‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठी साहित्यात रुजविण्याऱ्या कवयित्री शिरीष पै

0
1946

मराठी साहित्यातील ‘हायकू’ हा जपानी अल्पाक्षरी काव्यप्रकार मराठी साहित्यात रुजविण्याऱ्या कवयित्री, लेखिका आणि नाटककार कै. शिरीष पै. प्रसिद्ध साहित्यिक आचार्य अत्रे हे त्यांचे वडील. शिरीष पै यांनी कथा, कविता, नाटक, ललित लेखन अशा सर्व प्रकारच्या साहित्यात उल्लेखनीय योगदान दिले. कारकिर्दीच्या सुरुवातीला त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ‘मराठा’मध्ये पत्रकार म्हणून काम केले होते.

नवोदितांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी नवयुगच्या माध्यमातून कथा आणि कविता लेखन स्पर्धांचे आयोजन केले. त्यातून अनेक लेखक, कवी, पत्रकार उदयाला आले. त्यांनी ललित लेखकांनाही प्रोत्साहन दिले. शिरीष पै या ओशोंच्या तत्त्वज्ञानाने प्रभावित झाल्या होत्या. त्यांनी ‘प्रतिभावंत ध्यानयोगी ओशो’ या पुस्तकाचे लेखन केले आहे. त्यांचे एकूण १४ कथासंग्रह असून कांचनगंगा, खडकचाफा, चैत्रपालवी हे त्यातील काही प्रमुख. शिवाय एकूण २० काव्यसंग्रह त्यांच्या नावावर आहेत. कस्तुरी, एकतारी, एका पावसाळ्यात, चंद्र मावळताना आणि विविध हायकूसंग्रह यांचा त्यांत समावेश आहे.

कविता सादर करण्याची त्यांची हातोटी अनोखी होती. त्या नाट्यपूर्ण पद्धतीने कविता सादर करायच्या. त्या काळात शिरीष पै, शांता शेळके, वृंदा लिमये, पद्मा लोकूर, निर्मला देशपांडे या कवयित्रींशिवाय काव्यसंमेलन रंगायचे नाही. या सगळ्याच कवयित्रींमध्ये इतका छान मैत्रीभाव होता. शिरीष पै यांनी कवी म्हणून स्वतःची मुद्रा तयार केली. त्यांच्या प्रेमकविता ह्या अत्यंत मनस्वी, प्रांजळ आणि अलवारपण जपणाऱ्या आहेत. त्यांत एक दुखरेपण आणि एकटेपणही आहे. अनुभवातली तरलता आणि उत्कट, हळवे क्षण टिपण्याची भावना त्यांत आहे. त्यांच्या ‘हायकूं’ चे हेच वैशिष्ट्य आहे. त्यांच्या हायकूंची प्रारंभीच्या काळात काही ज्येष्ठ कवींनी मस्करी केली होती, पण पुढे हेच हायकू अनेक कवींना प्रभावित करून गेले आणि स्वतःची एक स्वतंत्र जागा करून मराठी साहित्यात मानाने उभे राहिले.

झेन तत्त्वज्ञानातून उगम पावलेला हा जपानी काव्यप्रकार शिरीषताईंना खोलवर स्पर्शून जाण्यामागे त्यांची अध्यात्माकडे असलेली ओढ हेच कारण असणार. जीवनाचा अर्थ मुद्दाम शोधायला जाऊन तो आपल्याला कधीच सापडत नाही. तो जसा आणि जेव्हा उलगडतो तसा आणि तेव्हाच तो लेखकाच्या जागरुकतेने पकडावा लागतो.’ ही जागरुकता त्यांनी जीवनाच्या सर्व अंगांत जपली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here