आधुनिक मराठी साहित्यातील निसर्गकवी नामदेव धोंडो महानोर. त्यांचे कवितालेखन प्रामुख्याने निसर्गावर आधारित आहे. निसर्गाची भाषा बोलणारे, निसर्गाशी संवाद साधणारे, रसिकांचं बोट धरून त्यांना निसर्गाशी मैत्री घडवून देणारे असे हे कवी ना. धों. महानोर. निसर्ग आणि स्त्री ही महानोरांच्या कवितेची केंद्रस्थानं आहेत. त्यांच्या कवितेत विविध गंध आहेत, विविध ध्वनी आहेत, निसर्गाच्या स्पर्शाने फुललेला व रोमांचित करणारा शृंगार आपल्यास दिसून येतो.
‘रानातल्या कविता’ हा त्यांचा पहिला कवितासंग्रह ज्याने मराठी कवितेत त्यांना महत्त्वाचं स्थान निर्माण करून दिलं. लोकसाहित्यात्याबद्दलच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्या भागातील लोकगीतं तसेच लोककथा शोधून, एकत्रित करून संग्रहरूपाने त्यांचा परिचय वाचकांसमोर ठेवला. विलक्षण निसर्गप्रेमी असलेल्या महानोर यांनी मुक्तछंदामध्ये विपुल लेखन केले आहे. मराठी साहित्य परिषदेच्यावतीने पुण्यात झालेल्या पहिल्या पर्यावरणप्रेमी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. ‘जैत रे जैत’ या चित्रपटात त्यांच्या कविताच गाण्यांच्या स्वरूपात लोकप्रिय झाल्या आहेत.
ना. धों. महानोरांचा गद्य लेखनातही हातखंडा होता. ‘गांधारी’ ही कादंबरी, ‘गपसप’ व ‘गावाकडच्या गोष्टी’ हे लोककथासंग्रह, ‘ऐशी कळवळ्याची जाती’ हा व्यक्तिचित्रणात्मक ललितलेखांचा संग्रह अशा विविध साहित्यप्रकारात त्यांनी लेखन केले.