भारतीय शास्त्रीय संगीत – गानहिरा हिराबाई बडोदेकर

0
844

भारतीय शास्त्रीय संगीत – ख्याल, ठुमरी, मराठी नाट्यसंगीत, भजन या विविध गायनप्रकारात आपली छाप उमटविणाऱ्या गानहिरा ज्येष्ठ गायिका कै. हिराबाई बडोदेकर. हिराबाईंचा जन्म २९ मे १९०५ रोजी मिरज येथे झाला. त्यांच्या घरात तीन पिढ्या संगीताची परंपरा होती. पुण्याच्या हुजूरपागा शाळेत शिक्षण झाले. त्यांना संगीताची लहानपणापासून ओढ होती. त्यांचे मोठे भाऊ प्रसिद्ध गायक सुरेश बाबू माने यांच्याकडेच हिराबाईनी प्रथम संगीत शिकण्यास सुरुवात केली. त्यांचे गुरु अब्दुल करीम खां यांच्या बरोबर गाण्याची संधीही त्यांना मिळाली.

इ.स.१९२१ पासून हिराबाईनी स्वतंत्र गाण्यास सुरवात केली ज्या काळात महिला घराबाहेर सुद्धा फारशा पडत नसत. गायन आणि संगीत यांचं वास्तव्य फक्त माडीवरच असतं, अशा संगीताच्या कोंडलेल्या काळात हिराबाईंनी संगीत, माडीवरून माजघरात आणलं. त्यावेळी समाजाचा तीव्र रोष पत्करून सुद्धा आपल्या शांतवृत्तीने त्यांनी संगीताला आणि विशेष म्हणजे स्त्रियांच्या गायनाला समाजात प्रतिष्ठा मिळवून दिली. त्याकाळी हिराबाईंच्या रूपाने स्त्रियांसाठी एक नवी वाट मोकळी झाली म्हणजेच आपल्या गायकीने त्यांनी त्यावेळी क्रांती घडवून आणली. बालगंधर्वांनी सुद्धा हिराबाईंच्या गाण्याला, त्यांच्या सात्विक सूराला गौरविले होते. त्यांना लोकांमध्ये हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत लोकप्रिय करण्याचे श्रेय जाते.

हिराबाई बडोदेकर यांनी किराणा घराण्याला अधिक लोकप्रिय करण्याचे काम केले. इ.स. १९२८ मध्ये हिराबाईंनी संगीताचे शिक्षण देणारी ‘नूतन संगीत विद्यालय’ ही संस्था सुरू केली. नूतन संगीत विद्यालयाच्या जोडीने त्यांनी नूतन संगीत नाटक मंडळी ही संस्थाही स्थापन केली. सौभद्र, पुण्यप्रभाव, विद्याहरण, एकच प्याला, युगांतर इ. नाटकांचे त्यांनी प्रयोग केले. उत्तम नाट्यगीतांबरोबर अतिशय परिश्रमपूर्वक त्या अभिनयही करीत.

मधुर आवाज, उत्तम तयारी आणि प्रामाणिक प्रयत्नांची पराकाष्ठा यांचा संयोग करून त्या आपले गाणे रंगवीत असत. त्यांचा तार सप्तकातील ‘सा’चा नाद हुबेहूब तानपुरा छेडल्याइतका स्पष्ट व कणखर येत असे. त्यामुळे त्यांचे श्रोते त्या दिव्य षड्जाची आतुरतेने वाट पहात असत असे म्हणतात. त्यांच्या गाण्याइतकेच त्यांचे बोलणे मृदु होते व वागणे शालीनतेचे होते. त्यामुळे त्यांच्या सहवासात आलेल्या सर्व लोकांवर त्यांनी आपली छाप पाडली होती. अशा महान संगीत कलाकाराला कोटी कोटी प्रणाम.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here