लगाम…

– कल्पेश वेदक / मुक्तछंद /

कुठल्याही गोष्टीचा विरोध करायचाच
म्हणूनच ठरवलं असेल तर
शेणाने सारवलेल्या अंगणाचा थंडावा नाही
तर घाण वासच येणार…

हक्क दाखवण्याच्या संघर्षात
उजव्या तर कधी डाव्या बाजूत
अविचारी निदर्शनाच्या बाजारात
बिचारा सामान्यगण भरडला जाणार…

स्वातंत्र्याच्या युद्धात
कुणी जहाल तर कुणी मवाळ लढले
पण आजही एकाच पद्धतीचा
बोभाटा सर्वत्र तो पसरणार…

चिखलफेक करत दुसऱ्याच्या पदाचा
जाहीरनामा लिलावात काढून
निवडून दिलेले इकडचे वारे तिकडे
हस्तांदोलन करुन निघून जाणार…

एकमेकांचे पाय खेचत
वर चढण्याच्या स्पर्धेत
गडगडत खाली दुसरं कुणी नाही
तर स्वतःच खणलेल्या खड्ड्यात पडणार…

द्रौपदीच्या वस्त्राप्रमाणे झालेली ही धर्मनिरपेक्षता
युधिष्ठिर न विचारता आणि दुर्योधन बळजबरीने चव्हाट्यावर आणतील
पण सीमारेषेवर तैनात असलेला शील वाचवणारा श्रीकृष्ण
अखंड भारताचे वस्त्रहरण होण्यास लगाम घालणार…

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here