संघर्ष

0
1355

– सविता टिळक / कविता /

जगण्याच्या संघर्षात म्हणावे कशाला दु:ख?
आणि सुख असते नक्की काय?

असतात का ह्या नुसत्याच मनाच्या समजुती…
की मानवी भावनांची भरती ओहोटी?

शोधत राहती सुख भौतिक गोष्टींत।
एक आनंद संपता आस नव्याची जागत।

सुखामागून मिळता केवळ सुख, धडपड कोण करेल?
माणसाला जगण्याचा कधी अर्थ तरी का कळेल?

येईल का जगता रोज पंचपक्वान्ने खाऊन।
येईल ना वीट कधीतरी, केवळ गोडाचं जेऊन।

जगणं राहिलं जर एकसुरी, गीत कसं बनेल।
जीवनगाण्यामधल्या सुरांचं सौंदर्य कसं दिसेल।

असे सृष्टीमध्ये जसा हर एक घडामोडीत ताल।
सुख दुःखाच्या लाटांमुळे तसा जगण्यात येई समतोल।

नवशिक्या पोहणारा उन्मादे सुखाच्या लाटांत।
आणि गुदमरे दु:खाच्या भोवऱ्यांत।

कुशल पोहणारा सुखाच्या लाटांवर सहज तरंगत।
आणि दु:खाच्या भोवऱ्यातून स्वत:स करी मुक्त।

जगण्याच्या संघर्षात सुखापेक्षा दु:खच मौल्यवान।
‌‌जे घडवी माणसाचे व्यक्तिमत्त्व आणि करते बलवान।

जीवनसंघर्ष जर असे काळोखाच्या लाटा।
आणि जीवनशांती जणू तेजाचा झरा।
करण्या अंत काळोखाचा, असती कुठल्या वाटा।
पण अंधाराच्या गर्भातूनच उदय प्रकाशाचा खरा।

म्हणून जीवनसंगरातली आव्हाने जावी पार करत।
गाठावे शांतीचे धाम, आनंदाचा माग काढत।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here