– योगिनी वैद्य / कविता /
अरे मानवा आयुष्य खूप सुंदर आहे
मात्र ते सुंदर ठेवणे हे तुझेच कर्तव्य आहे
सुख-दु:ख म्हणजे तर ऊन पावसाचा खेळ
आनंदी होशील जर घालशील यांचा अचूक मेळ
जगणे आणि मरणे हा आहे निसर्गाचा नियम
यामुळे खचू नको किंवा सोडू नको संयम
येणाऱ्या संकटांना सामोरे जा धैर्याने
कारण त्यानंतरच येईल सुख चोरपावलाने
स्वत:पलीकडे जाऊन बघ जरा जगाकडे
अनेक असतील असे ज्यांना आयुष्याचा अर्थ न सापडे
देऊन त्यांना धीर हो त्यांचा आधार
तरच दूर होईल त्यांच्या जीवनातील अंधार
काळाच्या ओघात हरवत आहे आपल्यतली आपुलकी
प्रयत्नपूर्वक जपून ठेव तुझ्यातली माणुसकी
बदलून पहा आयुष्याकडे पाहण्याची द्दृष्टी,
तरच अनुभवशील सभोवतालची सुंदर सृष्टी
कोणी सांगू शकेल का कसा पडेल नियतीचा फासा
म्हणूनच झटकून टाक नैराश्य व घे सकारात्मकतेचा वसा
सुंदर कविता योगिनी. सध्याच्या अनिश्चितीच्या आणि भीती च्या वातावरणात तुझी कविता सकारात्मकतेचा वसा घेऊन आली याचा खूप आनंद झाला. केवळ सकारात्मकतेने अनेक प्रश्न सुटू शकतात. आपण आपल्याशी तसा संवाद साधणे जरुरीचे आहे.