मराठी साहित्यातील आद्य स्त्रीवादी लेखिका कै. मालती बेडेकर यांच्या ११४ व्या जन्मदिनानिमित्त विनम्र अभिवादन. त्यांचे मूळ नाव बाळूताई खरे हे होते तसेच त्या विभावरी शिरुरकर या नावानेसुद्धा लेखन केले आहे. सामाजिक अभ्यासकांना त्यांचं लेखन मार्गदर्शक ठरतं तर वैचारिक पातळीवर त्यांचा अभ्यास हा विस्मयकारक वाटावा असा आहे. कौटिल्याचं अर्थशास्त्र, वात्सायन, भारतीय संस्कृतीमध्ये असलेले स्त्रियांचे उल्लेख, वेदांपासून स्मृतींपर्यंत केलेलं वाचन, अलंकार मंजूषा हा प्रबंध असं अफाट लेखन व अभ्यास. ‘बाबांचा संसार माझा कसा होणार?’ असं प्रौढ कुमारिकेने जाहीरपणे प्रथमच विचारलं. ‘वाकडं पाऊल’ पडलेली स्त्री वाईटच का? तिला त्या परिस्थितीत लोटणारा पुरुष संभावित कसा? मुलगी परक्याचं धन तिला कशाला शिकवायचं? तिने उंबऱ्याच्या आत राहावं. विधवा स्त्री म्हणजे अशुभ. तिला गुराढोरासारखं वागवावं. स्त्रीला बुद्धी, भावना, विचार असतात हे सोयीस्करपणे दुर्लक्ष केलेलं ढळढळीत सत्य मालतीबाईंनी कथा, कादंबरीद्वारे मांडलं.