मराठी भाषेतील सुप्रसिद्ध कवी माधव जूलियन म्हणजेच कै. माधव त्रिंबक पटवर्धन. गझल व रुबाई हे काव्यप्रकार फारसीतून मराठीत प्रथम आणण्याचे श्रेय माधवराव पटवर्धनांना देण्यात येते. पटवर्धनांनी कवितांशिवाय भाषाशास्त्रीय लेखनही केले. सोप्या व शुद्ध मराठी लेखनाचे पुरस्कारणाऱ्या पटवर्धनांनी भाषाशुद्धि-विवेक हा ग्रंथ लिहिला. ह्या ग्रंथात कालबाह्य ठरलेल्या शेकडो मराठी शब्दांची सूची समाविष्ट आहे.
इंग्लिश कवी शेले याने रचलेल्या जूलियन आणि मडालो या कवितेवरून यांनी “जूलियन” असे टोपणनाव धारण केले. त्यांच्या प्रकाशित साहित्या मध्ये स्फुट गझला, खंडकाव्य दीर्घकाव्य, काव्यसंग्रह, अनुवादितलेख, संशोधनात्मक व भाषांतरीत वाङ्मय प्रकारांचा समावेश आहे.
“कशासाठी पोटासाठी”, “जीव तुला लोभला माझ्यावरी”, “प्रेम कोणीही करीना”, “प्रेमस्वरूप आई”, “मराठी असे आमुची मायबोली” या कविता खुपच प्रसिध्द आहेत. माधवराव पटवर्धन हे मुंबई विद्यापीठाच्या मराठी साहित्यातील पहिल्या डी.लिट. पदवीचे मानकरी आहेत.