फुलांचे संमेलन

0
2923

– सुनीता गोरे / कविता /

गुलाब फुलाचा रंग गुलाबी ।
जणू हा प्रेम संदेश पसरवी ।।
भाग्य तयाचे बलवान ।
फुलांचा राजा शोभतो छान ।।१।।

सोनचाफा कनक कांती ।
पाकळ्या फुलती लंबाकृती ।।
मोहक सुवास अवती भवती ।
आपुलकीचा संदेश देती ।।२।।

लपून बसला हिरवा चाफा ।
फणा उगारुनी सांगे जनाला ।।
धुंद सुगंध धन-लक्षमीचा ।
सन्मान करावा मांगल्याचा ।।३।।

प्रफुल्ल असते सदाफुली ।
सदा सर्वदा राहा समाधानी ।।
शुभ्र रंगाचा मोगरा फुलला ।
पाकळ्यांनी विद्या विभूषित झाला ।।४।।

शुभशकुनी अशी अबोली ।
रंग केशरी साजिरी गोजिरी ।।
देवचाफा अंगणी पसरला ।
सर्वांच्या मनी आनंद भरला ।।५।।

इवली इवली फुले बकुळीची ।
मंद-मधुर सुवासाची ।।
नाजूक काली जशी उमलली ।
शांतीदूत बनुनी सदनी आली ।।६।।

अशी ही जाई-जुई चमेली ।
सौख्य-सुमने घेऊन आली ।।
रात्रीच्यावेळी रातराणी ।
मार्ग दाखवीत दरवळत आली ।।७।।

पिवळी पिवळी शेवंती ।
करी सकलजनांची उन्नती ।।
विविधरंगी कृष्णकमळ ।
सुवासाने मन होई निर्मळ ।।८।।

चिखलात उमलले कमळ ।
पंख पसरले शुभ धवल ।।
पद्मनाभास प्रिय असे ।
समृद्धी जणू त्यांत वसे ।।९।।

लाल रंगाची जास्वंदी
गणरायाची आवडती
असे ती बुद्धीदाती
संकट समयी विघ्नहर्त्ती ।।१०।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here