लेखक – जयंत नारळीकर
कादंबरीचे नाव – प्रेषित
सारांश लेखन – कल्पेश वेदक, साहित्यकल्प
रात्र झाली तशी मालिनीने सुधाकरजवळ अलोकबद्दल आपली चिंता व्यक्त केली. आपल्या मैत्रिणीच्या मुलाच्या वाढदिवसाला केलेल्या कृत्याबद्दल ती सुधाकरला सांगत होती. वाढदिवसाला सर्व लहान मुलं फेर धरुन रिंगा-रिंगा-रोजेस खेळात होती आणि अखेरीस सर्व खाली पडल्यावर आलोक एकटाच उभा होता. लक्ष दुसरीकडे असल्यासारखं बघत होता. त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव होते. मी त्याच्याजवळ जाऊन त्याला विचारले की काय झालं, तर तो हळूच पुटपुटत होता, “खरोखरच ते सर्व मेले का?” मला याचा काही अर्थ कळला नाही. आपण त्याला शाळेत घालू म्हणजे अभ्यास करून तो स्वतःच्या नादात न राहता अभ्यास करत बसेल. सुधाकरला या घटनेचा अर्थ कळला नाही. ज्या बालगीतामुळे आलोक अस्वस्थ झाला ते युरोप खंडातील तेव्हाच्या परिस्थितीचे द्योतक होते. प्लेगच्या लाटून माणसे शिंका येऊन पटापट मरून जात होती आणि या आलोकला या वयात बालगीताच्या शेवटी मृत्यूची छाया कशी दिसली?
मालिनी आणि सुधाकरमधील बोलण्याप्रमाणे आलोकला शाळेत भरती करण्यात आले. आलोक शाळेत शिकत असताना शैक्षणिक वर्ष २०३० होतं म्हणून शाळा ही टीव्हीच्या मोठ्या पडद्यावर घरातच अनुभवायला मिळत होती. हजेरी, गैरहजेरी सर्व मॉनिटरद्वारे तपासून मग शाळेला सुरुवात व्हायची. आलोकचा आज शाळेतला पहिला दिवस होता. शिक्षकांनी सर्व विद्यार्थ्यांना दोन अंकांची, तीन अंकांची बेरीज, वजाबाकी, गुणाकार अशी वेगवेगळी गणिते सोडवण्यास दिली. प्रत्येक मुलाने सोडवलेले गणित कॉम्पुटरवर दिसत असे. बरोबर असल्यास हिरवा सिग्नल मिळत असे. त्यानंतर शिक्षकाने सर्व मुलांना एक कठीण प्रश्न विचारला १ ते १०० अंकांची बेरीज किती?
१ ते १०० अंक लिहीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना खूप वेळ लागेल या विचाराने शिक्षक आरामात खुर्चीवर बसले, परंतु आलोकने ते गणित ३ मिनिटांत सोडवून शिक्षकाला आश्चर्यचकित केले होते. त्यानंतर अलोकला विचारण्यात आले की इतक्या कमी वेळेत एवढे कठीण गणित कसे सोडवलेस, तर अलोकने त्यांना सर्व पायरीपद्धतीने त्यांना समजावून सांगितले. मास्तर थक्क झाले. त्यानंतर मास्तरांनी कॉम्पुटरवर तपासून पाहिले की आलोकव्यतिरिक्त इतर कुठल्या विद्यार्थाने हे गणित सोडवले होते, परंतु त्यांना असे आढळून आले की, आलोक हा पहिला आणि एकच विद्यार्थी होता ज्याने इतक्या कमी वेळात हे गणित सोडवले होते. त्यानंतर मास्तरांनी सुधाकरशी संपर्क साधला.