मराठी भाषेतील नवकवींच्या दुसऱ्या पिढीतील प्रमुख कवी कै. माणिक सीताराम गोडघाटे ‘ग्रेस’. १९५८ पासून माणिक गोडघाटे यांनी काव्यलेखनास प्रारंभ केला. इन्ग्रिड बर्गमन या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन गोडघाट्यांनी ‘ग्रेस’ हे साहित्यिक नाव धारण केले. ‘दी इन ऑफ द सिक्स्थ हॅपिनेस’ या बोलपटात इन्ग्रिडसंबंधी शी इज इन ग्रेस असे वाक्य येते. हा बोलपट पाहत असताना तिने आपल्याला शीळ घातलेली आहे, असे गोडघाट्यांना वाटले. त्या लहरीने आपल्या आत्म्यावरची धूळ उडाली आणि प्रतिभा-रूपाचा पहिला साक्षात्कार आपल्याला इन्ग्रिडमध्ये झाला; तिचे ऋण आठवीत राहण्यासाठी आपण ‘ग्रेस’ हे नाव धारण केले, असे ग्रेस यांनी एका मुलाखतीत म्हटले आहे.
कवी ग्रेस यांच्या “वाऱ्याने हलते रान” ह्या ललितलेख संग्रहासाठी त्यांना २०११ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते. प्रसिद्ध संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत काव्यगायन आणि विवेचन अशा द्विदल कार्यक्रमाचे सादरीकरण कवी ग्रेस यांनी २००८ मध्ये सुरू केले. इचलकरंजी येथे ‘मैत्र जीवाचे’ या नावाने अशा द्विदल कार्यक्रमांचा पहिला प्रयोग सादर झाला होता. ‘छंद’, ‘सत्यकथा’ या नियतकालिकांमधून त्यांच्या कविता सुरुवातीला प्रसिद्ध झाल्या. १९६७ साली त्यांचा पहिला काव्यसंग्रह ‘संध्याकाळच्या कविता’ प्रसिद्ध झाला. त्यांचं समकालीन कवितेत असलेलं वेगळेपण या कविता संग्रहामुळे अधोरेखित झालं. मुक्तछंदाचा प्रभाव असणाऱ्या या काळात ग्रेस यांनी निष्ठेने वृत्तबद्ध आणि नादानुसारी लयविभोर काव्यरचना केली त्यामुळे त्यांची कविता सौंदर्यवादी असूनही तिला अभिजाततेची वैशिष्ट्यं प्राप्त झाली. यानंतर प्रसिद्ध झालेल्या राजपुत्र आणि डार्लिंग (१९७४), चंद्रमाधवीचे प्रदेश (१९७७), सांध्यपर्वातील वैष्णवी (१९९५), सांजभयाच्या साजणी (२००६) आदी संग्रहांमधून त्यांची कविता अधिक गूढ आणि व्यामिश्र होत गेलेली जाणवते. ग्रेस हे विलक्षण आत्ममग्न कवी होते. ग्रेस एक बेट आहे आणि या बेटाला समजून घेण्यासाठी त्या बेटावरच यावे लागते असे ग्रेस वारंवार म्हणायचे. ग्रेस यांचे मराठीसोबत इंग्रजी व उर्दू भाषांवर प्रभुत्व होतं. त्यांच्या कवितांमधून याचा प्रत्यय येतोच, पण त्यांच्या व्याख्यानांमधे व पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्यासोबत त्यांनी केलेल्या कार्यक्रमांमधूनही त्यांच्या प्रखर वाणीचा अनुभव रसिकांना येत असे. ग्रेस यांच्या काव्याइतकीच मोहिनी त्यांच्या ललित लेखनानेही वाचकांच्या मनावर घातली आहे. ‘चर्चबेल’ हा त्यांचा पहिला ललित लेख संग्रह १९७४ मध्ये प्रकाशित झाला. त्यानंतर ‘मितवा’, ‘संध्यामग्न पुरुषाची लक्षणे’, ‘मृगजळाचे बांधकाम’, ‘वाऱ्याने हलते रान’, ‘ओल्या वेळूची बासरी’ हे त्यांचे ललित लेख संग्रह प्रसिद्ध झाले आहेत. स्वतःला त्यांनी दुःखाच्या स्वाधीन केले होते. त्याबाबतीत त्यांनी म्हटलेले आहे, “मी महाकवी दुःखाचा म्हणत, दुःखाचा धागा विणताना, दगडाचे माझ्या हाती, वेगाने फूल होते’. ग्रेस यांच्या ‘ती आई होती म्हणुनि…’ या गीताबद्दल, ग्रेस यांच्या आईचे जेव्हा निधन झाले, त्यांना ही कविता सुचली.
“कठीण भाषेत सांगितले तर ते दुर्बोध आणि सोप्या भाषेत सांगितले तर हे काय सांगता, असा लोक प्रश्न करतात पण, माझी जगण्याची एक तऱ्हा आहे आणि मी आपल्याच तऱ्हेने जगणार आणि मरणार आहे. वेळेपूर्वी मला मरायचे नाही आणि मेल्यावरही जगायचे आहे. मी जे काव्य करतो ते माझे ‘स्वगत’ आहे, असे समजा. ‘स्वगता’मध्ये भान नसते, बेभान व्हायचे असते. स्वगतामध्ये श्रोता नसतो तर कवी स्वतः निर्माताच असतो. त्यामुळे कुणाची पर्वा करायची नसते पण, हे स्पष्ट करतो की, मी ज्ञानाचे सोंग करत नाही आणि अज्ञान मिरवत नाही, ज्ञानर्षीचा अवमान करत नाही. मी शब्दकोषांना नवे शब्द देणारा आहे,” असे प्रतिपादन त्यांनी राळेगाव येथील भाषणात केले होते. कविता दुर्बोध असल्याच्या आरोपांना उत्तर देताना “मी माझ्या कवितेचा प्रियकर नाही” असे त्यांनी अनेकदा म्हटले होते. माझ्या कवितेने मराठीला काय दिले आहे व ती काय देत आहे याचा विचार मला स्वतःला करण्याचे अजिबात कारण नाही, असे ग्रेस यांनी ‘दुर्बोधतेची बेसरबिंदी’ या ललितलेखात म्हटलेले आहे. याच लेखात पुढे त्यांनी “आपण दुर्बोधतेच्या आरोपाचे निराकरण करीत नाही,” असेही म्हटलेले आहे.
पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन ‘ग्रेस’ हे साहित्यिक नाव धारण करणारे कवी
Advertisement