मराठी भाषेतील आद्य विनोदी लेखक, नाटककार, कवी कै. श्रीपाद कृष्ण कोल्हटकर. “बहु असोत सुंदर, संपन्न की महा” या महाराष्ट्रगीताचे रचनाकार म्हणून ते सुपरिचित आहेत. सुदामा, बंडूनाना आणि पांडूतात्या या तीन पात्रांचा समावेश असलेली त्यांची ‘सुदाम्याचे पोहे’ ही कादंबरी प्रसिद्ध झाली. विनोदाचा वापर शस्त्राप्रमाणेही करता येतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांच्या विनोदीलेखनात उपरोध, उपहास, कोटी, अतिशयोक्तीबरोबरच स्वभावनिष्ठ आणि प्रसंगनिष्ठ विनोदही आढळतात.
कथा, स्वभावरेखन, संवाद, पदं, या नाटकाच्या घटकात कोल्हटकरांनी नाविण्य आणलं. रहस्यपूर्ण, गुंतागुंतीचं कथानक विणताना त्यात त्यांनी स्त्रीशिक्षण, मद्यपाननिषेध, प्रीतिविवाह असे सुधारणाविषय, तसेच पुनर्विवाह केशवपन, भृणहत्या असे सामाजिक विषय आणले.
नाटकातील प्रणयाला त्यांनी विनोदाची जोड दिली. श्लेष, चमत्कृती, उपहास व विडंबन या विविध विनोदप्रकारांचा समावेश त्यांनी नाटकांच्या संवादात केला. त्यांच्या नाटकांमुळे मराठी नाटकाला दिशा व चालना मिळाली. ‘वीरतनय’ या त्यांच्या पहिल्या नाटकामध्ये त्यांनी उर्दू आणि गुजराती चालीची पदे घातली. त्यांच्या प्रत्येक नाटकातील संगीतामध्ये वैचित्र्य व विविधता असे. सूक्ष्म विवेचकबुद्धी, मर्मग्राही विश्लेषण आणि भारतीय व पाशात्य साहित्यविचारातील नीतीतत्त्वांचा स्वीकार करणारी समावेशक समीक्षादृष्टी यामुळे कोल्हटकरांची समीक्षा विचारप्रवर्तक ठरली.
मराठीतील आद्य विनोदी लेखक श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
Related articles