मराठी साहित्यातील जनकवी नारायण गंगाराम सुर्वे

Narayan Surve

आधुनिक मराठी साहित्यातील लोककवी कै. नारायण गंगाराम सुर्वे. आपल्या कवितांच्या माध्यमातून समाजातील दलित व उपेक्षित वर्गामध्ये राहणाऱ्या व असंख्य वेदना निमूटपणे सोसणाऱ्या जनतेचे आयुष्यभर प्रतिनिधित्त्व केले. मुंबईच्या इंडिया वुलन मिलमधील स्पिनिंग खात्यात साचेवाले म्हणून काम करणारे श्री. गंगाराम कुशाजी सुर्वे आणि कमला मिलमध्ये बाइंडिंग खात्यात काम करणार्‍या श्रीमती काशीबाई गंगाराम सुर्वे या जोडप्याने या अनाथ मुलाला स्वीकारले, सांभाळले, वाढवले आणि आपले नाव दिले. आपले आईवडील कामगार होते, त्यांच्यामुळेच मुंबईच्या कामगारवर्गाशी आपण जोडले गेलो, याविषयी नारायण सुर्वे यांना विलक्षण अभिमान आहे. हा अभिमान त्यांनी आपल्या लेखनातून, भाषणांतून अनेकदा व्यक्तही केला आहे. ही अभिमानाची भावना सुर्वे यांच्या कवितेमधूनही वारंवार डोकावताना दिसते. नारायण सुर्वे यांच्यावर मार्क्सवादी विचारांचा पगडा होता आणि आपल्या लेखणीतून त्यांनी समाज परिवर्तनाची कवने लिहिली.

संवादमय शैली हे त्यांच्या काव्याचे आणखी एक वैशिष्ट्य. दैनंदिन गरजेसाठी, आपले हक्क व अस्तित्वासाठी झगडणारा माणूस नारायण सुर्व्यांच्या कवितेत आढळून येतो. कवितेची भाषा अभिव्यक्ती स्वातंत्र्य पद्धतीची असल्यामुळे व सर्वसामान्य वाचकवर्गाला समजतील अशा शब्दांत त्यांचे काव्यलेखन होते. लॉस अँजेल्सचा निग्रो माणूस, आफ्रिकन चाचा, टांगेवाला, शीग कबाबवाला, याकूब नालबंदवाला, संपकरी, जथ्यात वावरणारा, पोस्टर्स चिकटवणारा हमाल, वेश्या अश्या समाजातल्या उपेक्षित घटकांचे विस्तृत तपशील त्यांच्या कवितेत आल्यामुळे त्यांची कविता तळागळातील जनतेचे प्रतिनिधित्व करते.

नारायण सुर्वे यांच्या कवितेतून मराठी कवितेत तोवर कधीच व्यक्त न झालेले असे कष्टकऱ्यांचे जग आपल्या सर्व पैलूंसकट व्यक्त होते; हे सुर्वे यांच्या कवितेचे प्रथमदर्शनी जाणवणारे वैशिष्ट्य होय. या कष्टकऱ्यांच्या जगाला दाहक अशा राजकीय, सामाजिक आणि आर्थिक वास्तवाची आणि जीवनसंघर्षाची पार्श्वभूमी लाभली आहे. समकालीन सामाजिक परिस्थितीवर, त्यातील अन्याय्य गोष्टींवर, प्रश्नांवर, माणसाच्या माणूसपणाचा अपमान करणाऱ्या व्यवस्थेवर प्रत्यक्षाप्रत्यक्ष भाष्य करणे हा सुर्वे यांच्या कवितेचा स्थायिभाव आहे. हे भाष्य करीत असताना सुर्वे यांच्या कवितेतून मार्क्सवादी विचारांची दिशा स्पष्टपणे व्यक्त होते. परंतु माणसाशी असलेल्या आत्मीय संबंधांमुळे आणि त्या संबंधांतून कवितेत प्रकट होणाऱ्या मार्क्सवादी जाणिवेमुळे सुर्वे यांची कविता मार्क्सवादी विचारांचे सूचन करीत असली, तरी प्रचारकी स्वरूप धारण करीत नाही.

बाबूराव बागुलांच्या प्रयत्नांमुळे ‘नवयुग’ मध्ये त्यांची कविता छापून आली. त्यानंतर सुरुवातीच्या काळात नवयुग, युगांतर, मराठा, इत्यादी नियतकालिकांमधून त्यांच्या कविता प्रसिद्ध झाल्या. १९६२ साली ‘ऐसा गा मी ब्रह्म’ हा सुर्वे यांचा पहिला कवितासंग्रह प्रकाशित झाला. समकालीन कवितेपेक्षा सुर्वे यांच्या कवितेचे असलेले वेगळेपण या संग्रहामुळे स्पष्टपणे जाणवू लागले. १९६६ मध्ये ‘माझे विद्यापीठ’ हा सुर्वे यांचा दुसरा कवितासंग्रह प्रसिद्ध झाला. ‘ऐसा गा मी ब्रह्म’ मध्ये दिसून येणारी कवीच्या सामर्थ्याची बीजे या दुसर्‍या संग्रहात अधिक विकसित रूपात प्रकट झाली. १९७५ मध्ये प्रसिद्ध झालेल्या ‘जाहीरनामा’ या तिसर्‍या संग्रहाने नारायण सुर्वे यांच्या कवितेचे स्वरूप अधोरेखित केले. यानंतर ‘सनद’ हा निवडक कवितांचा संग्रह (१९८२), ‘नव्या माणसाचे आगमन’ (१९९५) आणि ‘नारायण सुर्वे यांच्या गवसलेल्या कविता’ हा अप्रकाशित कवितांचा संग्रह (१९९५) असे तीन संग्रह प्रसिद्ध झाले आहेत.

जीवनावर आणि माणसांवर सुर्वे यांची दृढ श्रद्धा होती. माणूस हा त्यांच्या आस्थेचा, प्रेमाचा आणि शोधाचा विषय असायचा. “माणूस हाच साहित्याचा केंद्रबिंदू आहे. माणूस किंवा व्यक्ती ही एकटी नसते. ती समाजाचा घटक असते. म्हणूनच साहित्य आणि समाज यांचा अतूट संबंध असतो”, असे सुर्वे मानतात म्हणूनच समाज, आणि त्या समाजाच्या पार्श्वभूमीवर माणूस हा सुर्वे यांच्या कवितेचा गाभा आहे. माणसाचा, त्याच्या स्वभावधर्माचा, माणसाच्या सर्जनशीलतेचा आणि सामर्थ्याचा कुतूहलाने घेतलेला शोध सुर्वे यांच्या कवितेत सातत्याने जाणवत राहतो. माणसावरील आणि जीवनावरील या श्रद्धेमुळे आणि प्रेमामुळेच सुर्वे यांच्या कवितेतील आशावादी सूर कधीही लोप पावलेला दिसत नाही.

Advertisement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here