मराठी साहित्यातील पहिले संगीत नाटककार, गायकनट आणि नाट्यशिक्षक कै. अण्णासाहेब किर्लोस्कर. संपूर्ण नाव बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. अण्णासाहेब किर्लोस्करांनी ३१ ऑक्टोबर १८८० या दिवशी धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर ‘शाकुंतल’ या पहिल्या परिपूर्ण संगीत नाटकाचा पहिला प्रयोग केला. ‘शांकरदिग्विजय’ हे त्याचं पहिलं गद्य नाटक. पण अण्णासाहेबांना संगीत नाटकाची स्फूर्ती मिळाली ती मात्र पारशी ऑपेराचे ‘इंद्रसभा’ हे नाटक बघून. हे गद्यपद्यात्मक नाटक बघितल्यावर मराठी रंगभूमीवरही असे नाटक झाले पाहिजे या कल्पनेने त्यांना झपाटून टाकले. त्यांनी लगेचच महाकवी कालिदासांच्या ‘अभिज्ञान शाकुंतलम’ या नाटकाचे त्यांनी मराठी भाषांतर करायला घेतले. पहिल्या चार अंकांचा अनुवाद झाल्यावर १८८० साली ३१ ऑक्टोबरला धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर या नाटकाचा पहिला प्रयोग पुण्याच्या आनंदोद्भव नाट्यगृहात संपन्न झाला. या पहिल्या प्रयोगात मोरो बापुजी वाघुलीकर (मोरोबा देव) यांनी दुष्यंताची आणि बाळकृष्ण नारायण नाटेकर (बाळकोबा) यांनी कण्वमुनींची भूमिका केली होती. शंकरराव मुजुमदार हे शकुंतलेच्या, तर स्वतः नाटककार अण्णासाहेब हे स्वतः सूत्रधार, शार्गंव आणि मारिच अशा तिहेरी भूमिकेत होते.
अण्णासाहेबांच्या नाट्य आणि काव्य गुणांची स्वतंत्र प्रतिभा दर्शवणारे त्यांचे नाटक म्हणजे ‘संगीत सौभद्र’. सुसंघटिक कथानक, अकृत्रिम संवाद, विलोभनीय व्यक्तिरेखा, प्रासादिक पदे आणि नाट्योपरोधावर आधारलेल्या विनोदाचा अखंडपणे वाहणारा अंतःप्रवाह या वैशिष्ट्यांमुळे या नाटकाचे आकर्षण मराठी प्रेक्षकांच्या मनात आजही टिकून आहे. अण्णासाहेब स्वतः चांगले नट व दिग्दर्शक होते. महाराष्ट्रात संगीत नाटकांचे नवे युग त्यांनी निर्माण केले. इतकेच नव्हे, तर उत्तम संगीत नाटके कशी असावीत, याचा आदर्श घालून दिला. जुन्या विष्णुदासी नाटकांतील सूत्रधार, विदूषक, गणपती व सरस्वती यांच्या अनुक्रमाने होणाऱ्या प्रवेशाची परंपरा सोडून देऊन संस्कृत नाटकातील सूत्रधार, परिपार्श्वक व नटी यांच्या संवादांनी नाटकांची प्रस्तावना करण्याची त्यांनी प्रथा पाडली. नाटक मंडळ्या व नट यांच्याविषयी समाजात असलेली अनुदारपणाची भावना त्यांनी रसिकांना उदात्त करमणुकीचे नवे माध्यम उपलब्ध करून दिले. परिणामी समाजातील उच्च वर्गात मोडणारे लोकही त्यांच्या नाटक मंडळीशी जिव्हाळ्याचे संबंध ठेवू लागले.
श्रेष्ठ संगीत नाटककार अण्णासाहेब किर्लोस्कर
Related articles