मराठी कवी, नाटककार नारायण वामन टिळक उर्फ रेव्हरंड टिळक. रेव्हरंड टिळक हे कवी म्हणून प्रसिद्ध असले तरी त्यांनी स्फुट गद्यलेखनही विपुल केलेले आहे. प्रथम हिंदू धर्मास अनुकूल आणि पुढे ख्रिस्ती धर्मपुरस्कारार्थ त्यांनी केलेल्या लेखनाचा त्यात अंतर्भाव होतो. ज्ञानोदयाचे ते संपादकही होते.
केशवसुतांच्या आधी त्यांनी काव्यरचनेस आरंभ केला. प्रथम जुन्या पद्धतीच्या, दीर्घ कथनपर काव्यरचनेवर त्यांचा भर होता. तथापि पुढे केशवसुतांच्या नव्या, आधुनिक कवितेचे वातावरण निर्माण झाल्यानंतर त्या प्रकारची कविता लिहिण्याकडे त्यांची प्रवृत्ती झाली. साधी, सहज रचना आणि प्रामाणिक भावनोत्कटता हे त्यांच्या काव्यरचनेचे विशेष होते.
त्यांनी विविध विषयांवर आपल्या कविता लिहिल्या. तथापि एक प्रकारची व्यापक कुटुंबवत्सलता त्यांच्या एकूण कवितेला व्यापून राहिल्याचे जाणवते. त्यातूनच बालोद्यानमधील त्यांची शिशुगीते लिहिली गेली. दत्तांसारख्या कवींना त्यांनी दिलेले प्रोत्साहन व बालकवींचे स्वतःच्या घरात उत्कट जिव्हाळ्याने केलेले पालन ह्या संदर्भात बोलके ठरते. निसर्गाबद्दल त्यांना प्रेम वाटे. ‘फुलामुलांचे कवी’ म्हणूनच ते ओळखले जातात. ‘गुलाब’, ‘शुष्क गुलाब’, ‘रानात एकटेच पडलेले फूल’, ‘वनवासी फूल’ ह्यांसारख्या कविता त्यांनी लिहिल्या आहेत. तथापि त्यांच्या कवितेतून अवतरणारी फुले ही निखळ निसर्गाविष्कारासाठी येत नाहीत बोधप्रवण तत्त्वचिंतनासाठी येतात. ‘वनवासी फूल’ ही त्यांची दीर्घ कविता प्रवृत्ती आणि निवृत्ती ह्यांमधील द्वंद्वाचे एक सुंदर, काव्यमय चित्र आहे.
टिळकांच्या कवितेची भाषा साधीसुधी असली, तरी ती प्रसाद आणि माधुर्य ह्या गुणांनी ओतप्रोत भरलेली आहे. त्यांच्या संस्कृतमधल्या व्यासंगाचा त्या कवितेवर प्रभाव आहे. अलौकिक प्रतिभा, मानुषता, सामाजिक सुधारणेची आंतरिक तळमळ ह्यांबरोबरच निसर्गावरचे उदंड प्रेम, स्त्रीबद्दलची उदार दृष्टी, प्रेमभावनेचा आत्मनिष्ठ आविष्कार, क्वचित गूढगुंजन अशी त्यांच्या काव्याची वैशिष्ट्ये सांगता येतात. अर्वाचीन कवितेच्या आघाडीवर केशवसुतांबरोबर असलेल्या ह्या कवीचा मराठीतील आधुनिक कविपंचकात समावेश झालेला आहे. अर्वाचीन मराठी कवितेच्या जनकत्वाचा मान निर्विवादपणे केशवसुतांकडेच जातो. पण अर्वाचीन कवींमध्ये जे पाच कवी (केशवसुत, रेव्हरंड टिळक, विनायक, गोविंदाग्रज, बालकवी) ‘कविपंचक’ म्हणून मान्यता पावले, त्यांमध्ये रेव्हरंड टिळक वयाने सगळ्यांमध्ये मोठे आणि बालकवी ठोंमरे सर्वांत लहान होते आणि दोघांमध्ये पिता-पुत्रासारखे नाते निर्माण झाले होते.
त्यांच्या अभंगांजलीतून ख्रिस्ती धर्मावरील उत्कट श्रद्धा प्रकट होते. तिच्यातील उमाळा तुकारामासारख्या संताशी निकटचे नाते सांगणारा आहे. ख्रिस्तायन या रामायणावरून स्फुरलेल्या नावाचे ओवीबद्ध काव्य त्यांनी लिहावयास घेतले होते. भारतीय ख्रिस्ती समाजात पुराणाची पद्धत लोकप्रिय करण्याच्या दिशेने त्यांचा हा एक प्रयत्न होता. बायबल वाचून टिळक फारच प्रभावित झाले आणि टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. महाराष्ट्रात ख्रिस्ती झालेल्या लोकांची भाषा व साहित्य मराठीच राहण्यास टिळकांचे लेखन बरेच कारणीभूत झालेले आहे.