– प्राची गोंडचवर / कविता /
मुकुंद निजे माझिया, काजव्यांनो मंद व्हा,
श्रांत हो वाऱ्या जरा तुज शपथ आहे आजला,
रातराणी सखी तू गे दर्वळी बघ संयमे,
तारकांनो सावरा, मिटू लागी लोचने…
कुशी ये अलवार आणि पापण्या मिटून घे,
तुझ्या माथी ओठ प्रेमाने जरा टेकवू दे,
हळुवार तुजला थोपटूनी गाऊ दे अंगाई रे,
बाळकृष्णा मुकुंदा मज भाग्य इतुके आज दे…
उसळती वक्षस्थळी अमृताच्या लाटा जणू,
दंव तुझ्या गाली? लागी आसवे मम ओघळू,
ईश्वरा दर्शन नको तव रूप केवळ कल्पना,
मोक्ष म्हणती लोक ज्यांसी मुकुंदा तो हाच ना?
ज्ञान ना मजला ना ही ठाव मज अध्यात्म ते,
कसे तुज प्रार्थू? प्राज्ञाच माझी काय रे?
मज नको वरदहस्त तुझिया, नको ती धनसंपदा;
तू सोबती राहो सदा, एवढे दे मुकुंदा!
From the diary of π – प्राची गोंडचवर