सांगितलं आणि खोडकर होऊन विचारलं, “का? तुला नाही लागत?” मंगल गालातल्या गालात हसली आणि लाजली. पण तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर तिला मिळालं नव्हतं. ती परत तिच्या घराकडे जायला निघाली, तेव्हा विश्वनाथ तिला म्हणाला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मी तुला लवकर देईन. विश्वनाथ जसा घरात शिरला तसं घराचं दार लावलं. स्वयंपाक घरात गेला, मडक्यातलं पाणी प्यायला तेवढ्यात त्याला काहीतरी हालचाल झाल्याचा भास झाला. त्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं आणि मग तो त्याच्या खोलीत जाऊन झोपून गेला.
दुसऱ्यादिवशी जेव्हा त्याला जाग आली तेव्हा सूर्य उगवून फार वेळ झाला होता. डोळे चोळत चोळत तो जसा बाहेरच्या खोलीत आला तेव्हा त्याला सोफ्यावरच्या वस्तू जमिनीवर पसरलेल्या सापडल्या. रात्रभर तसा वारा छान सुटला होता म्हणून सर्व कागद असे जमिनीवर पडले असतील असं त्याला वाटलं. सकाळची न्याहारी उरकून, वर्तमानपत्र वाचून तो गावात एक फेरफटका मारायला गेला. कामावर रुजू होण्याकरिता तरी अजून एक आठवडा बाकी होता. तिथल्या बँकेत जाऊन आपण आल्याची माहिती दिली आणि एका आठवड्याने कामावर रुजू होऊ असेही सांगितले. दुपारचं जेवण त्याने एस.टी. स्टँडजवळील बाजारपेठेतल्या एका खाणावळीमध्ये केलं. त्यानंतर संध्याकाळी घरी परतत असताना त्याला ती आंब्याची आणि चिंचेच्या झाडांनी भरलेली बाग दिसली. गालातल्या गालात हसत, सर्व आठवणी गोळा करत तो घरी परतला. मंगलच्या घराबाहेरून त्याने तिला हाक मारली, तशी ती बाहेर आली. त्याने तिच्यासाठी बाजारातून बकुळीच्या फुलांचा गजरा विकत आणला होता. तिनं त्या सुगंधित गजऱ्याचा सुवास घेतला आणि स्वतःच आपल्या केसांत माळला. नंतर ते दोघेही त्याच्या घराच्या अंगणात गप्पा मारत बसले. आज दिवसभर काय काय केलं याची माहिती विश्वनाथने मंगलला दिली आणि परत तिनं त्याचा हात पकडून विचारलं, काल तुला रात्री झोप लागली?
विश्वनाथने आश्चर्यचकित होऊन मंगलकडे बघितलं आणि मनात म्हंटलं, “ही हाच प्रश्न का सारखा विचारतेय?” म्हणून तो म्हणाला, “हो मला लागली काल झोप, का? तुला नाही लागली?” मग तिने त्याला परत विचारलं, “तुला झोपेत कधीतरी जाग आल्यावर, जेव्हा तू डोळे उघडतोस तेव्हा तुला तुझ्या बाजूला कुणीतरी झोपलं आहे असं नाही दिसत? गेली कित्येक वर्ष मला अर्धवट झोप लागते. असं सारखं वाटत असतं कि कुणीतरी माझ्या बाजूला झोपलं आहे. संपूर्ण शरीर मी चादरीने झाकून घेते तरीही असं वाटत राहतं कि पायाच्या दिशेने ती चादर कुणीतरी खेचतंय आणि मला बाहेर यायला सांगतंय.”
हे ऐकल्यावर विश्वनाथचं डोकं चक्रावलं. ही अशी काय बोलत आहे आणि काल रात्री मला झालेल्या भासाचं आणि हिने सांगितलेल्या या भासाचं काय नातं आहे? एकमेकांशी संबंधित आहे का हे सर्व? का या सर्व हीच्या खुळसट कल्पना आहेत? नाही! पण मग लहानपणी मला आणि माझ्या आईला जी बाई दिसायची ती कोण? त्याचा आम्ही कधी पाठपुरावा केलाच नाही आणि इतकी वर्ष हिलासुद्धा अर्धवट झोप लागते याचा काय अर्थ?
त्या रात्री विश्वनाथने मंगलला, “आज रात्री घरी येशील?” अशी विनंती केली. “आज आपण या गोष्टीचा सोक्षमोक्ष लावून टाकू.
रात्रीचं जेवण आटपून, मंगल आणि विश्वनाथ दोघेही घरात आले. विश्वनाथने दार लावलं. त्यांच्या गप्पा ऐन रंगात आल्या असतानाच विश्वनाथला आतल्या खोलीत कसलीतरी हालचाल झालाच भास झाला. पांढऱ्या रंगाची आकृती त्याच्या नजरेसमोरून गेली. मंगल पाठमोरी बसली असल्याने तिला काही दिसलं नाही. विश्वनाथच्या चेहऱ्यावरील मुद्रा अचानक बदलल्या गेल्यामुळे तिने त्याला विचारलं, “काय झालं? तू असा का पाहतोयस आतमध्ये?” विश्वनाथने काल त्याला झालेल्या भासाबद्दल आणि आता त्याने पाहिलेल्या पांढऱ्या आकृतीबद्दल मंगलला सर्व सांगितलं. विश्वनाथला सुद्धा हे असं दिसतंय याचा अर्थ इतक्या वर्षांपासून तिला होणारे भास हे भास नसून नक्की इथे कुणा अदृश्य शक्तीचा वावर आहे हे निश्चित.
रात्रीचे २ वाजले होते. मंगल आतल्या खोलीत पलंगावर झोपली होती आणि पलंगाशेजारी असलेल्या सोफ्यावर विश्वनाथ. तेवढ्यात तिला जाग आली आणि बाजूला सोफ्यावर झोपलेल्या विश्वनाथच्या शेजारी बसलेल्या त्या पांढऱ्या आकृतीकडे तिची नजर गेली आणि ती किंचाळलीच, “विश्वनाथ, ऊठ, बघ तुझ्या बाजूला कुणीतरी बसलंय.” किंचाळल्याचा आवाज ऐकून, विश्वनाथ दचकून जागा झाला आणि मंगल जे बोलत होती तसं तिथं पाहिलं तर कुणीच नव्हतं. विश्वनाथ म्हणाला, “झोप, तुला भास झाला असेल.” “नाही अरे विश्वनाथ, मी माझ्या डोळ्यांनी त्या आकृतीला तुझ्या शेजारी बसलेलं पाहिलं.”, मंगल भीतीदायक स्वरात त्याला म्हणाली.
विश्वनाथने विचार केला की मंगलचं यापासून लक्ष बाजूला करायचं असेल तर थोडावेळ गप्पा मारूया. “काय गं मंगला, पदवी परीक्षा पास झालीस त्यानंतर नोकरी वगैरे करण्याचा विचार नाही आला डोक्यात? विश्वनाथने विचारलं.
दादा आणि माई वारल्यानंतर माझं लक्ष भविष्यातल्या गोष्टींकडे लागलंच नाही. आंबा आणि चिंचेच्या बागा आहेत त्यामध्येच काकांना मदत करू लागली; मंगल बोलू लागली. मला ना खूप वाटायचं पदवी झाल्यावर मी बँकेत कामाला लागेन. त्यानंतर काही वर्षांनी माझं लग्न होईल. लहानपणापासून मला तू आवडायचास. तुझं पत्र मिळालं, तू इथे राहणार असल्याची बातमी वाचली आणि आनंद झाला. तुला इतक्या दिवसांनी परत बघितल्यानंतर मला जुने दिवस आठवले.” विश्वनाथ तिच्या चेहऱ्याकडे बघून सर्व ऐकत होता. “मी ठरवलेलं तू आलास की तुला लग्नाबद्दल विचारायचं” हे एवढं बोलणार तेवढ्यात विश्वनाथला मंगलाच्या पाठून ती पांढरी आकृती बाहेर गेलेली दिसली. विश्वनाथने मंगलला मुक्याची खूण करून न बोलण्यास सांगितलं आणि त्याच्या पाठीमागून ये असं खुणावलं.
ती पांढरी आकृती त्या आंबा-चिंचेच्या झाडांच्या बागेमध्ये गेली आणि एका ठराविक अंतरावर जाऊन थांबली आणि वर झाडावर जाऊन बसली. त्या काळोख्या अंधारात तिच्या त्या कर्णकर्कश किंकाळ्यांनी आणि त्याचबरोबर भयानक हास्याने संपूर्ण बाग हादरून गेली होती. लहानपणी त्या दोघांनी ज्या झाडांवर दगडं मारली होती ती झाडे त्यांच्या खोडांवर, फांद्यांवर त्यांनी फेकून मारलेल्या दगडांचे व्रण दाखवीत होती. प्रत्येक झाड एकामागून एक बोलत होतं, “तुम्ही आमच्या फळांना दगडं मारुन खाली पाडायचात आणि आनंदाने खायचात. आमच्या वेदनांचा तुम्ही कधी विचार केलाय? आमच्या अंगावर पडलेले हे व्रण जन्मोजन्मी असेच राहणार आहेत.”
झाडांच्या त्या आकांताने चिखली गावाचा तो संपूर्ण आसमंत दणाणून गेला होता. मंगल विश्वनाथाच्या छातीवर चेहरा लपवून रडत होती.
शेवट एकदमच अनपेक्षित… छान लिहिली आहे
तुमचे आभार माधवी जी..
Comments are closed.