- – कल्पेश वेदक / कविता /
भरदिवसा मी एकदा
‘सत्य’ रस्त्यावर उघडं पाहिलं…
आदर म्हणून मी
त्यावर एक फुल वाहिलं…
ते म्हणालं, बाबा रे
मी अजून जिवंत आहे…
माझ्याकडे कुणी बघत नाही
हीच एक माझी खंत आहे…
बिचारं ते असंच
निपचित पडलं होतं…
कुणाची नजर आपल्याकडे जाईल
या आशेने ते इतरांकडे बघत होतं…
कुठूनतरी ‘सोय’ आपला मार्ग
काढत येऊन उभी राहिली…
न मेलेल्या सत्याला
तिनं श्रद्धांजली वाहिली…
मग सर्वजण दुर्लक्ष करीत ‘सोयीने’
आपल्या ‘सत्याची’ बाजू मांडत होते…
एकमेकांच्या उरावर बसून
नको नको ते घाव घालत होते…
सर्वांच्या नजरेतून ‘लाज’
निघून जाताना दिसली…
आपापला पक्ष सिद्ध करण्यात
प्रत्येकाची ‘नियत’ दिसली…
डोळ्यावरची पट्टी काढण्याची
तळमळ न्यायदेवतेने केली…
सोयीने उभारलेल्या सत्यावर आपलं पारडं
जड करण्याची चढाओढ सुरु झाली…
पटवून देण्याच्या धुमश्चक्रीत
‘सत्य’ हे बाजूलाच राहिलं…
भरदिवसा मी एकदा ‘सत्य’
रस्त्यावर उघडं पाहिलं…