एक विदुषी, लोकसाहित्य, बौद्ध वाङ्मय, समाजशास्त्र विषयांच्या अभ्यासक आणि ललित लेखिका दुर्गा नारायण भागवत

0
2240

मराठी भाषेच्या लेखिका, लघुनिबंधकार कै. दुर्गा नारायण भागवत. वैविध्यपूर्ण साहित्यप्रकारात त्यांचे मोठे योगदान आहे. यामध्ये लोकसाहित्य, बालसाहित्य, बौद्धसाहित्य, कथा, चरित्र, ललित, संशोधनपर, समीक्षात्मक, वैचारिक लेखन यांचा समावेश होतो. सुस्पष्ट पामाणिक विचार, छोटी छोटी वाक्ये, नादमय शब्द आणि अर्थातील सुबोधता हे दुर्गाबाईंच्या लेखनाचे वैशिष्ट्य होते.

दुर्गाबाईंच्या लेखनात भारतातील सांस्कृतिक, पौराणिक, सामाजिक जीवनातले अनेक संदर्भ अभ्यासपूर्वक नोंदविलेले दिसतात. अभ्यास आणि लिखाण हे त्यांचे आस्थेचे विषय होते. म्हणूनच त्यांच्या लिखाणात संशोधन, विद्वत्ता आणि माहितीचा प्रचंड साठा या त्रयींचा अपूर्व संगम आढळतो. त्यांच्या लिखाणात स्पष्ट आणि प्रामाणिक विचारांबरोबरच कवी मनाची कोमलता आढळते. आणि “आपणाला जे जे ठावे ते इतरांना सांगावे” हा समर्थ रामदासांचा विचार प्रत्यक्षात आणण्याची तळमळ दुर्गाबाईंमध्ये दिसून येते. लोकसाहित्याच्या व्यासंगात बुडलेल्या दुर्गाबाईंच्या लेखनात लोकसाहित्याचा जिवंत रसरशीतपणा, मोहक साधेपणा, बोलभाषेची मांडणी आढळते, तसेच व्यासंग-चिंतन-मनन यांतून आलेले त्यांचे विचारही त्यांच्या साहित्यात दिसून येतात. दुर्गाबाईंच्या लेखनातील मौलिकता, अस्सल भारतीयत्व, सनातनत्व यांचा वेध घेण्याची शक्ती यांमुळे ललित निबंधाच्या क्षेत्रात त्यांनी एक नवा मानदंड निर्माण केला आहे. मराठी लघुनिबंधाचे पूर्वीचे रूप बदलून तो वास्तव, अनुभवनिष्ठ आणि चितनात्मक करण्यात दुर्गाबाईंचे योगदान मोठे आहे. तसेच अतिशय ज्ञानलालसा आणि अनुभवसंपन्न जीवन यामुळे लोकसाहित्य, बौद्धधर्म, संस्कृत वाङ्मय इ. अनेक विषयांवरही त्यांचे लेखन संदर्भांनी परिपूर्ण असेच झालेले दिसते. निसर्ग सौंदर्याचा चित्रदर्शी प्रत्यय देणारे ‘ऋतूचक्र’ काय किवा महाभारतातील व्यक्तिरेखा वेगळ्याच दृष्टीने पेश करणारे ‘व्यासपर्व’ काय किवा साहित्य अकादामी पुरस्कार प्राप्त, वाचकाला चितन करायला लावणारे ‘पैस’ काय; हे ग्रंथ म्हणजे दुर्गाबाईंच्या लेखनाचा परीस स्पर्श झालेले अक्षरवाङ्मयच आहे. या व्यतिरिक्त लोकसाहित्य हा त्यांच्या अभ्यासातील आवडीचा विषय. तामिळी, पंजाबी, बंगाली, गुजराती, आसामी आणि काश्मिरी या अनेक प्रदेशातील लोककथा त्यांनी मराठी भाषेमध्ये अनुवादित केल्या. भावोत्कटता, चितनशीलता आणि संवेदनाप्रधान यामुळे त्यांचे लेखन लोकप्रिय झाले. १९७५ मधील आणीबाणीच्या काळात झालेल्या मुस्कटदाबीच्या विरोधात दुर्गेचा अवतार धारण करून शासनाविरूद्ध आवाज उठविणार्‍या त्या पहिल्या साहित्यिक होत्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here