मराठी भाषेत ‘गझल’ काव्यप्रकार रुजविणारे प्रसिद्ध कवी, गझलकार कै. सुरेश भट. त्यांचा जन्म महाराष्ट्रातील अमरावती येथे झाला. त्यांचे वडील श्रीधर भट हे व्यवसायाने डॉक्टर होते. त्यांच्या आईला कवितांची खूप आवड होती. त्यांच्यामुळे सुरेश भट यांना लहानपणीच मराठी कवितांची आवड निर्माण झाली. सुरेश भट यांनी ते अडीच वर्षाचे असताना पोलियोची बाधा झाली होती. त्यामुळे त्यांचा उजवा पाय जन्मभरासाठी अधू झाला होता.
सुरेश भटांचे सर्व शिक्षण अमरावती येथे झाले. वयाच्या १८ व्या वर्षापासून त्यांच्या काव्यलेखनाला सुरुवात झाली. बी.ए. ला अंतिम वर्षाला दोन वेळा नापास झाल्यावर शेवटी १९५५ साली ते बी.ए. पास झाले. त्यानंतर ते शिक्षकी व्यवसायात आले.
अमरावती जिल्ह्यात ग्रामीण भागात नोकरी करताना त्यांनी त्यांचे कविता लेखन सुरू ठेवले होते आणि १९६१ मध्ये ‘रुपगंधा’ हा त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला. सुरेश भट यांनी उर्दू भाषेतील शेर, शायरी, गझल यांचा आयुष्यभर मनापासून अभ्यास केला. गझल हा काव्य-प्रकार मराठीत रुजवला. हा त्यांचा प्रयास त्यांना ‘गझल सम्राट’ हा मनाचा किताब देवून गेला. त्यांच्या दर्जेदार कवितांमुळे एक कवी म्हणून महाराष्ट्रात ते नावाजले जाऊ लागले. त्यानंतर ‘एल्गार’, ‘रंग माझा वेगळा’, ‘झंझावात’ इ. संग्रह प्रकाशित झाल्यावर तर भटांचा वेगळा रंग सगळ्यांनाच भावला. मृदू आणि हळूवार असणारी त्यांची कविता अनेकवेळा बाणाच्या टोकासारखी तीक्ष्ण आणि बोचरी अशी औपरोधिक बनत असे, त्यावेळी कवी म्हणून असलेल्या त्यांच्या कोमल मनाचे एक टोक तर समाजातील लाचारी, स्वार्थ, ढोंगीपणा यावर प्रहार करणारे मनाचे दुसरे टोक आपल्याला दिसते. खालील त्यांच्या गीतातून हीच प्रचिती जागोजाग येते. ‘चल उठ रे मुकुंदा’, ‘आज गोकुळात रंग खेळतो हरी’ यातून दिसणारा निर्मळ भक्तिभाव, तर ‘मलमली तारुण्य माझे’ किवा ‘मालवून टाक दीप’ या गाण्यातून उमलणारा शृंगार किवा विरहाची भावना याच्या अगदी उलट ‘पूर्तता माझ्या व्यथेची’ वा ‘उषःकाल होता होता कालरात्र झाली’ या त्यांच्या शब्दातून उद्धृत होणारी समाजातील मूल्यहीनता आपल्या नजरेसमोर येते आणि सुरेश भटांच्या अनेक पदरी, अनेक रंगी असलेल्या प्रतिभेतून त्याचं व्यक्तिमत्त्व आपल्यासमोर स्पष्ट होत जातं.
सुरेश भटांनी लिहिलेल्या कवितांचे एक चोपडे हृदयनाथ मंगेशकरांना एका फूटपाथावर सापडले. त्यातील कविता वाचून त्यांनी सुरेश भटांना शोधून काढले आणि त्यांच्या कवितांना चाली लावून त्या अमर केल्या. त्यांच्या गझला व कविता हृदयनाथ मंगेशकर, लता मंगेशकर, आशा भोसले, सुरेश वाडकर आदींनी गायल्या आहेत.
सुरेश भट हे फक्त गझलकारच नाही; तर एक तडफदार पत्रकार देखील होते त्यांनी त्यांचे एक साप्ताहिक देखील सुरू केले होते. ज्यातून त्यांना परखड लिखाण केले. समाजातील प्रत्येक घटनेवर त्यांचं चौकस लक्ष असायचं. त्यावर ते बेधडकपणे लिहायचे. त्यांचं व्यक्तिमत्त्वं कलंदर होतं असं अनेकदा बोललं जायचं आणि त्यात तथ्यही आहे. इतकी प्रसिद्धी मिळाल्यावर देखील त्यांनी कधीही पैशांना महत्व दिले नाही. त्यांनी फक्त गझलचा प्रसार केला. ते लिहित गेले. त्यांनी भरभरून लोकांना दिले. त्यांच्याकडून गझल शिकलेले आज कित्येजण पोट भरताहेत. त्यांच्या शिष्यांमध्ये बहुजन समाजातील अनेक तरूण होते. त्यांनी कधीही भेदभाव केला नाही. जो येईल त्याला ते शिकवायचे. त्यांच्या झोळीत ते काहीच शिल्लक ठेवत नव्हते. सर्व लुटवून टाकायचे. कविवर्य सुरेश भटांनी गझलकारांना गझलेच्या तंत्रावर, व्याकरणावर माहिती म्हणून ‘गझलेची बाराखडी’ नावाची एक पुस्तिका लिहिली होती. वाचक-रसिक, सगळ्यांनीच ही पुस्तिका वाचावी, संदर्भासाठी जवळ बाळगावी अशी आहे. नवोदित कवींना गझल कळावी म्हणून ते ही पुस्तिका त्यांना स्वखर्चाने पत्रासोबत पाठवीत असत. सुरेश भटांनी गझलसाठी आपलं जीवन वाहून टाकलं होतं. आज मराठी गझल लिहिणारे, गाणारे कित्येक गझलकार तयार झाले आहेत. पण सुरेश भटांनी जे पेरलं होतं ते पुन्हा उगवेल याची जरा शंकाच आहे. गडचिरोली येथे भरलेल्या ३९ व्या विदर्भ साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. आयुष्याच्या अखेरच्या पर्वात त्यांनी बौद्ध धम्माचा स्वीकार केला होता.
सुंदर परिचय