मराठी साहित्यातील वन्यजीव आणि आदिवासी जीवनावर ललितलेखन करणारे एक आघाडीचे लेखक मारुती चितमपल्ली. मारुती चितमपल्ली यांना त्यांच्या निसर्ग क्षेत्रातील अभ्यासामुळेच पक्षितज्ज्ञ व निसर्गलेखक ही ओळख मिळाली. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी इंग्रजी शब्दांना मराठीत दिलेले पर्यायी शब्द आज रुळलेत. तसेच कार्य जंगलाच्या बाबतीत मारुती चितमपल्ली यांनीही करून ठेवले आहे.
अरण्य आणि त्याभोवताली विणल्या गेलेल्या विश्वातील कितीतरी घटकांना चितमपल्ली यांनी आपल्या शब्दांमध्ये गुंफले आहे. पक्षी असोत की वनस्पती, कितीतरी नवी नावे केवळ त्यांच्यामुळे मराठी साहित्यात नोंदली गेली आहेत. या मूळ तेलगू भाषिक माणसाने मराठीला सुमारे एक लाख शब्दांचा खजिना उपलब्ध करून दिला आहे.चितमपल्लींनी पक्षिशास्त्रातील अनेक संज्ञांचे मराठी नामकरण केले आहे.जसे कावळ्यांच्या वसाहतीला इंग्रजीत रूकरी असा शब्द आहे. चितमपल्लींनी त्यासाठी काकागार हा शब्द योजला. तसेच हेरॉनरी (बगळे,ढोकरी ह्या पक्ष्यांची वीण वसाहत) ला सारंगागार असा समर्पक शब्द मराठीत तयार केला आहे. रूस्टिंग प्लेससाठी रातनिवारा हा शब्द वापरला आहे. टणटणी (घाणेरी) चे रायमुनिआ तर बहाव्याचे अमलताश हे नाव चितमपल्लींमुळे नागरी वाचकांस माहित झाले.
त्यांनी कर्नाळा पक्षी अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नागझिरा अभयारण्य आणि मेळघाट व्याघ्र प्रकल्प यांच्या विकासात भरीव कामगिरी केली. पक्षीतज्ञ म्हणून त्यांची ख्याती झाली. त्यांनी वन्यजीवन व्यवस्थापन, वने, वन्यप्राणी आणि पक्षीजगताविषयी उल्लेखनीय संशोधन केले, तसेच अनेक आंतरराष्ट्रीय परिषदांत सहभागी होऊन निबंधवाचन केले.पक्षी जाय दिगंतरा, जंगलाचं देणं, रानवाटा, शब्दांचं धन, रातवा, मृगपक्षिशास्त्र (संस्कृत-मराठी अनुवाद), घरट्यापलीकडे, पाखरमाया, निसर्गवाचन, सुवर्णगरुड, आपल्या भारतातील साप (इंग्रजी-मराठी अनुवाद), पक्षिकोश, आनंददायी बगळे, निळावंती, केशराचा पाऊस इत्यादी पुस्तके आणि ‘चकवा चांदणं’ हे आत्मचरित्र त्यांनी लिहिले.