Home Literature Marathi केळवण

केळवण

Photo credit - Annapurna

– मानसी बोडस / लेख /

आज माझ्या एका बहिणीचे केळवण. त्यानिमित्ताने सहजच विचार आला ह्या ‘केळवण’ नावाच्या प्रथेचा. केळवण हा तसा एक अस्सल मराठी शब्द.

लग्न ठरलेल्या होतकरू तरुणास अथवा तरुणीस तिच्या कुटुंबियांसमवेत किंवा मौंज मुलाला आई वडिलांबरोबर जेवायला बोलावणे म्हणजे केळवण. त्या होतकरुस त्याच्या आवडीचे पदार्थ, कधी पंचपक्वांन्न, तर कधी पुरणावरणाचे जेवण निव्वळ इतकाच हेतू नव्हता ह्या प्रथेमागे.

काळानुसार बदलत जाणाऱ्या इतर काही प्रथांप्रमाणे केळवणं सुद्धा बदलली आता कधी बाहेरून मागवून तर कधी सरळ हॉटेलात जाऊन केळवण करायचे किंवा नाही हो त्याला किंवा तिला वेळच नाही नावाखाली सरळ टाळायचे ही प्रथा सुरु झाली. (इतर प्रथांप्रमाणे ही सुद्धा कालौघात नष्ट होईल असे दिसते)

आजकाल एखाददुसरी सोडली तर फार केळवणं करत नाहीत कोणी. गम्मत होती पूर्वी, आपल्या प्रत्येक नातेवाईकाकडे ह्या निम्मिताने जाणे होई आणि महत्वाचे म्हणजे जिच्या घरी कार्य आहे त्या बाईस थोडा आराम म्हणून हे केळवण असावे.

आपल्या नातेवाईकांस, सग्यासोयऱ्यांस प्रेमाने अगत्याने आपल्या घरी जेवायला बोलवून बघा हो. आपले केळवण ज्या काकू, मावश्या, आत्या ह्यांनी केले ते आठवा आणि तशाच आठवणी आपल्या भाच्या पुतण्या पुतणींना देऊन बघा.

एक गम्मत आहे, थोडा विचार करा आपण मित्र मैत्रिणींसोबत बॅचलर अथवा स्पिंस्टर पार्ट्या करतो, त्यानी वजन नाही वाढत पण केळवणांचे गोडधोड खाऊन आपले वजन वाढते. आपण आपल्याच परिघातून नातेवाईक, सगे-सोयरे ही गोष्ट दूर ढकलतो आहोत असे वाटते.

बदललेल्या काळाप्रमाणे केळवण कमी प्रमाणात सुटसुटीत अशी करता येतील. अगदी जेवणच नको साधासा चहा नाश्त्याचा पदार्थ करून त्याला / तिला बोलावता येईल आणि आपल्याला एवढे प्रेमाने बोलवणाऱ्या घरी जाऊन आपलेही वजन वाढणार नाही उलटपक्षी आपल्या नातेवाईकांमुळे आपल्या मानसिक ताकदीत वाढच होईल आणि आपसूकच एकटेपणा, निराशा ह्यांना खूप दूर ठेवता येईल.

आपल्या ह्या प्रथेला पुनर्जीवन द्याच म्हणते मी.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here