मन मानसीं दुःख आणूं नको रे ।
मन सर्वथा शोक चिंता नको रे ।।
विवेकें देहेबुद्धि सोडूनि द्यावी ।
विदेहीपणें मुक्ती भोगीत जावी ।।१२।।
अरे मना, तू मनामध्ये दुःख स्वीकारू नकोस, फेकून दे. शोकग्रस्त व चिंताग्रस्त होऊन कधीही कुढत बसू नकोस. देहच फक्त मी आहे असे समजणे व असा ‘मी’ चा संकोच करणे म्हणजे देहबुद्धी. त्यामुळेच दुःख, शोक, चिंता यांचे जाळे पसरू लागते. देहबुद्धीच्या पलीकडे गेले कि आनंद साम्राज्यात प्रवेश होतो. विवेकी शक्ती वाढवणे, सारासार विचार करावा. विदेहीपणे आले कि मोक्ष प्रचिती म्हणजेच आनंदाचा अनुभव.