भाड्याचा कावळा

1
491

– तेजस सतिश वेदक

घरातील सर्व कामं आवरून दामू अण्णा लेंग्याच्या नाडीला गाठ बांधत त्यांची लंगोट व चड्डी वाळत घालण्यासाठी बाहेर आले, “काय रे हरी झाले का सर्व आटपून?” त्यांनी शेजारील हरीला विचारले. आटपून ही झाले आणि आपटूनही झाले आता, हरीने उपहासाने उत्तर दिले होते. “काय रे काय झाले?” अण्णांनी विचारलं. “काही नाही आज आमच्या स्वारीचा स्वर जरा भलताच चढला आहे. त्यामुळे सर्व काही संगीतमय चालू आहे.” तेवढ्यात आतून भांड्यांचा आवाज आला आणि एकच हशा उडाला. “चालू दे चालू दे सूर जुळतात ना हे महत्वाचे”, अण्णा म्हणाले. आमच्या अण्णांची मिश्किल वृत्ती काही सांगू शकत नाही, दामू अण्णांची चाळीत नेहमी प्रमाणे धावपळ सुरू झाली होती.. पण आजचे कारण वेगळे होते. आणि ते म्हणजे त्यांचा लहानपणीपासूनचा मित्र अगदी जीवाला जीव देणारा, वर्गात मागच्या बाकावर बसून मास्तरांची खोड काढून गप्प बसून मजा बघणाऱ्या मित्राला आज इस्पितळातून घरी सोडणार होते..

तेवढ्यात चाळीखाली मोटारीचा आवाज आला एकच गर्दी जमा झाली. अण्णांचे घर दुसऱ्या मजल्यावर शेवटी असल्याने खालचे काही कळत नव्हते.

आप्पा आले.. आप्पा आले.. हे शब्द कानावर पडले आणि अण्णांनी वयाचे भान न बघता अगदी लहान मुलांसारखे पण पायाने लंगडत पळ काढला आणि आप्पाचे अभिनंदन केले. “आप्प्या, तुला बघून खूप आनंद झाला रे. डोळे पाणावले”, अण्णा बोलले.

“आता जेवणाआधी घे थोडी म्हणजे कशी तरतरी येईल, ही डॉक्टरांची औषधं साली नुसती मुळमुळीत, आपली इंग्लिश बरी! काय आप्प्या? दोन पेग गेले पोटात की सर्व जंतू मरतात”, अण्णांनी खांद्यावर हात ठेवून म्हटले.

आप्पा हे एकटा जीव सदाशिव ह्यातील गृहस्थ होते, शाळेतील एवढा मस्तीखोर मुलगा आणि लग्न झाले नाही हे पचणारे नव्हते. पण आता पचवूनही काही उपयोग नव्हता कारण वय निघून गेले होते, माझे नाही त्यांचे, लग्न नाही म्हणून मूल नाही ह्यामुळे ते एकटे आणि चिडचिडे झाले होते, दामू अण्णा आणि त्यांचा इतर मित्र वर्ग वगळता चाळीतील बहुतेक मंडळी त्यांची निंदा करत होते.

आप्पांचा स्वभावच थोडा तिरकस वृत्तीचा होता, ह्यामुळेच त्यांचे नातेवाईक त्यांना भेटावयास येत नसत. त्यामुळे चाळीतील लोक हेच नातेवाईक आणि दामू आपला भाऊ हे त्यांनी मानले होते. सध्या अंग मेहनतीचे काम होत नसल्याने अप्पांनी खानावळीतून डब्बा मागवायला सुरवात केली. तेही त्या खानावळीला नावे ठेऊन आणि जेवण करणाऱ्यांना शिव्या घालून जेवणाचा पहिला घास जात नसे. असे बरेच दिवस गेले. आप्पा जेवणाचा डब्बा अजून कसा आला नाही म्हणून ते वाट बघत होते. तिथून एक पोरगा धापा टाकत डब्बा घेऊन आला.. आप्पांनी त्यालाही सोडले नाही, “मेल्या माझी तिरडी उचलल्यावर डब्बा आणणार होतास का? ही काय वेळ झाली, तो कावळा पण कधी मान टाकेल कळणार नाही, चल जा, आणि उद्या वेळेवर आण”, असे बोलून आप्पांनी कावळ्याचा घास काढून ठेवला.. आणि ते जेवायला बसले..

दुपारचे जेवण आटपून अण्णा, आप्पांच्या घरी फेरफटका मारायला गेले तिथे तात्या म्हणजे माधवाचे वडील आधीच आपली हजेरी लावून चाळीतले किस्से सांगत होते अगदी जे झाले नव्हते तेही ते रंगून सांगत होते आणि आप्पा बोटं चाटत त्या गोष्टी ऐकत आपलं मनोरंजन करत होते. “अरे अण्णा, ये ये तुझीच कमी होती. आलाच आहेस तर हे उरलेलं जेवण त्या कावळ्याच्या पानात वाढ…” आप्पांनी फर्माईश केली.. काय रे आप्प्या तू पण ना खरंच त्या कावळ्यांना जेवण तर घालतो पण त्रास ते कावळे संबंध चाळीला देतात.. तू नव्हता तेव्हा तर विचारू नको आज इथे तर उद्या तिथे ते कावळे गिरट्या घालत होते… अण्णांनी संतापून कावळ्याच्या पानात जेवण वाढले. “काय रे आप्प्या मला एक सांग तुझं ना लग्न झालं ना तुला पोर बाळ मग तू हे जेवण कावळ्यांना कोणाच्या नावाने घालतोस. कोणी बाहेरच प्रकरण नाही ना जे अजून आम्हाला माहित नाही”, अण्णांनी मिश्किल पणे आप्पांना विचारले आणि एकच हशा उडाला… हा हा हा…

“नाही रे कुत्रं पाळायची खूप हौस होती पण सांभाळ कोण करेल नंतर म्हणून ते राहून गेलं एके दिवशी असाच हे गणपत राव कठड्यावर येऊन बसले त्यांना म्हटले, असे रोज येत जा म्हणजे तुमचे ही पोट भरेल आणि माझे जेवण ही सार्थकी लागेल, आप्पांनी आपली व्यथा सांगितली, पण आप्पा हे गणपत राव कोण आणि त्यांचा तुज्याशी काय संबंध..?” तात्यांनी उत्तराला अनुसरून प्रश्न विचारला.. “अरे ए, भुसनळ्या तुला काय संधी फोड करून सांगू का?”

ह्या कावळ्यास मी गणपत राव म्हणतो समजला.. आप्पा वैतागून म्हणाले हा तात्या काय अजून बदलला नाही, काय आण्या… हा हा हा.! च्यामारी म्हणजे तू तर तुझी Future investment केली तर.. अण्णांनी आपली मिश्किल तोफ डागली. “पण आप्प्या मला ह्या गोष्टी पटत नाही, आपण म्हणून हे सर्व केलं काऊ घास श्राद्ध तेरावं हे नि ते आपलं कोण करेल देव जाणे तात्या म्हणाले, अरे तात्या तुझं तरी ठीक माझं कोण आहे बोल..” आप्पा म्हणाले. विषय गंभीर होत आहे बघून आण्णा म्हणाले आता तर कावळे पण येत नाहीत पिंडाला शिवायला… कदाचित तेही कंठड्याखालून पैसा दाबून घेत असावेत आपल्या सरकारी कुरमुड्या सारखे… ककाय आप्प्या… म्हणून तर मी आतापासून घास घालतो… आप्पा उत्तरले. आणि तेच सर्व आपापल्या घरी सर्व पसार झाले, तेवढ्यात आण्णा मिश्किलपणे बोलले तुझ्यावेळी तर एक क्वार्टर ठेवावी लागेल मला. आणि आप्पांनी दात काढून दरवाजा लोटला.

सर्वांनी मनसोक्त दुपारी दात काढून एकमेकांची कुरघोडी केली हाती, पण त्यावेळी कोणालाच ठाऊक नव्हते, आप्पांनी लोटलेलं ते दार हे आपल्यासाठी शेवटचे होते.

हे तात्या आणि अण्णांना पचणारे नव्हते, दुपारी बोट चाटत शिव्या घालणारा आप्पा असा कसा जाऊ शकतो हे उलगडत नव्हते, कदाचित त्याची वेळ आली होती हे त्याला ठाऊक होते.. म्हणूनच माझ्याकरवी त्याने उरलेले अन्न हे काऊ घास म्हणून द्यायला सांगितले हे अण्णांचे बोलणे तात्यांना पटत होते. आता आपण पुढील कार्य करू असे अण्णांनी निर्णय घेतला व चाळीसमोर मांडला. आणि सर्वांचा एक रकमी होकार आला.

आप्पा काही मोठा असामी नव्हता, इतरांना शिव्या देऊन आणि शिव्या घेऊन नाव कमावले होते, आप्पांच्या शिव्या खाऊनही बऱ्याच मंडळींनी हजेरी लावली होती, खुद्द खानावळीच्या बाईसुद्धा जेवण घेऊन आल्या होत्या. ह्यावरून हे कळले की माणसाचे कर्म नाही तर कुकर्म ही मोठी प्रसिद्धी देऊन जाते. सर्व तयारी झाली काऊ घासासाठी पानही ठेवलं पण कावळा काही येईना.. “काय रे तात्या, आप्पा काही बोलला होता का तुला शेवटची इच्छा वगैरे काही…?” अण्णांनी विचारले.. “छे रे! कुठे काय… मला तर शंकाच येत आहे, की ह्या नाठाळ आप्पाचे लग्न झाले असणार त्याशिवाय का त्यादिवशी समशानात त्या बाईने मंगळसूत्र चितेवर टाकले..” तात्या उत्तरला.. “मेल्या गप जरा! हे सर्व बोलायची ही वेळ नाही”, आण्णा संतापले..

तास दोन तास झाले तरी कावळा काही आला नव्हता, रोज काऊ घास खाणारा कावळा आज एकाएकी नाहीसा कसा झाला काही समजत नव्हते. सर्वांची कुजबुज सुरू झाली, तरी त्या आप्प्याला मी म्हटले होते हे कावळे काही येत नाहीत. पाहिजे तेव्हा तरी तो घास घालत होता.. आता मलाच काहीतरी करावे लागेल, अण्णा उत्तरले, “म्हणजे तू आता कावळा बनतोय की काय?” तात्या म्हणाले, एकच हशा उडाला, सर्व खो खो हसू लागले, अरे गप बसा मेल्यांनो. वातावरण काय बोलताय काय हे बोलून अण्णा तडकाफडकी निघून गेले आणि चांगले अर्ध्या-पाऊण तासाने आले तेही हातात एक पिंजरा घेऊन आणि चक्क त्या पिंजऱ्यात कावळा होता. सर्वजण ते दृश्य पाहून अचंबित झाले, काय हो कुठे मिळाला कावळा, तो ही पिंजऱ्यात सर्वांनी एकच प्रश्न केला, बाजूच्या वाडीत त्यादिवशी एक फलक बघितले होते, ‘कार्यासाठी कावळा भाड्याने मिळेल’, तिथूनच आणला आहे, अण्णा उत्तरले. “च्या मारी! लोक कशात धंदा काढतील देवजाणे. काय कुरमुड्या तुझ्यासाठी पण आणायचा का कावळा?” तात्यांनी चेष्टेने विचारले. अण्णांनी पिंजरा उघडला व पान समोर ठेवले, कावळ्याने जेवणास शिवले व पिंजऱ्यात जाऊन बसला व सर्व आपापल्या घरी गेले अण्णा आणि तात्या तो पिंजरा घेऊन चालत होते, तेवढ्यात पिंजऱ्यातील कावळा मंजुळ आवाजात ओरडला.. आणि आंब्याच्या मोहराला सुरवात झाली.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here