– स्नेहा मनिष रानडे / स्फुट लेखन /
अचानक हवेतला गरमा वाढला होता, कधी एकदा पाऊस पडेल असे झाले होते. प्रत्येक जण पाऊस कधी येईल याचीच चौकशी करत होता, पण पाऊस काही यायचे नाव घेत नव्हता. चातक पक्षाप्रमाणे सर्वजण पावसाची वाट बघत होते. आणि…
एक दिवस तो संध्याकाळी आगमनाची तयारी करू लागला. आकाशात काळे ढग दाटून आले. जोरदार वारा वाहू लागला. प्रत्येकजण त्याच्या स्वागताची तयारी करत होता. मनात आनंद होता आणि अचानक पाऊस अवतरला. मातीचा गंध आसंमतात दरवळला. त्याच्या आगमनाने सगळीकडे धावपळ चालू झाली.. छोटी मुले पहिल्या पावसात भिजत होती. लहान लहान होड्या बनवत होती.. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद होता. आणि ती…
ती ही होती त्या पावसात… मनाने पूर्ण भिजलेली. हलकेच आपली केसाची बट मागे घेत, हाताने पर्स सांभाळत, लोळणारी ओढणी सावरणारी, ती फारच सुंदर दिसत होती आणि मी तिला एका रस्त्याच्या कडेला उभा राहून पाहत होतो.. वरून पाऊस पडत होता पण मी मात्र पूर्णपणे तिच्या विचाराने चिंब झालो होतो. वाटत होते तिला विचारावे, “छान पाऊस पडतोय, येतेस का चहा प्यायला.” वाऱ्यापेक्षा जोरात मनाने तिच्यापर्यत पोहोचलो होतो. तिने माझ्याकडे बघावे, एक कटाक्ष टाकावा याची वाट बघत होतो. जोराचा कडकडाट होत होता, विजा चमकत होत्या… त्या विजांच्या चमकण्याने तिने घाबरावे, मला मिठी मारावी असे वाटत होते पण ते काहीच होत नव्हते.
हळुहळू ती पत्र्याच्या शेडजवळ गेली मग मीही संधी सोडली नाही. मी पण शेडजवळ जाऊन उभा राहिलो.. विजांचा कडकडाट होत होता. मन तिच्या एका कटाक्षाने चिंब भिजले होते. आणि तो क्षण आला.. विजेचा जोरात कडकडाट झाला. मी वेगळ्या स्पर्शाचा अनुभव घेतला…
कळेना की मी जे अनुभवतोय ते स्वप्नात नाही ना… आणि
परत विजांचा कडकडाट झाला आणि मी जागा झालो. बाहेर पाऊस पडत होता. वातावरणात गारवा आला होता. आणि ती समोर गरमागरम चहाचा कप हातात घेऊन उभी होती आणि लाजून हसत म्हणाली, “१२ वर्षे मागे गेलात वाटतं पण जागे व्हा आणि चहाचा आस्वाद घ्या…”