श्री हरी संकीर्तनाचे अमृततत्व आपल्या अमृतमय वाणीने जनसमुदायांत पोहोचविणारे संतकवी श्री अमृतराय महाराज

0
1815

मराठी भाषेतील संतकवी श्री अमृतराय महाराज. श्री अमृतराय महाराज यांचें नांव अमृत आणि त्यांचे काव्य देखील अमृतासारखेच. श्री हरी संकीर्तनाचे अमृततत्व आपल्या अमृतमय वाणीने ज्ञानामृत वर्षाव करित त्यांनी असंख्यजन भक्तीमार्गाला लाविले. रायजींनी त्या वेळच्या समाजाच्या परिस्थितीचे बारीक निरीक्षण करून काही काव्य केलेले आहे त्याचा विपरीत अर्थ घेऊन काही लोक गैर अर्थ लावतात.

उत्तर पेशवाईत सर्वच राष्ट्राचे जीवन विलासी होत चालले होते. लोकांनी आपला बाह्य वेष बदलला. त्याचप्रमाणे वाड्मयाकडे बघण्याचा दृष्टिकोन ही बदलला. ओवी मागे पडली. श्लोकही लोकप्रिय वाटेना. नुपुरांचे झणत्कार व कंकणाचे टुणत्कार ऐकण्यासाठी लोकांचे कान आसुसलेले होते. अशा परिस्थितीत रायजींनी आपला काव्य प्रवाह वाढवला आणि लोकांना हवे असणारे कटाव, आग्रहाने, पदे, चुर्णिका असे निरनिराळे काव्य प्रकार देउन लोकांची भगवत्भक्तिकडे ओढ निर्माण केली. त्यांचे काव्य वाचताना मन प्रसन्न होते. कटाव ऐकताना माणूस डोलू लागतो. आपले काव्य बहुजन समाजापर्यंत पोहोचावे यासाठी मराठी, हिंदी, फारशी, उर्दू, संस्कृत, कानडी इ.भाषेमधून काव्य रचना केली आणि लोकांना भक्ती प्रेमाचा व ज्ञानाचा बहुमोल असा ठेवा दिला. त्यांची काव्यरचना संस्कृत प्रचूर असली तरी प्रासादिक आहे व ती तेजस्वी अशा गुणांनी नटलेली आहे. त्यांच्या कटावातून सानुस्वर अनुप्रासांची लड सारखी निर्माण करुन त्यात उत्प्रेक्षा भाषादी अलंकार अभिनवतेने पदोपदी संकीर्तन, वर्णन रंग फुलवतात. कडाका, छंद, चुर्णीका यातही ठेक्यावर गाता म्हणता येण्याजोगी रचना आहे. मराठी कटावाप्रमाणेच हिंदी भाषेतही अमृतरायजींनी बरेच कटाव रचलेले आहेत.

त्यांच्या आईचे नाव उमा व वडिलांचे नाव शंकर होते. अमृतेश्वर महादेवाच्या कृपेने यांचा जन्म झाला म्हणून महाराजांचे नाव अमृत असे ठेवले. अमृतरायजींचा लिहिणे आणि वाचण्याचा अभ्यास घरीच झाला होता. त्यांच्या घरी कुलकर्णी पटवारीपण चालत आले होते. अशा या घरात हा एकुलता एक मुलगा नवसाने झालेला. त्यामुळे त्यांचे बालपण अत्यंत ऐश्र्वर्यात, वैभवात गेले आणि ईश्वरकृपेने पुढेही त्यांना ऐश्वर्य त्यांच्या कर्तबगारीने प्राप्त होत गेले. वयाच्या ११ व्या वर्षी चैत्र शुद्ध षष्ठी शके १६३१ ला महाराजांनी कटिबंध रचना करून ईश्वराला सादर केली व सर्वांना गाऊन दाखविली. त्याच बरोबर हरिकथा निरुपण प्रारंभ केला. वडिलांबरोबर राजकारणार्थ प्रवास व अनेकांशी झालेला व्यवहार तसेच संत, सत्पुरूष, विद्वान यांच्या भेटी व सहवास वारंवार होऊन ज्ञान संपन्नता विशेष झाली. विद्या, पराक्रम, तारूण्य व ऐश्वर्य असुनही निराभिमान वृत्तीने राहण्यात रायजींना समाधान वाटत असे. श्री अंबिका सरस्वती नामक एका आचार्य यती जवळुन वेदांत, तत्व, स्मृती, शास्त्र, पुराणे, भागवत इ.विषयांचा अभ्यास केला. त्याचबरोबर घोड्यावरून लांब दौरे करणे, राजकारण, राजकार्य व्यवस्था व धर्मसंकीर्तन ही सतत चालू होती. शके १६३९ चर्या वैशाखामध्ये औरंगाबाद (संभाजीनगर) येथील विठ्ठलराज यांची कन्या रमा बरोबर अमृतरायजींचा विवाह बेगमपुरा येथे ब्राह्मविवाह पद्धतीने झाला.
अमृत-रमाचा संसार म्हणजे अमृतमय आहे हे जाणून माता पिता ब्रह्मानंदमय होते. परमार्थ चरणव्रत चालवित असता त्या शंकर-उमा यांना शके १६४१ च्या शेवटच्या एकादशी व्रतोपवास हरिजागर कीर्तनात एकाच वेळी समाधी लागली. औरंगाबाद येथील विसोमोरे नामक मुत्सद्याकडे ते खजिनदाराचे काम पाहू लागले. नोकरी औरंगाबाद येथे. कुटुंबाचे माहेर ही औरंगाबाद म्हणून रायजींनी साखरखेर्डा शके १६४३ च्या सुमारास सोडले व औरंगाबाद येथे औरंगपुरा येथे नाथ मंदिरासमोर स्थायिक झाले. मराठी, हिंदी, संस्कृत, फारशी, कानडी इ. भाषांच्या प्राविण्यामुळे अमृतरायजी हे अल्पावधीतच सर्वांच्या प्रेमास प्राप्त झाले. अमृतरायजींचा प्रपंच, त्यांची राहणी नबाबशाहीची होती. रमा भार्या या सदैव त्या ऐश्र्वर्याला सावरणाऱ्या व शोभणाऱ्या आणि सर्व समृद्धी संपन्न अशा महासाध्वी होत्या.

कुशाग्र बुध्दीमत्ता, अंगात असणारे विविध गुण व विनोदी स्वभाव तसेच जन्ममात कवित्व शक्ती यामुळे अमृतरायजी अल्पावधीतच लोकप्रिय झाले. अमृतराय व त्यांचे गुरू मध्वनाथ यांनी त्या वेळच्या परिस्थितीचा अभ्यास करून काव्य रचना केली आणि मराठी सारस्वताचे एक मनोरम दृश्य निर्माण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here