मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी लेखिका बाळूताई खरे

मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी व कालातीत लेखिका कै. मालती बेडेकर. त्यांचे मूळ नाव बाळूताई खरे होते तसेच त्या विभावरी शिरुरकर, श्रद्धा, बी. के. कटूसत्यवादिनी या नावानेसुद्धा लेखन करीत असत.

त्यांचे शिक्षण पुणे जिल्ह्यातील घोडनदी (शिरूर) येथे सातवीपर्यंत झाले. पदवी शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे येथे कन्याशाळेत शिक्षकाची नोकरी केली. बेडेकर त्यांचे वडिल, तसेच, महर्षी अण्णासाहेब कर्वे, वामन मल्हार जोशी आणि मा. माटे यांच्या व्यक्तिमत्वाने प्रेरित झाल्या. त्यांचा हिंगणे संस्थेत काम करत असताना अनाथ, विधवा आणि नव-यांनी छळलेल्या स्त्रीयांशी संपर्क आला. त्या परिस्थितीमुळे अस्वस्थ झालेल्या मालती बेडेकरांनी प्राचीन भारतीय समाजातील समकालीन स्त्रीयांचे अधिकार आणि स्थिती जाणण्यासाठी मनुस्मृतीचे शिक्षण घेतले. मालती बेडेकर आणि नरसिंह केळकर यांनी मिळून स्त्रीयांच्या विकासावर आणि व्यावहारिक हिंदू धर्मशास्त्रावर पुस्तके लिहिली. त्यांनी त्यांच्या लेखनाने महिलांच्या पीडा व वेदनांना वाचा फोडली.

सामाजिक अभ्यासकांना त्यांचं लेखन मार्गदर्शक ठरतं तर वैचारिक पातळीवर त्यांचा अभ्यास हा विस्मयकारक वाटावा असा आहे. कौटिल्याचं अर्थशास्त्र, वात्सायन, भारतीय संस्कृतीमध्ये असलेले स्त्रियांचे उल्लेख, वेदांपासून स्मृतींपर्यंत केलेले वाचन, अलंकारमंजुषा, हिंदी व्यवहार धर्मशास्त्र यांसारखे प्रबंध असे अफाट लेखन त्यांनी केले. स्त्रियांच्या दुःखांना वाचा फोडण्याचे काम या लेखिकेने स्वतःच्या लेखणीतून केले. सरकारच्या शिक्षण खात्यात पर्यवेक्षिका म्हणून काम करत असताना, तसेच ‘महिला सेवाग्राम’ शी संबंधित असताना अनेक अनाथ, विधवा स्त्रियांच्या समस्या त्यांनी अनुभवल्या, अभ्यासल्या आणि सहृदयतेने त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.

‘खरे मास्तर’ त्यांच्या वडिलांच्या जीवनावर आधारित चरित्र तसेच कादंबरी त्यांनी लिहिली. मालती बेडेकर यांनी भोवतालच्या वास्तवातील विधवा, परित्यक्ता, शिक्षित तसेच प्रौढ कुमारिका अशा स्त्रियांच्या कथा, स्त्रीच्या कामवासना, प्रणयभावना, लग्नाचा बाजार – तेथे होणारी स्त्रीच्या मनाची कोंडी आणि स्त्रीवर होणारे अन्याय असे विषय घेऊन आपले लेखन केले. ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ असं प्रौढ कुमारिकेने जाहीरपणे प्रथमच विचारलं. ‘वाकडं पाऊल’ पडलेली स्त्री वाईटच का? तिला त्या परिस्थितीत लोटणारा पुरुष संभावित कसा? मुलगी परक्याचं धन तिला कशाला शिकवायचं? तिने उंबऱ्याच्या आत राहावं. विधवा स्त्री म्हणजे अशुभ. तिला गुराढोरासारखं वागवावं. स्त्रीला बुद्धी, भावना, विचार असतात हे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं ढळढळीत सत्य मालतीबाईंनी कथा, कादंबरीद्वारे मांडलं.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here