भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील महत्त्वाचे सैनिक, लेखक व कवी कै. विनायक दामोदर सावरकर. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एका क्रांतिकारक चळवळीचे धुरीण, स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतीय राजकारणातील एक महत्त्वाचे राजकारणी तसेच हिंदुसंघटक व हिंदुत्वाचे एक विशिष्ट तत्त्वज्ञान मांडणारे तत्त्वज्ञ, विज्ञानाचा पुरस्कार व जातिभेदाला तीव्र विरोध करणारे समाज क्रांतिकारक, भाषाशुद्धी व लिपिशुद्धी ह्या चळवळींचे प्रणेते, प्रतिभावंत साहित्यिक आणि प्रचारक असे अनेक पैलू सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाला होते. सावरकरांना ‘स्वातंत्र्यवीर’ ही उपाधी प्रसिद्ध मराठी लेखक व पत्रकार प्रल्हाद केशव अत्रे यांनी दिलेली आहे. सावरकरांनी १८५७ चा स्वातंत्र्यसमर हा ग्रंथ लिहीला त्यात सावरकरांनी मांडले आहे की १८५७ हे बंड नसून हा एक स्वातंत्रसंग्राम होता.
स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे व्यक्तिमत्त्व त्यांच्या भाषाशैलीत प्रतिबिंबित झाले आहे. कवी, निबंधकार, जीवनदर्शन घडविणारा नाटककार, राजकीय व सामाजिक पार्श्वभूमीवर आधारित कादंबऱ्यांचा लेखक, ग्रंथकार, इतिहासकार, भाषाशास्त्रज्ञ ही साहित्यिक सावरकरांची अनेकविध रूपे आहेत. सावरकर हिंदीचे अभिमानी होते. १९२१ मध्ये सावरकरांना अंदमानामधून हिंदुस्थानात आणून रत्नागिरीच्या तुरुंगात ठेवण्यात आले. तिथे त्यांनी हिंदुत्व, माझी जन्मठेप आणि भारतीय इतिहासातील सहा सोनेरी पाने हे ग्रंथ लिहिले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे वृत्तीने कवी होते. ‘सागरा प्राण तळमळला’ ही कविता त्यांना एका तीव्र भावावेगाच्या प्रसंगी सुचली. रानफुले (१९३४) ह्या त्यांच्या काव्यसंग्रहात त्यांचे कमला हे खंडकाव्य, काही स्फुट काव्ये आणि वैनायक वृत्ताचा विशेष सांगणारा एक निबंध अंतर्भूत आहे. त्यांची संपूर्ण कविता सुमारे १३,५०० ओळींची भरेल. सावरकरांची कविता (१९४३) ह्या नावाने त्यांची कविता संकलित करण्यात आली आहे. सावरकरांचे पहिले काव्य म्हणजे वयाच्या अकराव्या वर्षी लिहिलेला ‘स्वदेशीचा फटका’. सावरकरांनी त्यांच्या कविता महाविद्यालयात, लंडनच्या वास्तव्यात, अंदमानच्या काळकोठडीत आणि रत्नागिरीत रचल्या. कोठडीच्या भिंतींवर काट्याकुट्यांनी महाकाव्य लिहिणारा हा जगातील एकमेव महाकवी. शब्दलालित्य, भावोत्कटता, विलक्षण मार्दव व माधुर्य ही त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये आहेत. सुस्पष्ट विचार, तर्कसंगत मांडणी आणि विचारांच्या अभिव्यक्तीचे सामर्थ्य ही त्यांच्या निबंधांची बलस्थाने आहेत.
हिंदी भाषेच्या प्रचाराचेही त्यांनी अंदमानात काम केले. हिंदी ही राष्ट्रभाषा झाली पाहिजे, ह्या मताचे ते होते. मात्र इतर प्रांतांच्या भाषाही शिकल्या पाहिजेत, असे ते सहबंदिवानांना सांगत असत. तसेच त्यांना साक्षर बनविण्याचे कार्यही त्यांनी तेथे केले.
सावरकर हे इतिहास घडविणारे इतिहासकार होते. त्यांचा शिखांचा इतिहास अप्रकाशित राहिला. सावरकरांनी विचारप्रवर्तनाबरोबरच भाषाशुद्धीचे प्रत्यक्ष कार्य केले. क्रमांक, चित्रपट, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, प्राचार्य, प्राध्यापक, मुख्याध्यापक, शस्त्रसंधी, कीलक राष्ट, टपाल, दूरध्वनी, नभोवाणी, ध्वनिक्षेपक, अर्थसंकल्प, विधिमंडळ, परीक्षक, तारण, संचलन, गतिमान नेतृत्व, क्रीडांगण, सेवानिवृत्तिवेतन, महापौर, हुतात्मा, उपस्थित असे शतावधी समर्पक शब्द सावरकरांनी सुचविलेले आहेत.