गंभीर समस्या…

0
606

– कल्पेश वेदक / लघुकथा /

तुमच्या आयुष्यात तुम्हाला किती समस्या आहेत? विचार करत बसलात? मान्य आहे.. खूप आहेत! बरोबर आहे तुमचं, कोणाच्या आयुष्यात समस्या नाहीत? तरी प्रत्येकजण स्वतःचं आयुष्य स्वतः जगत आहेच.. जगत आलाय.

आता या मधुकराचंच उदाहरण घ्या! साधारण साठच्या दशकात घडलेली ही घटना. एक मजली चाळीच्या शेवटच्या खोलीत एकटाच राहणारा हा मधुकर. आई-वडील गावाला राहत होते. मधुकर शिक्षण पूर्ण करुन नोकरीसाठी शहरात आला होता. आपलंही लग्नं व्हावं. सुंदर बायको असावी, तिच्याबरोबर फिरायला जावं. चाळीतल्या इतर वैवाहिक दांपत्यांसारखं चाळीच्या सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी स्वप्नं तो फार बघायचा. नोकरीला लागून जेमतेम एक-दोन वर्ष उलटली असतील आणि आपलं आता लग्नं व्हायला हवं या विचारात तो आलेला दिवस पुढे ढकलायचा. आपल्याला कुणी मुलगी पसंत करेल का? आपलं लग्नं होईल का? ही त्याच्या दृष्टीने गंभीर समस्या होती.

एकदा तो एका ज्योतिषाकडे आपल्या आयुष्यात लग्नाचा योग आहे की नाही, की आपण असेच ब्रम्हचारी राहणार हे जाणून घेण्यासाठी गेला. ज्योतिषाने विचारलेल्या सर्व प्रश्नांची म्हणजे, नाव-गाव काय?, आई-वडील कुठे आहेत?, जन्मपत्रिका आणली आहे का? अशा काही प्रश्नांची उत्तरे दिली. उत्तरे दिल्यावर ज्योतिषीबुवा स्वतःजवळ असलेल्या जुन्या-नवीन पंचांगांत, पोथ्यांमध्ये काहीतरी तपासू लागले. ज्योतिषी बुवांना त्यांच्या कामात व्यस्त असलेले पाहून मधुकर आपल्या स्वप्नात पार बुडून गेला. इतका की जणू काही त्याचं लग्नंच ठरलं आहे, सर्वजण त्याच्या लग्नाची तयारी करत आहेत, समोर मुलीकडील मंडळी बसली आहेत, आतल्या खोलीतून आपल्यासाठी आपल्याला होकार दिलेली मुलगी गरम गरम पोहे घेऊन येत आहे, आपल्याबरोबर ज्येष्ठ म्हणून हेच ज्योतिषीबुवा आले आहेत आणि “उत्तम गुणांनी पत्रिका जमली बरे, आता लवकरात लवकर लग्नं उरकून घ्यायला हरकत नाही” असे बोलून ज्योतिषी मुहूर्त सुचवत आहेत हे सर्व मधुकर स्वप्नात बघत होता.

ज्योतिषाने त्याला दोन-तीन वेळा हाका मारल्या, “मधुकरराव, अहो मधुकरराव!” तरी तो कसलाही प्रतिसाद देईना, त्यामुळे त्या ज्योतिषाने पर्यायाअभावी अखेरीस त्याचे दोन्ही खांदे गदागदा हलवले आणि ओरडत म्हणाले, “अहो जागे व्हा.. स्वप्नं कसली बघताय? भविष्य जाणून घ्यायला आलात ना? का झोपा काढायला?” ज्योतिषाने आपला स्वप्नभंग केला या विचाराने मधुकर थोडा रागावलाच आणि लगेच चेहऱ्यावर उत्सुकता आणत जोतिषाला म्हणाला, “कधी ठरेल हो माझं लग्नं? यावर्षी काही योग आहे का?” ज्योतिषी वर डोळे करत त्याला म्हणाले, “हे बघा मधुकरराव, लग्नं लवकरच जुळेल पण घाई करु नका. योग्य ती गोष्ट योग्य त्या वेळीच होते, हे लक्षात ठेवा.”

ज्योतिषीबुवांनी दिलेल्या उत्तराने मधुकर असमाधानी होता. आपला वेळ फुकट वाया गेला या विचाराने त्याचा हिरमोड झाला आणि परत घरी जायला निघाला. “अरे याहून अनेक समस्या आहेत, चल जाऊ दे, होईल लग्नं. व्हायचं तेव्हा होईल”, अशी स्वतःची समजूत काढत काढत रस्त्याने जात असताना उत्साहाने त्याने स्वतःसाठी काही कापड खरेदी केले. ते कापड घेऊन तो शिंप्याकडे गेला. शिंप्यानेदेखील आपले कसब दाखवून, कौशल्याने त्याची सर्व मापे घेतली आणि “शिवलेले कपडे पुढच्या आठवड्यात मिळतील, तेव्हा पुढच्या आठवड्यात पैसे आणि ही पावती घेऊन या.” असे सांगितले. चला पुढच्या आठवड्यात नवीन कपडे घालून नोकरीवर जाता येईल या विचाराने तो आनंदी झाला आणि घराकडे जायला निघाला.

वर आकाशाकडे बघत मधुकर ‘युवतिमना दारुण रण रुचिर प्रेमसे झाले’ हे नाट्यगीत गुणगुणत गुणगुणत गल्लीतून आत शिरत असताना त्याला एका सुंदर युवतीचा धक्का लागला. “अहो! सावरा स्वतःला. बरं झालं माझं लक्ष होतं म्हणून, नाहीतर तुम्ही पडला असता खाली.” मधुकर उगाच उसनं धाडस आणून मोठ्या फुशारक्या मारत म्हणाला. “अहो, मी ना जरा घाईत आहे, इथे रमा काकूंकडे आले होते कामासाठी. चुकून धक्का लागला. माफ करा.” ती युवती थोड्या अदबीने म्हणाली. “व्वा रमा काकू का? छान छान, खाणावळ लावलीत का तुम्ही?”, मधुकरने आगाऊपणे प्रश्न केला, तेवढ्यात ती युवती म्हणाली, “मी जाते आता, मला बरीच कामं आहेत. पुढच्या आठवड्यात मी परत रमा काकूंकडे येणार आहेच, तेव्हा आपण सविस्तर बोलू.” हे बोलून ती युवती निघून गेली. तेवढ्यात मधुकराला त्या ज्योतिषाचं वाक्य आठवलं, “लग्नं लवकरच जुळेल पण घाई करु नका. योग्य ती गोष्ट योग्य त्या वेळीच होते, हे लक्षात ठेवा.” आणि गालातल्या गालात हसत स्वतःलाच धीर देत म्हणाला, “मधुकरराव, घाई नको! संयम पाळा.”

त्यानंतर मधुकर रमा काकूंना स्वतःहून मदत करण्यासाठी कधी नव्हे तो त्यांच्या घरी दररोज जाऊ लागला. सकाळी कामाला जाताना आणि कामावरून घरी येताना किराणा मालाच्या दुकानातून सामान आणून देऊ लागला जेणेकरुन रमाकाकू खुश होतील आणि बोलण्याच्या ओघात त्या युवतीबद्दल बोलून माहिती देतील. पण रमा काकू दरवेळी त्यांच्या कामात व्यस्त असल्याने त्यांनी कधीही त्या युवतीबद्दल एक अवाक्षर काढलं नाही. त्यामुळे मधुकर फक्त दिवास्वप्नं पाहू लागला. प्रत्येकवेळी स्वप्नात ‘ती’ युवती यायची आणि हेच बोलून जायची, “पुढच्या आठवड्यात मी परत रमा काकूंकडे येणार आहेच तेव्हा आपण सविस्तर बोलू.” या एका वाक्याने मधुकर भारावून गेला होता आणि त्यामुळे हा आठवडा कधी संपतोय त्याची तो वाट बघत होता. दररोज कामावरुन घरी परतताना, शिवायला दिलेले कपडे तयार झाले की नाही याची चौकशी तो शिंप्याकडे जाऊन करत होता. त्याने तशी विनंतीसुद्धा केली होती की शिवायला दिलेले कपडे लवकर मिळाले तर फार उपकार होतील. पण राहून राहून सारखा त्या ज्योतिषाचा आवाज त्याच्या कानात घुमायचा, “लग्नं लवकरच जुळेल पण घाई करु नका. योग्य ती गोष्ट योग्य त्या वेळीच होते, हे लक्षात ठेवा.” मग मधुकर परत स्वतःचीच समजूत घालत पुढच्या कामाला जुंपून जायचा.

अखेर तो दिवस उजाडला. त्याला आज शिंप्याकडून शिवायला दिलेले कपडे आणायचे होते आणि उद्या ‘ती’ युवती रमा काकूंना भेटायला येणार होती. त्याने त्या संपूर्ण आठवड्यात कितीतरी योजना आखल्या होत्या. नवीन कपडे घालून तो तिला खास भेटणार होता आणि त्याच्या मनातील सुप्त ईच्छा बोलून दाखवणार होता. नोकरीहून घरी परतताना त्याने शिंप्याकडून नवीन कपडे आणले. घरी जाऊन कपडे कसे शिवले आहेत ते तो पाहू लागला. पण झाली पंचाईत. शिंप्याने मधुकराचा ‘लंगोट’ कमी मापाचा शिवून दिला होता. त्यावर तो चवताळून उठला, “अरे, हे काय चाललंय काय? इतके दिवस मी वाट बघितली, म्हंटलं, त्या युवतीला भेटायचं आहे म्हणजे सर्व नवीन कपडे घालून तिच्या समोर जाईन आणि मनातलं बोलेन, पण त्या शिंप्याने माझा लंगोट तोकडा शिवला. बघून घेतो त्याला.” हे म्हणत तो त्या शिंप्याकडे गेला. शिंपी म्हणाला, “आता आम्ही या लंगोटाचं काही करू शकत नाही. एकतर तुम्ही हा लंगोट कमी वय असलेल्या मुलाला द्या किंवा, किंवा काहीही करा.. आता आम्ही काही करू शकत नाही, बरीच कामं आहेत.” शिंप्याच्या अशा उद्धट बोलण्याने मधुकर अजूनच रागावला आणि तसाच तो पोलीस ठाण्यात पोहचला. तिथे असलेल्या पोलीस निरीक्षकाने मधुकरची सर्व हकीकत तोंडातल्या तोंडात हसत हसत ऐकून घेतली आणि गंभीर स्वरात म्हंटलं, “बरं बरं, तुम्ही एक काम करा, लेखी स्वरूपात आमच्याकडे तक्रार नोंदवा. आम्ही बघून घेतो पुढे काय करायचं. तुमच्या मापाचा लंगोट तुम्हाला मिळेल. आणि हो हवं असल्यास माप पण नमूद करा.”

मधुकर लेखी तक्रार करून घरी आला. “उद्या येणाऱ्या त्या युवतीला भेटायचे आहे तर असा चेहरा करुन कसं चालेल?” परत स्वतःचीच समजूत घालून रात्रभर तो तिचेच स्वप्नं बघू लागला. मधुकरने दुसऱ्यादिवशी लवकर उठून, सर्व आन्हिकं उरकून नवीन कपडे घातले आणि पहिल्यांदा रमा काकूंचं घर गाठलं. तिथे ‘ती’ युवती आधीच आली होती. तिचं आणि रमा काकूंचं खाणावळी संदर्भात काहीतरी बोलणं चालू होतं. तिच्याबरोबर अजून एक युवक होता. रमा काकूंनी मधुकरला दारात आलेला पाहिला आणि त्यांना वाटलं की नेहमीप्रमाणे सामान आणून देण्यासाठी यादी मागतोय त्यामुळे त्या म्हणाल्या, “अरे आत ये ना, बघ दररोज कसा यायचास आणि हिच्याबद्दल विचारायचास, बघ आली आहे ही आणि हा तिच्याबरोबर जो आहे तो हिचा होणारा नवरा. यांना पण उपनगरात म्हणे खाणावळ सुरु करायची आहे. त्यासाठी हे आले आहेत. बरं तू एक काम कर खालून किराणा मालाच्या दुकानातून या यादीमधलं सामान आण जा आणि नंतर येऊन बोलत बस यांच्याशी.”

मधुकर जड पावलांनी तसाच मागे फिरला आणि घरात जाऊन छताकडे एकटक बघत पलंगावर पडून राहिला. त्याच्या डोक्यात विचारांचं काहूर माजलं होतं. त्या विचारात कधी ज्योतिषी बुवा येऊन त्याला ‘तोच सल्ला’ देत आहेत तर कधी शिंपी त्याचा ‘लंगोट’ शिवून देत नाही असं सांगतोय आणि नंतर ती युवती तिच्या मंजुळ आवाजात “आपण पुढच्या आठवड्यात सविस्तर बोलू” असे तीन एकामागून एक विचार चक्रावत होते. मधुकरच्या पापण्यांच्या कडा पाणावल्या होत्या, त्याने डोळे घट्ट मिटले. नंतर जेव्हा त्याला जाग आली ती रमा काकूंच्या हाकेने, त्यांनी त्याच्यासाठी रात्रीचा डबा आणला होता, पलंगाशेजारी असलेल्या टेबलावर डबा ठेवत त्या म्हणाल्या, “काय रे मधुकर, सकाळी जो गेलास तो आलाच नाहीस परत. मी मग दुसऱ्याला सांगितलं ते काम आणि हे बघ त्या मुलीने तुझ्यासाठी काहीतरी भेट दिली आहे. ती म्हणाली, की त्यादिवशी तू तिला सावरलं नसतं तर तिचा तोल जाऊन ती पडली असती म्हणे. हे बघ काहीतरी तिने पिशवीत दिलं आहे.” पिशवीवर त्या शिंप्याच्या दुकानाची जाहिरात लिहिलेली होती आणि त्या पिशवीत तीन मीटर कापड भेट म्हणून आणि त्यासोबत एक चिठ्ठी त्या युवतीने मधुकरला पाठवली होती. त्या चिठ्ठीत तिने त्याला लिहिलेलं होतं – “माफ करा, माझ्या वडिलांनी तुमची जरा पंचाईत केली. तुम्ही त्यादिवशी दुकानात आलात. माझ्या वडिलांशी वाद घालत होतात तेव्हा मी तुम्हाला आतल्या खोलीतून पाहिलं पण ओळख दाखवता येणं अशक्य होतं म्हणून झालेल्या प्रकारासाठी मी माफी मागते आणि हे कापड भेट म्हणून देत आहे, त्याचा स्वीकार करावा. कृपया पोलिसात दिलेली तक्रार मागे घ्यावी. माझे वडील तुम्हाला योग्य त्या मापाचा लंगोट फुकटात शिवून देतील याची मी खात्री देते.”

मधुकर नंतर ती चिठ्ठी घेऊन घराच्या खिडकीतून दूरवर कुठेतरी एकटक पाहत, मनातल्या मनात हसत स्वतःशीच म्हणाला, “मधुकरा, अरे आयुष्यात याहून अनेक वाईट समस्या आहेत, जाऊ दे.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here