प्रेम आणि बरंच काही…
आज खूप एकटं वाटत आहे… कुठेतरी आपण चुकतोय का? असा विचार मनात आहे…
संदर्भ लावत आहे, पण उत्तर सापडत नाही…
मनात असलेली घालमेल, आज ओठांवर येणं कठीण झालं आहे…
विचारांचा समतोल कुठेच जुळत नाही…
प्रेमाच्या भावनांना अंकुर फुटत आहे, रोज नवी पालवी येऊन गळूनही जात आहे…
सर्व छान आहे पण तरी खूप एकटं वाटत आहे…
नात खूप वेगळं आहे, समाज त्याच्या विरोधात आहे..
घरच्यांचा रोष बघून वेगळं राहण्याचीही भावना आहे…
नात्याची ही सुरवात आहे, नवीन अडचणी समोर उभ्या आहेत…
प्रेमाच्या अपेक्षांमध्ये स्वतःची ओळख विसरत आहे…
सायंकाळची वेळ आहे, चंद्र खूप एकटा आहे…
सोबतच्या ताऱ्यांना तो आतुरतेने शोधत आहे…
प्रेमाच्या नावाखाली आज विवस्त्र होत आहेत…
अपेक्षाभंग सोडा आजकाल विनयभंगाचा प्रयत्न होत आहे…
प्रेमाची व्याख्या बदलत आहे,
कोणी रंगावर तर कोणी पैशांवर प्रेम करत आहे…
प्रेमाच्या बाजारात समजूतदारपणाची परीक्षा आहे…
कोण किती पाण्यात तर कोण किती प्रेमात आहे…
हट्ट पुरवणारा प्रियकर आज स्वतःचे हट्ट विसरत आहे…
त्याला काय हवं, त्याला काय आवडतं ह्यापेक्षा
त्याने काय करावं, त्याने माझं ऐकावं हा हट्ट जास्त आहे…
सोशल मीडियाच्या माध्यमातून डबल-डेट होत आहेत…
कोणता जोडीदार चांगला याची निवड होत आहे…
कोणाचा तरी आनंद तर कोणाचा विरह होत आहे…
लग्नापेक्षा LEAVE IN RELATIONSHIP ला जास्त वाव आहे…
जमलं तर तेच नाहीतर दुसऱ्याला भाव आहे…
माझं विवाहबाह्य प्रेम आहे, हे सहजतेने व्यक्त होत आहे…
ह्याला दुसरं जबाबदार कोणी नसून हे सरकारमान्य आहे…
दहा बारा वर्षांचं प्रेम एका शब्दात तुटत आहे…
घटस्फोटाचे कागद रद्दी सारखे वाढत आहेत…
हे प्रेम नसून बंधन आहे, सर्व सहज, गोड
आणि आनंदी व्हावं यासाठी आपण आपल्या
प्रेमाला घातलेलं एक नाजूक कुंपण आहे…