– स्नेहा मनिष रानडे / स्फुट लेखन
अग ऐक ना गं! हल्ली तुझं माझ्याकडे लक्षच नसतं.. सारखी आपली स्वयंपाक घरात काहीतरी रांधत असतेच नाहीतर केरवारे करत बसतेस. माहित आहे मला, कोरोनाचं टेन्शन आहे. कोणी मदतीला नाहीये सगळ्यांचं जेवण करायचं आहे. सगळ्यांना सांभाळायचं आहे, पण मग माझ्याकडे पण बघ ना.. किती दिवस झाले.. पहिल्यांदी कशी यायचीस माझ्याकडे. लाजून बघायची माझ्याकडे माझी एक नजर पडावी. तू छान दिसतेस, लाजतेस, पण छान हे ऐकण्यासाठी आतुर व्हायचीस, तसं काही होत नाही. नीट साडी नेसली की नाही? गजरा नीट माळला गेलाय का? हे विचारायचीस, प्रेम आटलं की काय माझ्यावरचं.. अगं नको गं असं करु, बघ ना एकदा माझ्याकडे.. मी इथेच आहे तुझ्यापुढे. माझा पण दिवस चांगला जात नाही गं तू दिसल्याशिवाय. आज ती लाल छान साडी नेस मस्त, गजरा माळ, कानात मोठे झुमके, नाकात नथ, गळ्यात तन्मणी घाल आणि ये माझ्याजवळ लाजत लाजत कशी दिसतेय म्हणून विचारायला. मग मी पण डोळे भरून पाहीन. सुंदर दिसते आहेस हे सांगेन, तुझं खूप कौतुक करीन.. करशील ना माझ्या साठी एवढं.. येशील ना संध्याकाळी.. वाट बघतोय..
तुझाच लाडका
आरसा