मराठी रंगभूमीला लाभलेले प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकर

मराठी रंगभूमीला लाभलेले प्रसिद्ध नाटककार, कथालेखक, कादंबरीकार कै. वसंत कानेटकर. प्रा. वसंत कानेटकर हे अग्रगण्य प्रतिभाशाली नाटककार होते. त्यांच्या नाटकांनी मराठी रंगभूमीवर एक वेगळा इतिहास रचला. प्रयोगशीलता व व्यावसायिकता यांचा समन्वय कानेटकरांच्या नाटकांत अगदी उत्कृष्टपणे दिसून आला. त्यानंतर एकांकिकांमध्ये त्यांनी आपल्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला. नाट्यमय खटकेबाज संवादांनी, गतिमान व पकड घेणाऱ्या कथानकांनी एकांकिकांचा दर्जा उंचावला. नाटकातील संवादाबद्दल कानेटकर म्हणतात, “नाटकातील संवाद म्हंणजे संभाषण नव्हे. त्यातील संवादात दृश्यात्मकता आणि कलात्मकताही असते. नाटक केवळ दृश्य-काव्य नसते, तर संवाद देखील. जो संवादाचं संभाषण करतो तो नाटककार फसतो.”

कानेटकरांचे माध्यमिक व उच्चशिक्षण पुणे व सांगली येथे झाले. इंग्रजी विषय घेऊन एम. ए. पदवी मिळविल्यानंतर नाशिक येथे हंसराज प्रागजी ठाकरसी महाविद्यालयात (एचपीटी) सुमारे २५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. एखाद्या विषयाचे सखोल ज्ञान, शिकविण्याची उत्कृष्ट हातोटी त्यामुळे विद्यार्थीप्रिय अशा कानेटकर सरांच्या वर्गात ज्यांचा तो विषय नाही असे विद्यार्थी सुद्धा त्यांचे लेक्चर ऐकायला त्या वर्गात बसत असत. अशा आठवणी आजही सरांबद्दल सांगितल्या जातात. २५ वर्षे अध्यापन केल्यानंतर नाट्यलेखनासाठी सरांनी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली. कवी गिरीश हे कानेटकर सरांचे वडील. त्यामुळे घरातील काव्य आणि साहित्याच्या भारावलेल्या वातावरणात त्यांच्या पिडाची जडणघडण झाली. याशिवाय वि. स. खांडेकर यांचा सहवास मिळाल्याने साहित्याचा दर्जेदारपणा कळत नकळत रूजला गेला. नाशिकला आल्यावर कुसुमाग्रजांच्या सहवासातूनही त्यांच्यातील साहित्यिक आणखी फुलत गेला. नाटककार म्हणून ओळख असलेल्या कानेटकरांनी सुरुवातीला कथा, कादंबरीपासूनच आपल्या लेखनाला सुरुवात केली.

देवांचं मनोराज्य’, ‘प्रेमा तुझा रंग कसा’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘लेकुरे उदंड जाहली’, ‘मत्स्यगंधा’, ‘हिमालयाची सावली’, ‘विषवृक्षाची छाया’, ‘कस्तुरीमृग’,‘वादळ माणसाळतयं’, ‘अश्रूंची झाली फुले’, ‘मला काही सांगायचयं’ इ. अनेक नाटके त्यांनी लिहिली. नुसती लिहिली असं नाही तर प्रत्येक नाटकात सरांनी वेगवेगळे प्रयोग हाताळले होते. नाटकातलं कथानक बीज समाजातील विषयांवर असले तरी सामान्य कक्षा ओलांडून विषय, आशय, आविष्कार आणि भाषा या सर्व माध्यमातून सरांची नाट्यलेखनावर उत्कृष्ट पकड असे. त्यांनी लिहिलेल्या संवादात भावनेचे मर्म, उत्कटता आणि भाषेची लवचिकता ही वैशिष्ट्ये प्रकर्षाने जाणवत. मराठी रंगभूमीला स्थैर्य देणार्या ठरावीक नाटककारांमध्ये कानेटकर सरांचे नाव अग्रेसर समजले जाते.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here